Coin | नाण्यांचा खणखणाट हरवतोय Pudhari File Photo
बहार

Coin | नाण्यांचा खणखणाट हरवतोय

‘नाणे’ आता चलनातूनच हद्दपार होत आहे

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संजय वर्मा

कधीकाळी अर्थव्यवहाराची ओळख आणि बाजारपेठेचा अविभाज्य घटक असलेले, समाजातील आर्थिक हालचालींचे लक्षण मानले गेलेले ‘नाणे’ आता चलनातूनच हद्दपार होत आहे. याचे कारण यूपीआय व्यवहारांचे वाढते प्रमाण, बँकिंग अ‍ॅप्स आणि क्रेडिट कार्डस्. डिजिटल माध्यमाच्या प्रसाराने आजचा ग्राहक ‘कॅशलेस’ जीवनशैलीकडे वळला हे वास्तव आहे...

छत्रपती संभाजीनगरची एक घटना आहे. निवृत्ती शिंदे नावाचे एक 93 वर्षीय ज्येष्ठ नागरिक गल्लीतील एका सराफाच्या दुकानात गेले. त्यांच्याकडे 1,120 रुपयांची चिल्लर होती. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि धोतर-कुर्ता घालणारे शिंदे यांना या पैशातून पत्नी शांताबाई यांच्यासाठी मंगळसूत्र खरेदी करायचे होते. दोन मुले आणि एक मुलगी असणारे शिंदे यांच्या एका मुलाचा मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला होता. दुसरा मुलगा आई-वडिलांचा सांभाळ करण्यास सक्षम नव्हता. छत्रपती संभाजीनगर येथील एका मंदिर परिसरात त्यांनी अनेक वर्षे काढली आणि तेथे लोकांनी दिलेल्या दक्षिणेतून जमा केलेल्या चिल्लरने एक ठोस रक्कम आकारास आली. मात्र, सध्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख रुपये झालेली असताना ते खरेदी करण्याएवढी ती रक्कम नव्हती. मात्र, स्वस्तातील मंगळसूत्र खरेदी करण्याचा त्यांचा इरादा होता. याद़ृष्टीने शिंदे चार सराफ व्यावसायिकांकडे गेले; परंतु चिल्लर आता कालबाह्य झाल्याचे सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. पाचव्या दुकानदाराकडूनदेखील त्यांना फारशी आशा नव्हती. परंतु, त्यांनी गोळा केलेल्या नाण्यांचे महत्त्व पाहून या सराफाने केवळ 20 रुपयांच्या बदल्यात एक मंगळसूत्र देण्याचा प्रस्ताव मांडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत या जोडप्याचे आनंदाश्रू दिसलेच; पण नाण्यांवर असणारी त्यांची श्रद्धाही दिसून आली.

सध्याच्या यूपीआयच्या झगमगाटात आणि डिजिटल व्यवहाराने भारलेल्या जगात पैशाची देवाण-घेवाण खूपच सुलभ झाली आहे. यामुळे एकेकाळी वैभवाचे, संपन्नतेचे प्रतीक असलेली नाणी कालबाह्य होताहेत. तसेच, महागाईही वाढल्यामुळे एक-दोन रुपयांना आज बाजारात काहीच मिळत नाही. वास्तविक, एकेकाळी कार्यक्रमात ‘शगुन’ म्हणून दिले जाणारे एक रुपयाचे नाणे शुभसंकेत मानले गेले. लग्नात, बारशात, भोंडल्यात, कीर्तनात दिले जाणारे नाणे म्हणजे केवळ देणगी नव्हे, तर भावना होती; पण आजचा व्यवहार ‘नाणी नकोत हो, सुट्टे नाहीत’ या वाक्यात अडकला आहे.

अलीकडेच आरबीआयच्या अहवालात 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये नाणी वापरण्याच्या प्रमाणात 3.6 टक्के वाढ नोंदल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 2016-17 या काळात 8.5 टक्के वाढ नोंदली गेलेली असताना काल-परवाची वाढ ही नगण्यच म्हणावी लागेल. प्रामुख्याने याच काळात (2016-17) यूपीआय व्यवहारांची सुरुवात झाली होती. चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2024-25 मध्ये नाण्यांंच्या वापराचे मूल्य केवळ 9.6 टक्क्यांनी वाढले आणि ते 2016-17 च्या 14.7 टक्क्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मते, मार्च 2017 मध्ये यूपीआयचे व्यवहार 6.4 दशलक्ष (2,425 कोटी रुपये) वरून मार्च 2025 मध्ये 18.3 अब्ज (24,77,221 कोटी रुपये) रुपयांवर पोहोचले. या आकड्यावरून यूपीआयच्या आक्रमणासमोर नाणे धाराशयी होताना दिसते. भारतात नाण्याचे महत्त्व केवळ चलनाच्या रूपातूनच किंवा आर्थिक व्यवहारापुरतेच मर्यादित नसून, ते अर्वाचिन काळापासून शासन, सत्ता आणि ओळखीचे प्रतीक म्हणून पाहिले गेलेले आहे. मौर्यकाळातील नक्षीकाम असलेल्या नाण्यापासून ते गुप्तकाळातील सोन्याच्या दिनारपर्यंत नाण्यावर राजघराण्यांच्या वंशांचा शिक्का राहिलेला आहे. ही नाणी एकप्रकारे सार्वभौमत्वाचे प्रतीक राहिली आहेत. तुघलक राजवटीत तांब्यापासून नाणी तयार केली जात असत. काही काळात चामड्यापासूनही नाणी तयार केली गेली. यामागे धातू उपलब्ध नसणे आणि टांकसाळीतून पुरेशा प्रमाणात निर्मिती नसणे हे कारण असले तरी नाण्यांत खंड पडू दिला नाही.

नाणे आणि रुपयांच्या अनेक कथा आहेत. यात आधुनिक काळातील ब्रिटिश राजवटीतील नाण्यांचा उल्लेख करता येईल. त्यात एक आणा, दोन आणेदेखील होते आणि वजनदार एक रुपयाही होता. तत्कालीन काळात रुपयादेखील सर्वसामान्यांसाठी खूपच मोलाचा होता. भारतीय रुपयाचा स्वत:चा एक गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात आपला रुपया ओमान, दुबई, कुवेत, बहारीन, कतार, केनिया, युगांडा, सेचेल्स आणि मॉरिशसपर्यंत अधिकृत चलनाच्या रूपातून वापरला जात होता. या देशांकडे स्वत:चे नाणे असतानाही दीर्घकाळापर्यंत भारतीय रुपयाचा प्रभाव राहिला आहे. सोन्याच्या तस्करीला वेसण घालण्यासाठी 1960 च्या दशकात भारताने सुरू केलेला आखात रुपया (गल्फ रुपे) अनेक आखाती देशांत वापरला जात होता. 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर त्यांनी स्वत:च्या चलनाला महत्त्व दिले. आज नेपाळ आणि भूतानमध्ये रुपयाला अधिकृत मान्यता आहे. सिंगापूर, मलेशिया आणि श्रीलंकासारख्या देशांत भटकंतीला गेलेल्या भारतीय पर्यटकांचा रुपया स्वीकारला जातो. यावरून आपल्या चलनाची प्रतिष्ठा लक्षात येते.

भारताने 1950 मध्ये पहिल्यांदा स्वत:च्या नाण्याची पायाभरणी केली होती, हे लक्षात घ्यावे लागेल. महात्मा गांधी श्रेणीतील आधुनिक नोटांची सुरुवात 1996 मध्ये झाली आणि 2010 मध्ये रुपयाचे नवे प्रतीक स्वीकारण्यात आले. त्याचवर्षी पंचाहत्तर, शंभर अणि एक हजार रुपयांची नाणीदेखील आणली. अर्थात, त्याकडे प्रामुख्याने संग्रहाच्या रूपातून पाहिले गेले. 2011 पर्यंत रुपयाचे चिन्ह असलेले नाणे दैनंदिन वापरात आले. त्याचा खणखणाट बाजार आणि मंदिरातील देणगी पेटीत होऊ लागला.

आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल तंत्राचा वापर आणि नाण्यांची कालबाह्यता ही एप्रिल 2016 मध्ये लाँच केलेल्या यूपीआयमुळे निश्चित झाली. याआधारे भारतात पेमेंट प्रणालीत क्रांती झाली. यूपीआयमध्ये सर्वात महत्त्वाचा क्यूआर कोड असून, त्यास स्कॅन करताच तातडीने पैसे स्थानांतरित करण्याची सुविधा मिळते. यासाठी पैसे देणारा आणि स्वीकारणारा या दोघांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या आधारे यूपीआय मोठ्या शहरात गेमचेंजर म्हणून सिद्ध झाले. प्रामुख्याने लहानसहान व्यवहारातही क्यूआर कोडने बदल घडवून आणला. आजवर या व्यवहारात एकेकाळी नाण्यांचा दबदबा असायचा. आज तीन-चार रुपयेदेखील क्यूआर कोडने ट्रान्स्फर होऊ लागल्याने नाण्याची गरज संपली. यावर यूपीआयने वरचष्मा निर्माण केला. ‘एनपीसीआय’चा डेटा पाहिल्यास हा बदल नाणे व्यवहारात मंदी आणणारा ठरल्याचे निदर्शनास येते. आरबीआयचा अहवाल पाहिल्यास यूपीआय येण्यापूर्वी 2015-16 या काळात व्यवहारातील नाण्याचे मूल्य 12.4 टक्के आणि वापराचे प्रमाण 8.2 टक्क्यांनी वाढले होते. 2016-17 पर्यंत वाढीचा दर अनुक्रमे 14.7 टक्के अणि 8.5 टक्के हेाता. यानुसार ही आकडेवारी नाण्यावर आधारित सक्षम अर्थव्यवस्थेची साक्ष देणारी होती. परंतु, यूपीआय आल्यानंतर व्यवहाराची दिशाच बदलली. 2020-21 मध्ये कोरोना महासाथीचा उद्रेक झाला आणि त्यात संपर्कविरहित पेमेंटला महत्त्व आले आणि त्यामुळे नाण्यांच्या मूल्यात केवळ 2.1 टक्के आणि व्यवहारातील प्रमाणात केवळ एक टक्का वाढ नोंदली गेली. यानंतरच्या वर्षात 2022-23 आणि 2023-24 मध्ये नाणे वापरण्याच्या प्रमाणात अनुक्रमे 2.6 टक्के आणि 3.5 टक्के वाढ नोंदली गेली. हे प्रमाण यूपीआयपूर्वीच्या स्तराच्या तुलनेत खूपच कमी होते. नाण्यांचा खणखणाट हा भारतीय समाज आणि बाजाराचा आवाज होता. आज तो काळाच्या उदरात गडप झाला आहे. तंत्रज्ञानाचा वरवंटा आपली सांस्कृतिक मूल्ये, स्मृती पुसून टाकत वेगाने फिरत आहे. आज नाण्यांबाबत जे घडते आहे ते येणार्‍या काळात नोटांबाबतही घडू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेची त्सुनामी आल्यानंतर जुन्याच नव्हे, तर वर्तमानातील अनेक गोष्टींची पडझड होऊन त्या इतिहासजमा होणार आहेत हे निर्विवाद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT