विवेक कुलकर्णी
क्रिकेटचे मैदान असो किंवा गल्लीतलं खेळणं, भारतीयांच्या रक्तातच हे वेड भिनलेलं आहे; पण 2026 च्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जागतिक क्रिकेटने एक अत्यंत रंजक आणि कौतुकास्पद वास्तव जगासमोर आणले आहे. आपण जेव्हा टीव्हीवर सामना पाहायला बसतो, तेव्हा केवळ निळ्या जर्सीतले भारतीय खेळाडूच आपल्याला दिसत नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघांच्या जर्सीमध्येही अनेक ‘भारतीय चेहरे’ आपले लक्ष वेधून घेतात. मग तो संघ अमेरिकेचा असो, स्कॉटलंडचा असो किंवा अगदी नवख्या इटलीचा. यंदाचा विश्वचषक हा केवळ काही देशांमधील स्पर्धा राहिली नसून, तो भारतीय प्रतिभेचा जागतिक गौरव सोहळा ठरला आहे.
एकेकाळी क्रिकेट म्हणजे ठरावीक 8-10 देशांचा खेळ मानला जायचा; पण काळ बदलला आणि खेळाचे स्वरूपही बदलले. यंदाच्या स्पर्धेत अमेरिका, स्कॉटलंड आणि इटलीसारख्या देशांनी जो उत्साह दाखवला, तो पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे, या देशांना क्रिकेटच्या नकाशावर ठळकपणे उमटवण्यामागे मूळ भारतीय वंशाच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. साधारणपणे 40 पेक्षा अधिक मूळ भारतीय खेळाडूंनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर प्रस्थापित संघांच्या नाकात दम आणत क्रिकेटमधील ‘अंडरडॉग्ज’चा काळ आता सुरू झाला असल्याचे संकेत दिले आहेत. इटलीसारख्या फुटबॉलवेड्या देशातही आता क्रिकेटची चर्चा होऊ लागली आहे, याचे श्रेय तिथे स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंना जाते.
परदेशी संघांमधील ‘भारतीय’ कणा
या विश्चषकातील सर्वात मोठी चर्चा झाली ती अमेरिकेच्या संघाची. पाकिस्तानसारख्या माजी विजेत्या संघाला ज्या अमेरिकेने पराभवाची धूळ चारली, त्या संघाचा मुख्य कणा हे भारतीय वंशाचे खेळाडू होते. मुंबईच्या मातीत क्रिकेटचे धडे गिरवलेला सौरभ नेत्रावळकर जेव्हा अमेरिकेसाठी निर्णायक कामगिरी बजावतो, तेव्हा ती केवळ अमेरिकेची कामगिरी उरत नाही, तर ती भारतीय क्रिकेटच्या संस्कृतीची ताकद ठरते. मोनांक पटेल, हरमीत सिंग यांसारख्या खेळाडूंनी अमेरिकेच्या क्रिकेटला जी नवी दिशा दिली आहे, ती थक्क करणारी आहे. फक्त अमेरिकाच नाही, तर ओमान, स्कॉटलंड आणि युगांडा यांसारख्या संघांमध्येही भारतीय नावांचा दबदबा दिसून येतो आहे, हे देखील तितकेच लक्षवेधी.
प्रतिभेचे स्थलांतर आणि संधीचे सोने
हे चित्र का निर्माण झाले, याचा विचार केला, तर लक्षात येते की, भारतात क्रिकेटचे टॅलेंट अफाट आहे. भारतात प्रत्येक गल्लीत एक उत्तम खेळाडू मिळतो; पण राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी लागणारी स्पर्धा अत्यंत तीव्र असते. अशा वेळी अनेक गुणवान खेळाडू शिक्षण किंवा नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक होतात. तिथे गेल्यावरही त्यांच्यातील क्रिकेटचा खेळाडू जिवंत राहतो. आयटी क्षेत्रात काम करताना किंवा व्यवसाय सांभाळताना ते तिथल्या स्थानिक क्लबमधून खेळतात आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर थेट राष्ट्रीय संघापर्यंत मजल मारतात. ही केवळ क्रिकेटची आवड नाही, तर ‘दुसऱ्या संधीचे’ सोने करण्याची जिद्द आहे.
कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमधील भारतीय वाटा
केवळ मैदानावरील 11 खेळाडूंमध्येच नाही, तर मैदानाबाहेरही भारतीयांचा मोठा प्रभाव आहे. अनेक छोट्या देशांच्या संघांचे मुख्य प्रशिक्षक, फिजिओ किंवा विश्लेषक हे भारतीय आहेत. भारतीय प्रशिक्षकांकडे असलेला तांत्रिक अनुभव आणि सामन्याची परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य यामुळे नेदरलँड, नेपाळ आणि आफ्रिकन देशांतील संघांचा दर्जा सुधारला आहे. भारतीय प्रशिक्षक या देशांमधील स्थानिक खेळाडूंना तयार करण्याचे काम करत आहेत. यामुळे या खेळाचे जागतिकीकरण अधिक वेगाने होत आहे.
भारतीय प्रतिभेचा जागतिक प्रभाव
भारत हा जगाला तंत्रज्ञ, इंजिनिअर्स पुरवणारा देश म्हणून ओळखला जातोच शिवय आता आपण जगाला ‘क्रिकेटची संस्कृती’ निर्यात करत आहोत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या देशांमध्ये क्रिकेट हा खेळ दुय्यम मानला जायचा, तिथे या भारतीय वंशाच्या खेळाडूंनी एक नवी क्रेझ निर्माण केली आहे. यामुळे क्रिकेटचा दर्जा सुधारण्यास तर मदत होत आहेच शिवाय खेळाचा प्रसार अशा ठिकाणी होत आहे, जिथे फुटबॉल किंवा बास्केटबॉलचे वर्चस्व आहे. ही एक प्रकारची ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, जी खेळाच्या माध्यमातून भारताचे नाव जगभर पोहोचवत आहे. अन् म्हणूनच यंदाचा विश्वचषक एका नव्या युगाची नांदी ठरतो आहे. मैदानावर दोन भिन्न देशांचे ध्वज फडकले असले, तरी खेळाडूंच्या मुळांमध्ये असलेला भारतीय संस्कार हा खेळाला अधिक समृद्ध करत आहे. भविष्यात जेव्हा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, तेव्हा अशा अनेक ‘लहान’ देशांकडून खेळणारे ‘भारतीय’ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. भारतीय खेळाडूंच्या या जागतिक भरारीमुळे क्रिकेट आता खऱ्याअर्थाने ‘ग्लोबल’ झाले आहे. ज्या देशांना आपण छोटे समजत होतो, त्या देशांच्या विजयात भारतीय रक्ताचा वाटा असणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. शेवटी, खेळ कोणताही असो, विजयाचा गुलाल जेव्हा भारतीय हातांनी उधळला जातो, तेव्हा त्याचे समाधान काही वेगळेच असते, हाच त्याचा मथितार्थ!