बालमनातील क्रौर्य  
बहार

बालमनातील क्रौर्य

पुढारी वृत्तसेवा

समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत ८ वर्षांचा मुलगा ६ वर्षांच्या मुलीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करताना दिसतो. ही घटना बालकांच्या बदलत्या मानसिकतेबरोबरच कौटुंबिक वातावरण, डिजिटल माध्यमांचा प्रभाव आणि शालेय सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

बालपण हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडण्याचा काळ असतो. या काळात मनावर उमटणारे अनुभव, आजूबाजूला दिसणारे वर्तन आणि नकळत रुजणार्‍या सवयी पुढील आयुष्याची दिशा ठरवत असतात. बदलत्या काळात समाज म्हणून आपण मुलांना नेमके कोणते वातावरण देत आहोत, त्यांच्या भावविश्वात कोणत्या गोष्टी रुजवत आहोत आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे संगोपन करण्यात कुठे कमी पडत आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. हरियाणातील पंचकुला येथील एका खासगी शाळेत घडलेल्या कथित घटनेने हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत ८ वर्षांचा मुलगा ६ वर्षांच्या मुलीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करताना दिसतो. एवढ्या लहान वयातील मुलाकडून अशा प्रकारची हिंसा घडणे ही घटना बालकांच्या बदलत्या मानसिकतेबरोबरच कौटुंबिक वातावरण, डिजिटल माध्यमांचा प्रभाव आणि शालेय सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. विशेषतः ज्या वयात मुलांनी मैत्री, सहकार्य आणि संवेदनशीलता शिकायची असते, त्याच वयात त्यांच्या वर्तनात हिंसक प्रवृत्ती दिसून येणे ही संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे.

शाळकरी मुलांमध्ये भांडणे, मतभेद, चिडवाचिडवी किंवा किरकोळ मारामार्‍या होणे नवीन नाही. पूर्वी अशा घटना घडल्या की, शिक्षक किंवा पालकांच्या मध्यस्थीने त्या मिटवल्या जात. मात्र, पंचकुला येथील घटनेतील मारहाणीचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. उपलब्ध वर्णनानुसार, मुलाने इतरांच्या नजरेआड असलेल्या ठिकाणी मुलीवर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात नोंदली गेल्यामुळे समोर आली. अन्यथा एवढ्या लहान मुलाकडून अशा प्रकारची मारहाण होऊ शकते, यावर विश्वास ठेवणेही अनेकांना कठीण गेले असते.

या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेतील संभाव्य त्रुटीही समोर येतात. शाळेच्या आवारात असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असते. शेवटचा विद्यार्थी शाळेबाहेर पडेपर्यंत देखरेखीची प्रभावी व्यवस्था असणे आवश्यक आहे. लहान मुले शिक्षकांच्या किंवा इतर जबाबदार कर्मचार्‍यांच्या देखरेखीशिवाय किती वेळ राहतात, शाळेतील निर्जन भागांमध्ये सुरक्षेची कोणती व्यवस्था असते आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळते का, या प्रश्नांची उत्तरे शाळा प्रशासनाने दिली पाहिजेत.

या घटनेनंतर पालकांच्या मनात निर्माण झालेली भीती स्वाभाविक आहे. शाळेत पाठवलेले आपले मूल सुरक्षित परत येईल का, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. त्याचवेळी शिक्षक आणि पालकांनी बदलत्या काळातील बालमानसशास्त्र अधिक गांभीर्याने समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

आज मुलांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षकांबरोबरच मोबाईल, इंटरनेट, समाजमाध्यमे आणि ऑनलाईन खेळ यांचीही मोठी भूमिका आहे. अनेकदा पालक स्वतःच्या कामात व्यग्र असताना किंवा विश्रांतीसाठी मुलांच्या हातात मोबाईल देतात; मात्र त्या माध्यमातून मुलांपर्यंत कोणता आशय पोहोचतो, याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. हिंसक दृश्ये, मारामारीचे खेळ आणि आक्रमक वर्तनाचे चित्रण यांचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, हा आता गांभीर्याने विचार करण्याचा विषय बनला आहे. पंचकुला येथील घटनेच्या संदर्भात संबंधित मुलगा ‘फ्री फायर’ हा ऑनलाईन खेळ खेळत असल्याची चर्चा होत आहे. या खेळात शस्त्रे, गोळीबार आणि प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यावर भर असतो. त्याचा या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम झाला का, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

शालेय हिंसाचाराच्या यापूर्वी घडलेल्या काही घटनांकडे पाहिले, तर या समस्येचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते. सप्टेंबर २०१७ मध्ये हरियाणातीलच गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७ वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या झाली होती. सुरुवातीला शाळेच्या बसवाहकाला अटक करण्यात आली; मात्र पुढे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात त्याच शाळेतील इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यावर संशय व्यक्त करण्यात आला. परीक्षा आणि पालक-शिक्षक बैठक पुढे ढकलण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचा तपास यंत्रणेचा आरोप होता. या प्रकरणाने शालेय सुरक्षा, तपासातील त्रुटी आणि अल्पवयीन मुलांच्या हिंसक वर्तनाविषयी देशभर चर्चा घडवून आणली होती.

ऑगस्ट २०२४ मध्ये राजस्थानातील उदयपूरमध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांमधील वादातून एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. शालेय विद्यार्थ्यांमधील किरकोळ वाटणारा वाद किती गंभीर स्वरूप धारण करू शकतो, याचे हे उदाहरण होते.

हिंसक खेळ किंवा चित्रफिती पाहणारे प्रत्येक मूल हिंसक बनते, असे नाही. मुलांचे वर्तन घडवण्यात कौटुंबिक वातावरण, भावनिक सुरक्षितता, मित्रपरिवार, शालेय अनुभव आणि मानसिक आरोग्य अशा अनेक घटकांचा सहभाग असतो. त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापरावर योग्य मर्यादा घालण्याबरोबरच त्यांच्याशी नियमित संवाद साधणे आवश्यक आहे. राग, निराशा आणि मतभेद यांना हिंसेशिवाय कसे सामोरे जायचे, हे मुलांना शिकवले पाहिजे.

बालकांमधील हिंसक वर्तन हा शिस्तीपेक्षाही त्यांच्या भावनिक विकासाशी आणि सामाजिक वातावरणाशी संबंधित आहे. त्यामुळे हिंसा करणार्‍या मुलालाही योग्य मानसिक मूल्यमापन, समुपदेशन आणि सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याचवेळी पीडित बालकाचे संरक्षण आणि पुनर्वसन यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. मुलांना शिक्षण देतानाच त्यांच्यामध्ये संवेदनशीलता, सहानुभूती आणि आत्मसंयम विकसित करणे हीदेखील पालक, शिक्षक आणि समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT