चक्रीवादळांचे दु ष्ट च क्र Pudhari File Photo
बहार

चक्रीवादळांचे दु ष्ट च क्र

जागतिक तापमानवाढीमुळे होणार्‍या हवामान बदलांमुळे वादळांची संख्या वाढली

पुढारी वृत्तसेवा
रंगनाथ कोकणे, पर्यावरणतज्ज्ञ

अलीकडेच पुद्दुचेरी, तामिळनाडूला ‘फेंगल’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यामुळे शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, विमानतळ सर्व बंद ठेवावे लागले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गोव्यापासून कर्नाटकपर्यंत जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळे ही नैसर्गिक आपत्ती नाही. जागतिक तापमानवाढीमुळे होणार्‍या हवामान बदलांमुळे अशा वादळांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातही या वादळांमुळे झालेली हानी आपण पाहिली आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेमध्ये ‘बॉम्ब’ चक्रीवादळाने हाहाकार उडाला. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या या वादळामुळे जवळपास सहा लाख घरांमधील वीज गेली; तर काही भागांत 20 ते 30 सेंटिमीटर पाऊस झाला. तसेच 12 ठिकाणी भूस्खलनाचा घटना घडल्या. या चक्रीवादळामुळे सात दिवसांत या भागात आठ ट्रिलियन गॅलन पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यापूर्वी भारतात ऑक्टोबर महिन्यात ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर आलेल्या ‘दाना’ चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसाने सुमारे 1.75 लाख एकर जमिनीवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले. तसेच 2.80 लाख एकर जमिनीवरील पिके बुडिताखाली गेली. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग खैरा, सिमुलिया, बहनगा, सोरो, औपाडा आणि निलागिरी या भागांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. नोव्हेंबरच्या अखेरीस आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी, तामिळनाडू या दोन राज्यांना जोरदार तडाखा बसला. यामुळे शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, विमानतळ सर्व बंद ठेवावे लागले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गोव्यापासून कर्नाटकपर्यंत जोरदार पाऊस झाला.

यंदाच्या वर्षी उन्हाळ्यातच आपल्या देशात चक्रीवादळ सुरू झाले. मे महिन्यात आलेले ‘रामल’ चक्रीवादळ हे वर्षातील सर्वात भीषण चक्रीवादळ ठरले, ज्याचा वेग ताशी 110 किलोमीटर होता. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘आसना’ वादळाने बंगालच्या उपसागरात खळबळ उडवून दिली. ‘दाना’ने ऑक्टोबरमध्ये कहर केला. यावर्षी 11 वेळा ‘डिप्रेशन’, तर सातवेळा ‘डीप डिप्रेशन’ तयार झाले. वार्‍यांचा वेग ताशी 31-50 कि.मी. असतो, तेव्हा भारतीय हवामानशास्त्र विभाग त्याला ‘डिप्रेशन’ म्हणतो आणि जेव्हा वार्‍यांचा वेग ताशी 51-62 कि.मी. असतो तेव्हा त्याला ‘डीप डिप्रेशन’ म्हणतात.

चक्रीवादळांमुळे होणारे नुकसान हे प्रचंड मोठे असण्याची भीती असते. यावर्षीचेच उदाहरण पाहिल्यास देशात गेल्या 11 महिन्यांमध्ये आलेल्या विविध चक्रीवादळांमुळे 278 लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 5,334 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. जीवित व वित्तहानीचा हा आकडा प्रत्यक्षात अधिक असू शकतो. आभाळ एकदम भरून येणे, सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू होणे ही या वादळाची लक्षणे होत. ही वादळे समुद्रात निर्माण होत असल्याने वार्‍यांचा तडाखा समुद्रकिनार्‍याजवळच्या प्रदेशाला प्रामुख्याने बसतो. अचानकपणे मुसळधार पाऊस पडू लागल्याने नद्यांना पूर येतात. झाडे उन्मळून पडणे, वाहतूक बंद पडणे आणि वीजपुरवठा खंडित होणे हे या वादळांचे परिणाम असतात. आभाळ भरून आल्याने हवाई वाहतूक आणि समुद्रात लाटा उसळल्याने जलवाहतूक बंद पडते. काही वेळा जहाजे उलटतात, बुडतात. वादळ आणि पूर ही संकटे कमी झाल्यावर पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होतात. अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरते. विशेषत:, कावीळ आणि कॉलरा या दोन विकारांच्या साथी पसरतात. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, चक्रीवादळांमुळे केवळ मालमत्तेचे आणि मानवाचे तत्काळ नुकसान होत नाही, तर त्यांचे पर्यावरणावरही दीर्घकालीन परिणाम होतात. अतिवृष्टीमुळे निर्माण होणारे दलदलीचे क्षेत्र, जोरदार वादळामुळे नष्ट होणारी नैसर्गिक जंगले आणि हिरवळ, प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची पडझड, यामुळे संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडून जातो. सोसाट्याच्या वार्‍यांमुळे किनारी भागात खारे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरते. तसेच शेतजमिनीवर चिखल व दलदल निर्माण होते. या नुकसानीची दुरुस्ती करणे अवघड ठरते.

‘इंटरगव्हर्न्मेंटल ग्रुप ऑन क्लायमेट चेंज’च्या 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या विशेष अहवालानुसार, 1970 पासून हरितगृह वायू उत्सर्जनामुळे निर्माण होणारी 90 टक्के अतिरिक्त उष्णता जगातील महासागरांनी शोषून घेतली आहे. त्यामुळे महासागरांचे तापमान कमालीचे वाढत आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या तीन-चार दशकांमध्ये चक्रीवादळे अधिकाधिक धोकादायक बनत चालली आहेत. समुद्राचे तापमान 0.1 अंशाने वाढले म्हणजे चक्रीवादळाला अतिरिक्त ऊर्जा मिळते. मोठ्या प्रमाणात हवा वेगाने फिरते तेव्हा तयार होणार्‍या वादळाला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ म्हणतात. पृथ्वी भौगोलिकद़ृष्ट्या दोन गोलार्धात विभागली गेली आहे. थंड किंवा बर्फाळ उत्तर गोलार्धात उद्भवणार्‍या अशा वादळांना चक्रीवादळ किंवा टायफून म्हणतात. यामध्ये हवा गोलाकाररीतीने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. जेव्हा जोरदार वार्‍यांसह तीव्र वादळे मुसळधार पाऊस घेऊन येतात तेव्हा त्यांना हरीकेन म्हणतात. दक्षिण गोलार्धात त्यांना सायक्लोन म्हटले जाते. यामध्ये वार्‍यांची फिरण्याची प्रक्रिया ही घड्याळाच्या दिशेने गोलाकार असते. कोणत्याही उष्णकटिबंधीय वादळाचा वेग ताशी किमान 74 मैल होतो तेव्हा तेे चक्रीवादळ मानले जाते. या चक्रीवादळांमध्ये काही वेळा अनेक अणुबॉम्बइतकी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते.

चक्रीवादळांची निर्मिती ही थेट पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याशी संबंधित आहे. विषुववृत्ताजवळील समुद्रात जेथे पाण्याचे तापमान 26 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तेथे अशी चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे जेव्हा समुद्रावरील हवा तप्त होते, तेव्हा ती वेगाने वरच्या दिशेला जाते. अशारीतीने वर जाताना हवेचा वेग वाढला की, ती खूप वेगाने फिरते आणि एक मोठे वर्तुळ बनते. हे वर्तुळ काहीवेळा 2,000 किलोमीटरच्या त्रिज्यापर्यंत विस्तारू शकते. भारतीय उपखंडात प्रत्येक वेळी वारंवार येणार्‍या आणि प्राणघातक वादळांचे खरे कारण म्हणजे मानवाकडून निसर्गाच्या अंदाधुंद शोषणामुळे होणारे हवामान बदल होय. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने इशारा दिला होता की, वाढत्या हवामान बदलांमुळे चक्रीवादळे अधिक धोकादायक बनतील. हवामान बदलामुळे उष्णकटिबंधीय महासागरांच्या तापमानात वाढ झाल्यामुळे चालू शतकाच्या अखेरीस तीव्र पाऊस आणि वादळांचे प्रमाण वाढू शकते. ‘नासा’ने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते तेव्हा तीव्र वादळे येतात. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ (फेब्रुवारी, 2019) मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात प्रत्येक एक अंश सेल्सिअस वाढीमुळे चक्रीवादळांची संख्या 21 टक्क्यांनी वाढते. मुसळधार पावसासह वादळे सहसा वर्षाच्या सर्वात उष्ण हंगामात येतात; पण यावर्षी पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात भारतात ज्या प्रकारे वादळाचे हल्ले वाढले आहेत, तो आपल्यासाठी गंभीर इशारा आहे.

विकासाच्या नावाखाली निसर्गाचे शोषण करून आपण जे पर्यावरणीय असंतुलन निर्माण केले आहे ते माणसाला आणखी संकटात टाकू शकते. हवामानात होणारे बदल लक्षात घेऊन पृथ्वीचा बचाव करण्याच्या उद्देशाने 1994 मध्ये पहिले जागतिक राष्ट्रीय संमेलनही झाले होते; पण आपापले औद्योगिक हित लक्षात घेऊन कोणताही विकसित देश कार्बनमध्ये कपात करण्यास तयार झाला नव्हता. 1994 नंतर कार्बन उत्सर्जनात आणखी वाढ झाली. त्याचे परिणाम काय होतात, ते आता आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेत. असे असूनही कॉप-29 परिषद तापमानवाढ व हवामान बदलांबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत कोणत्याही ठोस निर्णयांविना पार पडते, यावरून विकसित देशांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन लक्षात येतो. आपल्यालाही आता सातत्याने घडणार्‍या अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये काही वेगळे वाटत नाही, इतक्या त्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अशाप्रकारच्या आपत्ती आल्या की, त्यामागे निसर्गाचे शोषण कारणीभूत आहे, असे आपण म्हणू लागतो आणि यापुढे निसर्गाचे संरक्षण करण्याचे संकल्पही केले जातात; पण पुन्हा पहिलेे पाढे पंचावन्नच सुरू होतात. भविष्यात अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना आळा घालण्यासाठी निसर्गाची सातत्याने होणारी लूट थांबवावी लागेल. जंगलांची संख्या वाढवावी लागेल. बेसुमार वृक्षतोड थांबवून वनीकरण करावे लागेल. सबंध पृथ्वी गिळंकृत करू पाहणारा प्रदूषणाचा महाराक्षस नियंत्रणात आणावा लागेल; अन्यथा भविष्यात निसर्गाचा प्रकोप आणखीनच वाढत जाईल आणि त्याच्याशी सामना करणे माणसाला अशक्य होऊन जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT