ChatGPT | चॅटजीपीटी : एआयच्या क्षितिजावरला जादूगार  
बहार

ChatGPT | चॅटजीपीटी : एआयच्या क्षितिजावरला जादूगार

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद बेरी

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाची ही सर्वच दुधारी शस्त्रे आहेत. आपण थंडीमध्ये अधिक ऊब मिळवण्यासाठी शेकोटीच्या आगीत हात घालत नाही; पण ऊब जरूर घेतो अगदी तसाच वापर बहुआयामी जादूगाराचा आपण करायला काय हरकत आहे?

आमच्या प्रशस्त व्हरांड्यात बसून प्रात:काळाच्या वार्‍याच्या झुळकेचा आल्हाददायक तसेच चहापानाचा आस्वाद व पेपर वाचनाच्या आनंदामध्ये निवांत बसलो होतो. न जाणो माझी ही लागलेली थोडी तंद्री जावी म्हणून की काय, माझी पत्नी किचनमधून बाहेर आली आणि मला म्हणाली, "अहो, हे ‘चॅटजीपिटी’ म्हणजे काय भानगड आहे? आमच्या फेमिना क्लबच्या मिटिंगला माझ्या अनेक मैत्रिणी त्याच्या अनेक फायद्यांबद्दल बोलत होत्या.'' खडबडून थोडा जागा होत माझ्या मेंदूचा स्वीच ऑन केला आणि थोडा विचार करून म्हणालो, "अगं त्या चॅट नाही ‘चाट’ पदार्थाबद्दल बोलत असतील. कुणी तरी गणपत पाटील (जीपी) नावाच्या माणसाने Chat-GPT या फॅन्सी नावाखाली ‘चाट’चे आऊटलेट काढले असेल. तथापि, त्या मैत्रिणींना म्हणावं, जोधपुरचाच ‘चाट’ बेस्ट आहे. दुसरा एक मला वाटणारा पर्याय म्हणजे ‘चॅटजीपी’ नावाचा ‘टी’ म्हणजे ‘चहा’ मार्केटला आला असेल. त्याबद्दल त्या बोलत असतील."

माझ्या दोन्ही पर्यायांवर ती काही फारशी समाधानी दिसली नाही, तरी पण थोड्या आशेने तिने मला विचारले. तसेच आमच्या क्लबमधील तरुण मैत्रिणी एका ‘डीपसिक’ अशा काहीतरी नावाच्या आयात झालेल्या एका अपूर्वाईबद्दल आलेल्या चर्चा करत होत्या. ते काय बरे असावे?''

''अगं...... डीप-सिक म्हणजे भूगर्भात खोलवर जाऊन काहीतरी हुडकणे. ते करणार्‍या नवीन यंत्रसामग्रीचे किंवा मशिनचे वर्णन असेल!''

या दोन्ही उत्तरांवर अरेरे! आपला नवरा वयानुसार ‘आऊटडेटेड मॉडेल’ झाला आहे, अशा कणवेपोटी येणार्‍या नजरेने माझ्याकडे पाहिले.

मलाही अंतर्मनात वाटत होते की, आपण काहीतरी उत्तरे ठोकून दिली आहेत आणि तिने वर्णन केलेल्या या दोन चीजा काय आहेत, याची खरी उत्तरे हुडकण्याच्या कामाला लागलो.

गुगल सर्च केल्यावर कळाले, हे दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘ॲप्स’ आहेत.

कुतूहल म्हणून ॲप्सची योग्य ती वर्गणी भरून लॉगीन केल्यावर अल्लाउद्दिनच्या जादुई सुरईतील राक्षसाप्रमाणे हा ‘चॅटजीपीटी’ माझ्या स्क्रीनवर दाखल झाला आणि म्हणाला, मला काहीही वेगवेगळे ‘प्रॉम्प्ट’ टाका, त्या सर्वांचे उत्तर त्वरित देण्यास चोवीस तास मी हजर आहे, ''आका! मागण्याची आज्ञा करा!"

पहिला विचार आला, "आधी तू कुठे राहतोस, ते सांग. मग, आपण बोलू !'' लगेच मनातून हा बालिश विचार काढून टाकला आणि माझ्या डोक्यात सध्या सतावत असलेला प्रश्न विचारला.

"मी सीनिअर सिटीझन आहे व माझ्याकडे सध्या गुंतवणुकीसाठी आठ लाख आहेत. ते सुरक्षित राहून योग्य फायदा देणार्‍या कुठल्या-कुठल्या विविध म्युच्युअल फंड्समध्ये मी पैसे कसे-कसे गुंतवू ते मला सांग!''

त्याने एक मिनिटाचाही विचार न करता भराभर पर्याय दिले. लक्षात आले की, हा नवा अवतार काम्प्युटरचे बकासुरपेक्षाही जलद ‘बाईट्स’ खात होता.

''‘आका’ आता पुढचे काम सांगा'' असा त्याचा पवित्रा दिसला. हे सर्व प्रकरण पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे सांगितल्याबरोबर ‘टोपी’तून काहीही बाहेर काढणार्‍या जादूगाराप्रमाणे मला वाटत होते.

माझे फक्त बोलणे ऐकून पत्र टाईप करणे, गोव्याला पंधरा ऑगस्टच्या लाँग वीकेंडला जायची छोटी सहल प्लॅन करून देणे, तसेच येत्या दिवाळीतील तामिळनाडूच्या दहा दिवसीय ट्रिपचे प्लॅनिंग करून देणे, आलेल्या लग्नाच्या निमंत्रणांना उत्तरे देणे, बिल्डिंगचा नकाशा दिला की, त्याचे अंदाजे त्रिमिती चित्र बनवणे इत्यादी कामे तो झटापट करू लागला.

लगोलग ‘डिपसिक’चा पण अभ्यास चालू केला व त्याच्याही खासियती समजावून घेतल्या.

या दोन्ही ‘ॲप्स’चे प्रयोग महिनाभर करून प्रयोग आत्मसात झाल्यावर व पूर्ण खात्री झाल्यावर आमच्या मॅडमबरोबर या दोन्ही विषयांवरचे आत्मविश्वासपूर्वक बौद्धिक घेतले.

सविस्तर वर्णनाआधी विजयश्रीच्या अविर्भावात मी जाहीर केले..... ''सगळी उत्तरे मिळाली.''

''चॅटजीपीटी म्हणजे स्वत:ची प्रचंड बुद्धी वापरून कुठल्याही बिझनेसच्या वेळखाऊ कामांमध्ये विविध पर्याय देणारा व कधीही न थकणारा एक जबरदस्त ‘ऑफिस असिस्टंटच’ आहे असे समज.''

''आपल्या मोबाईलमधील संदेश दुरुस्त करणे, ऑनलाईन भाषांतर करणे, मार्गदर्शन करणे हे तो करत आहेच शिवाय नजीकच्या काळात घरातील एअर कंडिशनर व इतर उपकरणे व त्याची सेटिंग स्वतः निर्णय घेऊन चालू किंवा बंद करू शकेल. आपण रात्री बाहेर गेलेलो असलो, तर आपण घरात पोहोचण्यापूर्वी एसी सुरू होईल इत्यादी.''

मी बोलतच होतो...

''तसेच आपल्या फ्रिजमध्ये दूध किंवा लोणी कमी झाल्याचे त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला समजेल आणि ते ऑनलाईन मागवण्याची आपल्याला सूचना देईल.''

या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात सामाजिक स्तर, शासन व्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठे बदल येऊ शकतील.

''अरे, हो राहिलेच की'', ती म्हणाली, ‘डीपसिक’ म्हणजे काय ते तुम्ही सांगितलेच नाही. दोन्हीत फरक काय आहे?''

''अगं, ‘चॅटजीपिटी’ जास्ती सर्जनात्मक विचार करू शकतो; पण ‘डीपसिक’ हे गणितीय तार्किक प्रश्न तसेच तात्विक प्रश्न अधिक चांगले सोडवते.''

हे शांतपणे ऐकून घेतल्यावर सौभाग्यवतींनी सर्वांच्या मनात असलेलाच मुद्दा मांडला, ''काळ पुढे सरकेल तसा आपल्याला या सर्व आभासी मदतनीसांच्या वापराचे व्यसन लागले आणि त्यापुढे आपली देवदत्त निर्णय क्षमता गंजून गेली तर काय होईल? हे दोन्ही राक्षस आपल्या जीवनात येऊ द्यायचे का?''

मी म्हणालो, ''सर्वात वाईट म्हणजे अजून दोन वर्षांनी नी ‘ॲप्स’ इत्यकथा स्वनिर्णयक्षमीत असतील तर आपल्या संगणकावर ज्याप्रमाणे एखादा साळसूद रिपेयरमन आपल्या घरात येतो आणि घर लुटून जातो त्याप्रमाणे ‘पॉलिमॉर्फिक मालवेअर’चा सुळसुळाट होण्याची शक्यतापण आहे.

खरे सांगू! मी आमच्या कॉफी क्लबमध्ये ऐकलेले वाक्य ठोकून देत होतो, मलाही निश्चित माहीत नव्हते हे ‘मालवेअर’ निश्चित काय दुष्परिमाण करेल?

कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक, नोबेल विजेत्या जीओफ्रे हिंटनची मुलाखत मी काही दिवसांपूर्वी पाहिली. त्यालाही कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा जादूगार आपल्या पोतडीतून भविष्यात काय बाहेर काढेल, हे ठामपणे माहीत नव्हते. मी समारोपाचे वाक्य उत्तरलो, ''एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाची ही सर्वच दुधारी शस्त्रे आहेत. थोडक्यात, आपण थंडीमध्ये अधिक ऊब मिळवण्यासाठी शेकोटीच्या आगीत हात घालत नाही; पण ऊब जरूर घेतो. अगदी तसाच वापर या बहुआयामी जादूगाराचा आपण करायला काय हरकत आहे?''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT