डॉ. जयदेवी पवार
पाच वर्षांपूर्वी जगाला कोरोना महामारीच्या गर्तेत ढकलणार्या चीनने पुन्हा एकदा जैविक युद्ध छेडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी थेट जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेला लक्ष्य केले असून तेथील तपास यंत्रणांच्या सजगतेमुळे भला मोठा अनर्थ होता होता टळला आहे. अमेरिकेतील न्यायालयात उघड झालेल्या माहितीनुसार, चीनमधून दोन नागरिकांनी ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम’ नावाचा अत्यंत घातक फंगस अमेरिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या या कृतीला ‘अॅग्रो टेररिझम’ म्हणजेच कृषी दहशतवाद असे म्हटले जात आहे.
जागतिक समुदायात अलीकडील काळात चीनची प्रतिमा अविश्वासू देश अशी बनली आहे. विशेषतः 2020 मध्ये संपूर्ण जगाला ज्या महामारीच्या संकटाचा सामना करावा लागला त्या कोव्हिड विषाणूंचा उगम आणि प्रसार चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतूनच झाला होता; पण चीनने जाणीवपूर्वक ही बाब लपवून ठेवली आणि त्यामुळे जगाला शतकातील सर्वांत मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यावेळी जगभरातील अनेक तज्ज्ञांकडून चीनच्या धूर्त चालींची आणि खासकरून जैविक हत्यारांसंदर्भातील धक्कादायक माहिती पुढे आणण्यात आली होती. आता अमेरिकेत उघडकीस आलेल्या एका गंभीर प्रकरणामुळे चीनच्या जैविक हत्यारांच्या साठ्याबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यावेळी चीनवर ‘अॅग्रो टेररिझम’ म्हणजेच कृषी दहशतवाद पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
अमेरिकेतील न्यायालयात उघड झालेल्या माहितीनुसार, चीनमधून दोन नागरिकांनी एक अत्यंत घातक फंगस अमेरिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. युनकिंग जियन (वय 33) आणि जुनयोंग लियू (वय 34) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम’ नावाचा अत्यंत घातक फंगस जप्त करण्यात आला आहे. एफबीआय या अमेरिकन तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हा फंगस चीनमधून तस्करी करून आणला गेला आणि त्याचा उद्देश केवळ कृषी पिके नष्ट करणे नव्हता, तर तो मानव आणि प्राण्यांसाठीही घातक ठरू शकतो. अमेरिकेने या घटनेला ‘अॅग्रो टेररिझम’ म्हणजेच कृषी दहशतवाद असे संबोधले आहे.
फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम म्हणजे काय?
फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम हा एक अत्यंत हानिकारक फंगस असून तो प्रामुख्याने गहू, तांदूळ, मका आणि बार्ली (जव) यासारख्या धान्यांवर परिणाम करतो. या फंगसमुळे ‘हेड ब्लाईट’ नावाचा रोग पिकांवर पसरतो. याचा प्रादुर्भाव इतका प्रचंड असतो की, संपूर्ण पीक खराब होऊ शकते.
कोणत्याही प्रकारचे फंगस म्हणजेच कवक हे पिकांमधील अन्न घटकांमध्ये विषारी तत्त्व निर्माण करणारे ठरू शकते. फ्यूजेरियम ग्रॅमिनेरममुळे पिकांमध्ये मायकोटॉक्सिन्स नावाचे घटक तयार होतात जे मानव व प्राणी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. हे विष यकृतावर परिणाम करते. तसेच गर्भधारणेत अडथळे निर्माण करू शकतात. दरवर्षी जगभरात या फंगसमुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसाने होते. फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम हा फंगस अतिशय सूक्ष्म असतो. त्यामुळे तो सहज ओळखता येत नाही; पण हवा, माती आणि बियाणांद्वारे झपाट्याने पसरतो. सुरुवातीला त्याची लक्षणे सामान्य पिकांच्या रोगांसारखीच असतात. माणसांमध्ये जेव्हा याचे निदान होते, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. म्हणूनच हा एक जैविक युद्धाचे मूक शस्त्र ठरू शकतो.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार युनकिंग जियन ही चिनी कम्युनिस्ट पक्षाची सदस्य आहे आणि तिला चीन सरकारकडून या फंगसवर काम करण्यासाठी निधी मिळालेला होता. तिचा प्रियकर जुनयोंग लियू चीनमधील एका विद्यापीठात याच फंगसवर संशोधन करत होता. लियूने कबूल केलं आहे की, त्याने हा फंगस तस्करी करून अमेरिकेत आणला. यामागे चीनची सुनियोजित रणनीती असल्याने त्याला अॅग्रो टेररिझम म्हटले जात आहे. यून्किंग जियान आणि जुनयोंग लियू या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 33 वर्षांची जियान आणि 34 वर्षांचा लियू हे दोघंही चीनचे नागरिक आहेत. त्यांच्यावर अमेरिकेतील अधिकार्यांनी षडयंत्र रचल्याचा, देशात तस्करी केल्याचा, खोटे विधान दिल्याचा आणि व्हिसा फसवणुकीचे आरोप लावले आहेत.
‘अॅग्रो टेररिझम’ म्हणजे काय?
‘अॅग्रो टेररिझम’ म्हणजे शत्रूराष्ट्राच्या अन्नसाखळीवर, कृषी यंत्रणेवर आणि पशुधनावर जैविक किंवा रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने घातपात घडवून आणण्याची कृती. यामागे केवळ अन्नाचा तुटवडा निर्माण करणे नाही, तर त्या देशात अस्थिरता, आर्थिक नुकसानी आणि भयाचे वातावरण तयार करणे हाही उद्देश असतो. लष्करी किंवा आर्थिक व्यवस्था अत्यंत संरक्षित असतात; परंतु शेती, अन्न प्रक्रिया केंद्रे, गोदामे व वाहतूक व्यवस्था विखुरलेल्या, असंरक्षित आणि जैविक आक्रमण ओळखण्यात कठीण अशा असतात. एका छोट्याशा विषाणू किंवा बुरशीच्या साहाय्याने शेकडो कोटी रुपयांचे नुकसान घडवता येते.
दहशतवादी हल्ले करण्यासाठी बॉम्ब तयार करणे, ते प्लांट करणे, त्यासाठी नेटवर्क उभे करणे असे बरेच सायास करावे लागतात; पण अॅग्रो टेररीझममध्ये पिकांवर विषारी बुरशी/कीटक टाकणे, पाळीव प्राण्यांमध्ये रोग पसरवणे (बर्ड फ्लू), सिंचन आणि वितरण व्यवस्थेत छेडछाड करणे, गोदामे, बियाणे केंद्रे, शेतमाल प्रक्रियेच्या यंत्रांवर हल्ले करणे, विषारी बी-बियाणांचे वितरण करणे यासारख्या गोष्टी सहजगत्या केल्या जाऊ शकतात.
दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणार्यांचे किंवा जखमी होणार्यांचे प्रमाण तुलनेने कमी असते; पण अॅग्रो टेररीझमचे परिणाम अत्यंत भीषण आणि दूरगामी स्वरूपाचे असू शकतात. यामध्ये उत्पादन घटल्याने अन्नटंचाई व दरवाढ होणे, शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढणे, जागतिक बाजारपेठेत देशाची बदनामी होणे, देशाच्या निर्यातीत लक्षणीय घट होणे, त्याचा परिणाम म्हणजे परकीय चलनाचा तुटवडा निर्माण होणे, आरोग्य यंत्रणेवर व सरकारी योजनांवर आर्थिक दबाव येणे अशा अनेक पातळ्यांवर परिणाम दिसू शकतो. चीनचे अमेरिकेतील षड्यंत्र वेळीच उघडकीस आले नसते, तर अनर्थ घडला असता. त्यामुळे ही घटना केवळ एका देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची बाब नाही, तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जैविक युद्ध प्रकार आहे. अन्नसाखळीवर हल्ला म्हणजे समाजाच्या मूलभूत गरजांवर आघात आहे.
आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आणि जैविक अस्त्रांच्या वापराच्या बाबतीत अनास्था यामुळे चीनची प्रतिमा सातत्याने संशयाच्या भोवर्यात सापडते. पाच वर्षांपूर्वी जगाला महाभयंकर कोरोनाच्या लाटेमध्ये ढकलण्यास चीनच कारणीभूत होता. त्यावेळीही चीनने जगाविरुद्ध छेडलेले हे जैविक युद्ध आहे, असे आरोप करण्यात आले होते. ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनेरम’ हा फक्त एक बुरशी नसून, तो एका नव्या युद्ध प्रकाराची नांदी ठरू शकते. जागतिक समुदायाला आता एकत्र येऊन अशा जैविक घातपातांविरोधात कठोर आंतरराष्ट्रीय नियम बनवण्याची गरज आहे.
भारतात शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेतीशी जोडलेली आहे. त्यामुळे भारतही चीनच्या निशाण्यावर आहे. पंजाब, राजस्थान व हिमाचल ही राज्ये चीन व पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत आणि हे दोन्ही देश भारताचे शत्रू आहेत. बांगला देशही आता या वाटेवर आहे. विशेषत: 2016 मध्ये बांगला देशातून आलेल्या विषारी फंगसने पश्चिम बंगालच्या दोन जिल्ह्यांमध्ये मोठी हानी केली होती. त्यामुळे अमेरिकेतील घटनेनंतर भारताने अत्यंत सावध व सजग राहण्याची गरज आहे.