ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
भारताचे 'ब्रह्मोस' हे सुपरसोनिक क्रूझ मिसाईल आज जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मिसाईलची मागणी जगभरात विशेषतः आग्नेय आशियाई आणि इस्लामिक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. इंडोनेशिया हा ब्रह्मोस खरेदी करणारा तिसरा महत्त्वाचा देश ठरला असून, यापूर्वी फिलिपिन्स आणि व्हिएतनाम यांनी या शस्त्रास्त्राची खरेदी केली आहे. याव्यतिरिक्त दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती, चिली आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांनीही ब्रह्मोस खरेदीमध्ये रस दाखवला आहे. याचे कारण, चीनसह पश्चिमी जगातील महागड्या बनावटींच्या संरक्षण प्रणाली कुचकामी ठरताना दिसताहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या आशिया-प्रशांत क्षेत्रातील तीन देशांच्या दौर्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे इंडोनेशियासोबतचा ब्रह्मोस करार. जकार्ता येथे पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या उपस्थितीत भारत आणि इंडोनेशियामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पुरवठ्याचा करार झाला. या कराराची किंमत सुमारे ६३० दशलक्ष डॉलर (सुमारे ५,४०० कोटी रुपये) असल्याचे मानले जाते. फिलिपिन्स आणि व्हिएतनामनंतर ब्रह्मोस खरेदी करणारा इंडोनेशिया हा तिसरा देश ठरला. भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाला आणि संरक्षण निर्यात धोरणाला यामुळे मोठे बळ मिळाले. याशिवाय अलीकडील काळात संयुक्त अरब अमिराती (यूएई) सोबतही ब्रह्मोस आणि आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीच्या संभाव्य निर्यात कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे; मात्र हा करार अद्याप अंतिम झालेला नाही. ‘ब्रह्मोस’ हा भारतीय सामरिक सज्जतेचा मेरुमणी आहे. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान या क्षेपणास्त्राने भारतीय लष्करासाठी खर्याअर्थाने ‘ब्रह्मास्त्र’ असल्याचे सिद्ध केले. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या हवाई तळांवर अचूक प्रहार करून त्यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर खिळखिळी करण्यात या क्षेपणास्त्राची निर्णायक भूमिका होती. परिणामी, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांच्या कारवायांवर मोठा परिणाम झाला आणि युद्धविरामाच्या दिशेने पाकिस्तानला वाटचाल करावी लागली, असे अनेक संरक्षणतज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे, ध्वनीच्या तिप्पट वेगाने झेपावणार्या या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राला पाकिस्तानच्या चीननिर्मित हवाई संरक्षण यंत्रणेला रोखणे अत्यंत कठीण ठरले. त्यामुळे ब्रह्मोसने केवळ भारताच्या लष्करी क्षमतेचेच नव्हे, तर स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या परिपक्वतेचेही प्रभावी प्रदर्शन घडवून आणले.
ब्रह्मोसची संकल्पना १९९१ च्या आखाती युद्धानंतर आकाराला आली. अमेरिकेने त्या युद्धात टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून इराकचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांची कमांड अँड कंट्रोल व्यवस्था आणि महत्त्वाच्या लष्करी सुविधा उद्ध्वस्त केल्या होत्या. त्या काळातील अत्याधुनिक हवाई संरक्षण व्यवस्थेलाही चकवा देणार्या या क्षेपणास्त्रांनी जगभरातील लष्करी रणनीतीत मोठा बदल घडवून आणला. त्यानंतर भारतानेही अशाच प्रकारचे अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी रशियाशी सहकार्याचा मार्ग स्वीकारला. १९९८ मध्ये मॉस्को येथे भारत-रशिया आंतरसरकारी करार झाला आणि त्यातून ब्रह्मोस एरोस्पेसची स्थापना झाली. भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांवरून या क्षेपणास्त्राला ‘ब्रह्मोस’ हे नाव देण्यात आले.
प्रारंभीच्या टप्प्यात भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचा (एमटीसीआर) सदस्य नव्हता. त्यामुळे ३०० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याचे आणि ५०० किलोग्रॅमपेक्षा जास्त पेलोड असलेले तंत्रज्ञान भारताला मिळू शकत नव्हते. त्यामुळे ब्रह्मोसची पहिली आवृत्ती २९० किलोमीटरच्या पल्ल्यापुरती मर्यादित ठेवावी लागली. आजही निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या आवृत्तीचा पल्ला त्याच मर्यादेत आहे; मात्र भारताने २०१६ मध्ये एमटीसीआरचे सदस्यत्व मिळवल्यानंतर संशोधनाला नवे दालन खुले झाले. त्यानंतर या क्षेपणास्त्राचा पल्ला टप्प्याटप्प्याने ४०० किलोमीटरपर्यंत आणि आता सुमारे ८०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. विस्तारित पल्ल्याची ही आवृत्ती लवकरच भारतीय सशस्त्र दलांमध्ये पूर्ण क्षमतेने दाखल होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कोणतेही लक्ष्य गाठणे शक्य असल्याचे स्पष्ट केले होते.
ब्रह्मोसची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा प्रचंड वेग. हे क्षेपणास्त्र सुमारे मॅक-३ म्हणजेच ताशी साडेतीन हजार किलोमीटरहून अधिक वेगाने झेपावते. इतक्या वेगामुळे शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला प्रतिसाद देण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळतो. उदाहरणार्थ, कमी उंचीवरून येणारे ब्रह्मोस एखाद्या रडारच्या कक्षेत आले, तरी प्रत्यक्ष लक्ष्यावर आदळण्यापूर्वी संरक्षण दलाकडे अवघे काही सेकंदच उपलब्ध असतात. त्या वेळेत लक्ष्य ओळखणे, त्याचा मागोवा घेणे, प्रतिकारक शस्त्र सज्ज करणे आणि अचूक हल्ला करणे हे जवळपास अशक्य ठरते. त्यामुळे ब्रह्मोसला अडविणे ही जगातील अत्यंत प्रगत हवाई संरक्षण व्यवस्थांसाठीही मोठी कसरत मानली जाते. या क्षेपणास्त्राची दुसरी महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, ते अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करते. पृथ्वीच्या वक्रतेमुळे रडार प्रणालींना कमी उंचीवर झेपावणारे लक्ष्य उशिरा दिसते. त्यामुळे शत्रूच्या रडारला ब्रह्मोसचा मागोवा घेण्यासाठी अत्यल्प वेळ मिळतो. तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा कमी रडार परावर्तन क्षेत्रफळ. त्यामुळे रडारवर त्याचा ठसा अत्यंत मर्यादित दिसतो आणि त्याचा अचूक मागोवा घेणे अधिक अवघड बनते. प्रचंड वेग, कमी उंचीवरील उड्डाण आणि कमी रडार परावर्तन या तीन घटकांच्या संयोगामुळे ब्रह्मोस जगातील सर्वाधिक प्रभावी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक ठरते.
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये या क्षेपणास्त्राने प्रत्यक्ष युद्धभूमीवर आपली परिणामकारकता सिद्ध केली. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या हवाई तळांवर झालेले अचूक प्रहार त्यांच्या हवाई मोहिमांसाठी मोठा धक्का ठरले. त्यामुळे ब्रह्मोसला आता केवळ तांत्रिक यश नव्हे, तर युद्धात सिद्ध झालेल्या शस्त्र प्रणालीचा दर्जाही प्राप्त झाला आहे. याच कारणामुळे फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनामसह अनेक देशांनी या क्षेपणास्त्राबद्दल रस दाखविला असून काही देशांनी त्याची खरेदीही केली आहे. भारतीय हवाई दलाकडेही ब्रह्मोसचा स्वतंत्र वापर आहे. जमिनीवरील प्रक्षेपण यंत्रणांव्यतिरिक्त विशेष सुधारित सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांवरूनही हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते. सध्या भारतीय हवाई दलाच्या १५ आणि २२२ या दोन स्क्वॉड्रनकडे ही क्षमता उपलब्ध आहे. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अशा हवाई प्रक्षेपणाचा प्रभावी वापर झाल्याचे सांगितले जाते.
ब्रह्मोसची वाढती क्षमता पाकिस्तानसाठी गंभीर चिंता बनली आहे. संघर्षानंतर पाकिस्तानचे वरिष्ठ नेते राणा सनाउल्ला यांनी ब्रह्मोस हल्ल्याच्या वेळी काही क्षणांसाठी हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेत आहे की काय, अशी भीती निर्माण झाल्याचे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात ब्रह्मोस अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी विकसित केलेले नाही; मात्र अशाप्रकारचे वक्तव्य या क्षेपणास्त्रामुळे प्रतिस्पर्ध्याच्या मानसिकतेवर होणारा परिणाम स्पष्ट करते. दुसरीकडे पाकिस्तानने चीनच्या मदतीने मॅक-३ वेगाचे फतह-३ क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्याची घोषणा केली आहे; मात्र भारताने 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान पाकिस्तानने डागलेले सीएम-४०० एकेजी सुपरसॉनिक क्षेपणास्त्र यशस्वीपणे पाडल्याचा दावा केला आहे.
ब्रह्मोसने भारताच्या संरक्षण निर्यात क्षेत्रालाही नवी दिशा दिली आहे. फिलिपिन्सने या क्षेपणास्त्राची खरेदी करून त्याची तैनाती सुरू केली आहे. इंडोनेशियानेही करार केला असून व्हिएतनामने तीव्र स्वारस्य दाखविले आहे. दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रसपाटीला लागून प्रचंड वेगाने झेपावणारे हे क्षेपणास्त्र जहाजविरोधी शस्त्र म्हणून अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यामुळे चीनच्या वाढत्या सागरी विस्तारवादाला रोखण्यासाठी अनेक देश भारताकडे विश्वासार्ह संरक्षण भागीदार म्हणून पाहू लागले आहेत.
दरम्यान, ब्रह्मोस एरोस्पेस पुढील पिढीचे ब्रह्मोस-एनजी विकसित करत आहे. हे क्षेपणास्त्र आकाराने लहान, वजनाने हलके, अधिक वेगवान आणि अधिक लांब पल्ल्याचे असेल. सध्याच्या आवृत्तीचे वजन जास्त असल्यामुळे ते प्रामुख्याने सुखोई-३० एमकेआयसारख्या मोठ्या लढाऊ विमानांवरूनच वाहून नेता येते; मात्र ब्रह्मोस-एनजीची रचना तेजससारख्या हलक्या लढाऊ विमानांवरूनही प्रक्षेपित करता येईल, अशी केली जात आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या आक्रमण क्षमतेत आणखी मोठी वाढ होणार आहे. सातत्याने होणारे संशोधन, वाढता पल्ला, सुधारित अचूकता आणि निर्यात क्षमतेमुळे हे शस्त्र भविष्यातील युद्धतंत्रातही भारताला आघाडीवर ठेवेल, यात शंका नाही.
ब्रह्मोस हे भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमध्ये कार्यरत असलेले शस्त्र आहे. भारतीय नौदलाने २००५ मध्ये आयएनएस राजपूत या युद्धनौकेवर सर्वप्रथम त्याची तैनाती केली. पुढील पिढीच्या युद्धनौकांमध्ये हे क्षेपणास्त्र उभ्या प्रक्षेपण प्रणालीद्वारे बसविण्यात आले असून जहाज कोणत्याही दिशेने जात असले, तरी कोणत्याही दिशेला हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते. भारतीय लष्कराने २००७ मध्ये पहिले ब्रह्मोस रेजिमेंट उभारले. या क्षेपणास्त्रामुळे कमांड केंद्रे, दारुगोळा साठे, इंधन साठे, दळणवळण व्यवस्था आणि अन्य महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर दूरवरून अचूक हल्ला करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अशा लक्ष्यांसाठी हवाई दलावर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली आहे.