RSS 100 years | संघाची शतकोत्तरी साद 
बहार

RSS 100 years | संघाची शतकोत्तरी साद

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

प्रगत होणार्‍या समाजात नागरिकांना हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवावी लागते. युरोपात नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची चांगलीच जाण आहे, असे म्हणतात. ही जाण भारतात निर्माण व्हावी तसेच विश्वगुरू होण्यासाठी आवश्यक ते सगळे करायला संघ पुढे आला आहे. फक्त या कामांमध्ये आता संघाला सर्वांचीच मदत हवी आहे.

संघाला आता कोणत्याही वादात न पडता सर्वसमावेशक भूमिका घेत जो जो येईल त्याला यात्रेत सामील करून निहित कार्य पूर्ण करायचे आहे. ते स्पष्ट दिसते आहे. त्यासाठी प्रत्येकाशी संवाद साधणे, प्रत्येक घरात पोहोचणे, गृह संपर्काच्या मार्फत संघाची माहिती घराघरांत पोहोचवणे हा संघाने हाती घेतलेला एक मोठ्या मोहिमेचा गाभा आहे. अर्थात, अशाप्रकारच्या संपर्क मोहिमा यापूर्वीही हाती घेतल्या गेल्या होत्या. अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी झाली तेव्हा सनदशीर मार्गाने न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार उभे झालेले हे मंदिर हा भारताचा अभिमान बिंदू असल्याचे सांगण्यासाठी घरोघरी या कार्यक्रमाच्या अक्षता विश्व हिंदू परिषदेतर्फे वाटल्या होत्या. देश अशा महत्त्वाच्या प्रसंगी एक होत असतो हे आजवर दिसले आहे. कोरोना काळात आरोग्यव्यवस्था राबवणार्‍या मंडळींसाठी थाळ्या वाजवायचे आव्हान केले गेले तेव्हाही अवघा भारत एक झाला होता. तो विधायक कामांसाठी एकत्र येतो काय? स्वतःला चांगुलपणाच्या चळवळीशी जोडून घेतो काय आणि त्यासाठी निष्ठेने प्रयत्न करतो काय, हा कायमच पुढे येत गेलेला प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात एक भावना असेल आणि देशाला मोठे करायचे असेल, तर विचारसरणी वेगळी असली, तरी आम्ही तुमचा आदर करू, असे सांगत संघाने वैचारिक मतभेद दूर करण्याची फार मोठी तयारी दाखवली आहे. अशाप्रकारचे प्रयत्न मोहन भागवत कायम करत असतात. अल्पसंख्याक मुस्लीम समुदायांशी, त्यांच्यातील संघटनांशी संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील ते करत असतात.

भारताला विश्वगुरू करायचे असेल, तर येथील 14 टक्के समुदाय हा वेगळा मानून चालणार नाही, याची जाणीव भागवतांना आहे, हे वारंवार दिसत असते. उजव्या परिवारातील सर्वांनाच ही भूमिका मान्य असेल का, हे सांगता येणे कठीण असले, तरी अशी सर्व समावेशकता ही कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतेच. मुंबईतील व्याख्यानात मोहन भागवत यांनी भारतात राहणारे मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांची उपासना पद्धती भिन्न आहेत, एवढे सांगत त्यांनाही कवेत घेण्याचा प्रयत्न केला. या सबगोलंकारी विधानाला कितपत मान्यता मिळेल, हे सांगणे कठीण असले, तरी धर्मांतरण जबरदस्तीने करत नसाल, तर आम्हाला तुमच्या अस्तित्वाला नाकारायचे काही कारण नसल्याची एक महत्त्वाची भूमिका संघाने यानिमित्ताने जाहीर केली. या भूमिकेवर प्रतिक्रिया काय, ते अद्याप समजलेले नाही; मात्र सर्वांना एकत्र घेऊन भारतातील समाजाने काय करावे, याचीही रूपरेषा मोहनजींनी या कार्यक्रमादरम्यान विशद केली. याला संघ परिवारामध्ये पंच परिवर्तनाची सूत्रे असे नाव आहे. भारतातील संपूर्ण समाज एकादिलाने, एकमताने मोठे होण्यासाठी काम करणार नाही, तोवर भारत विश्वगुरू होऊ शकणार नाही. किंबहुना भारताची स्वयंपूर्ण राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होणार नाही, हेदेखील आडून भागवत यांनी स्पष्ट केले.

जे देश अशा पद्धतीचे ध्येय मनात बाळगून संयुक्तरीत्या काम करतात तेच राष्ट्र म्हणून उभे राहतात, असेही सांगायला ते विसरले नाहीत. हे सांगताना अमेरिका, जर्मनी यापासून तर अगदी साम्यवादी क्युबाचे नावदेखील भागवतांनी आवर्जून घेतले. आता भारताला परमवैभवाला न्यायचा असेल, तर काय करायचे, याबद्दलही संघाने काही प्रयत्न आखले आहेत. त्यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशीचा स्वबोध आणि नागरिक कर्तव्य असे पाच बिंदू परिवर्तनाचे मुद्दे म्हणून मांडले आहेत. हिंदू समाजातील जातिभेद आणि पंथभेद यामुळे समाज एकसंघ राहिला नाही आणि समाजात दुफळी असल्यामुळे प्रगती होऊ शकली नाही, हा जवळपास सर्व विचारधारांनी मान्य केलेला भाग. संघ त्याबद्दल काही पावले उचलून हे अवडंबर दूर करायचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक समरसतेबद्दल संघाची कामे कित्येक वर्षे सुरू आहेत, तरीही बौद्ध समाज, मुस्लीम समाज संघाला आपलेसे मानत नाही. अर्थात, त्यांनी आम्हाला आपलेसे मानावे आणि विकास यात्रेत सहभागी व्हावे, याचे आवाहनही मोहन भागवत यांनी केले आहे. कुटुंब प्रबोधन हा संघाला अभिप्रेत असलेला दुसरा महत्त्वाचा विषय. आधुनिक काळात जागतिकीकरण आणि वैश्विकीकरणाच्या लाटेतील कुटुंबे ही वेगळी झाली आहेत. या कुटुंबांची संस्कृती कुठेतरी पाश्चिमात्य ढंगाची होते आहे. त्यामुळेच भागवत यांनी बोलताना घरातील जेवण घरात शिजवा, कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी एकत्र जेवा, कधी तरी राज्यघटना एकत्रपणे वाचा इथपर्यंतच्या सर्व मुद्द्यांना स्पर्श केला.

एखाददिवशी बाहेर पिझ्झा खाल्ला तर हरकत नाही; परंतु दर आठवड्यात बाहेर जेवायला जायचे कारण नाही, असे सांगत त्यांनी मध्यमवर्गीय समाजातील सध्याच्या हॉटेलिंगच्या प्रथेवरदेखील अचूक बोट ठेवले. संघ अशापद्धतीने छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत काहीतरी बोलत असतो, हे संघाचे विरोधक लक्षात घेत असतीलच. विवाह संस्था आणि कुटुंब संस्था धोक्यात आली असताना कुटुंब प्रबोधनाकडे भारताने लक्ष देणे आवश्यक झाले असल्याचे संघाच्या या पंचपरिवर्तनातील दुसरे सूत्र. तिसरे पर्यावरणरक्षण. भारत हा विकसित राष्ट्रांच्या मालिकेत जाऊन बसणार असल्यामुळे काही पायाभूत प्रकल्प युद्ध गतीने राबवले जात आहेत. त्यासाठी होणारी वृक्षतोड, आधुनिक शहरांमधील प्रदूषणाची समस्या, वाहतुकीमुळे निर्माण होणारा धूर अशा सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी संघाने पर्यावरणाला महत्त्व दिलेले दिसते. छोट्या-छोट्या गोष्टींचाही विचार करत बायोडिग्रेडेबल प्लास्टिक वापरा, जे प्लास्टिक वापरले आहे त्याच्या विटा करा आणि भविष्यात प्लास्टिक वापरू नका अशा छोट्या-मोठ्या कित्येक सूचना मोहनजींच्या भाषणात स्थान मिळवून जात होत्या; मात्र भाजपशासित राज्ये पर्यावरणाकडे लक्ष देत विकास करतील, याची खात्री संघ देऊ शकतो काय? स्वदेशी हा संघ परिवाराला एकेकाळी अत्यंत आपला वाटणारा विषय.

महात्मा गांधींच्या खालोखाल स्वदेशीवर भर देण्याचे काम संघ परिवारानेच केले, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. आता जेथे शक्य तेथेच आयात करावी, असा कळसुसंगत बदल भागवतांनी सांगितला. स्वदेशीचा अंगीकार करताना कुठेही अवास्तव कल्पना यावेळी संघाने मांडल्या नाहीत. जी उत्पादने भारतात होत नाहीत, ती निश्चितपणे बाहेरून विकत घ्यावीत असे सांगताना घरातील खाद्यपदार्थांचे कौतुक करायलाही भागवत विसरले नाहीत. हा त्यांना अभिप्रेत असलेला स्वबोध आहे. भारतातील कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी येथील स्वदेशी उत्पादने वापरली केली पाहिजेत, हा संघाचा हेतू एकाप्रकारे स्तुत्य आहे. त्याचबरोबर नागरिक कर्तव्य हा या एका मुद्द्यालाही संघ पंचपरिवर्तन सूत्रात हात घालतो आहे. प्रगत होणार्‍या समाजात नागरिकांना हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवावी लागते. युरोपात नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची चांगलीच जाण आहे असे म्हणतात. ही जाण भारतात निर्माण व्हावी, विश्वगुरू होण्यासाठी आवश्यक ते सगळे करायला संघ पुढे आला आहे. फक्त या कामांमध्ये आता संघाला सर्वांचीच मदत हवी आहे. ती मिळेल काय आणि मिळाली किंवा मिळाली नाही, तरी संघ भारताचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी होईल काय, हे बघणे महत्त्वाचे आहे. जगाची मीमांसा करणे सोपे; पण बदल घडवणे कठीण. शंभरीची वाटचाल केलेल्या संघाला हे कळत असणारच. न थकता, न थांबता त्यासाठी होणारे प्रयत्न हाही दखल घेण्याजोगा विषय आहे, हे मात्र खरे!

SCROLL FOR NEXT