Bondi beach terror attack | ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचा धडा 
बहार

Bondi beach terror attack | ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचा धडा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

सिडनी या ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या शहरातील बाँडी बीचवर 14 डिसेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला ‘लोन वुल्फ अ‍ॅटॅक’ या प्रकारातील असून या देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा हल्ला म्हणून त्याची नोंद झाली आहे. अलीकडील काळात टार्गेटेड किलिंगचा नवा प्रवाह दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिसून येत असून पहलगामप्रमाणे ऑस्ट्रेलियातील हल्लाही याच श्रेणीतील आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनी या अत्यंत महत्त्वाच्या शहरातील बाँडी हा जगातील सर्वांत गर्दीमय असणारा समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो; पण 14 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या बीचच्या सौंदर्याला आणि लोकप्रियतेला एक रक्तरंजित किनार जोडली गेली. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. या हल्ल्यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अशा 16 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी ठरली. याचे कारण हा हल्ला प्रामुख्याने ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यासाठी घडवून आणण्यात आला. परिणामी, या हल्ल्याचे पडसाद जगभर उमटताना दिसले.

हल्ल्यामागचे उद्दिष्ट

या हल्ल्याचे उद्दिष्ट विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणे होते. याला टार्गेटेड किलिंग असे म्हटले जाते आणि गेल्या काही वर्षांमध्ये हा प्रकार वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी केलेला हल्ला हादेखील टार्गेटेड किलिंगचाच प्रकार होता. भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये काही वर्षांपूर्वी बाहेरच्या राज्यातून आलेल्या कारागिरांना लक्ष्य करण्यात आले होते; पण ऑस्ट्रेलियामध्ये ज्यू समुदायाच्या लोकांना टार्गेट का करण्यात आले, हा कळीचा प्रश्न ठरतो.

इस्रायलचा संबंध काय?

या सर्व प्रकरणाची सुरुवात दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी झाली. या दिवशी हमास या संघटनेने इस्रायलवर अशाच पद्धतीने ज्यू समुदायाच्या व्यक्तींवर भीषण हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये 300 हून अधिक निष्पाप नागरिक मारले गेले होते. संरक्षण साधनसामग्रीच्या आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात देदीप्यमान प्रगती करणार्‍या इस्रायलच्या अभेद्य सुरक्षा कवचाला भेदून आणि मोसाद या जगातील सर्वांत नावाजलेल्या गुप्तहेर संघटनेला चकवा देऊन हमासच्या अस्त्रशस्त्रांनी आणि दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये अक्षरशः नृशंसतेचा कळस गाठला. ऑस्ट्रेलियातील हल्ला हा त्याच पद्धतीचा होता. पहलगाममध्येही अशाच प्रकारे निष्पाप भारतीयांना मारण्यात आले होते. 7 ऑक्टोबरनंतर इस्रायलने हमासविरोधात आर या पारची लढाई आरंभिली आणि सर्वशक्तीनिशी मैदानात उतरून हमासचे इराण, दक्षिण लेबनॉनमधील सर्व तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

अँटिसेमिटीझममध्ये वाढ

दोन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या धुमश्चक्रीमध्ये हजारो पॅलेस्टिनी नागरिक, महिला व बालके मारली गेली. इस्रायलने सुरू केलेल्या या अनिर्णित युद्धामुळे जगभरामध्ये अँटिसेमिटीझम म्हणजेच ज्यू लोकांवर केले जाणारे हल्ले वाढत चालल्याचे दिसून आले. जगभरामध्ये ज्यूंची लोकसंख्या दीड कोटी इतकी असून इस्रायलमध्ये ती सर्वाधिक आहेत. दुसर्‍या स्थानावर अमेरिका असून तेथे सुमारे 7 लाख ज्यू लोक राहतात. याखालोखाल युरोपियन देशांमध्ये ज्यू लोक स्थायिक झालेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा विचार करता या देशात एक लाख ज्यू लोक राहतात. भारतातही पाच ते सात हजार ज्यू धर्मिय वास्तव्यास आहेत. इस्रायलने हमासविरोधी आक्रमण आरंभल्यानंतर एकट्या अमेरिकेमध्ये अँटिसेमिनिझमच्या 3000 हून अधिक घटना घडल्या आहेत आणि यामध्ये विविध पद्धतींनी ज्यू लोकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये शारीरिक हल्ल्यांबरोबरच विविध विद्यापीठांमधून ज्यू विद्यार्थ्यांवर शाब्दिक हल्ले चढवण्यात आले. एकट्या ऑस्ट्रेलियामध्ये अशा स्वरूपाच्या सुमारे 1,800 घटना घडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे इस्रायलच्या लष्करी कारवाईचा सूड उगवणे हा यातील मुख्य मुद्दा आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. बाँडी बीचवर हल्ला करणार्‍यांमधील पिता 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला होता. पुढे त्याला कामकाजी व्हिसा मिळाला आणि तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक बनला. त्याच्याकडे बंदुकीचा परवाना असून त्याच्या कस्टडीमध्ये 6 बंदुका होत्या. त्याच्या मुलाची वाढही ऑस्ट्रेलियातच झाली. या पित्याने ड्रायव्हिंगचा परवाना काढला तेव्हा त्याच्या जर्सीवर पाकिस्तान लिहिलेले होते. त्यामुळे यांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचणारे आहेत आणि हा अतिशय कळीचा मुद्दा आहे.

निर्वासितांसंदर्भातील धोरणे

पश्चिम युरोपियन देश आणि त्यांची निर्वासितांसंदर्भातील धोरणे, बहुसांस्कृतिकतावाद, खुलेपणाला प्राधान्य देणारी संस्कृती या सर्वांमधून तेथे निर्वासितांना मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाते खरे; पण नंतरच्या काळात त्यांचे रॅडिकलायजेशनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून अशाप्रकारचे हल्ले घडताहेत. या हल्ल्यांना ‘लोन वुल्फ अ‍ॅटॅक’ म्हणतात. या हल्ल्यांसाठी मोठ्या संख्येने दहशतवाद्यांची गरज नसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाददोन व्यक्तींची माथी भडकावली जातात आणि या रॅडिकलायजेशनमधून अशा प्रकारची कृत्ये घडताना दिसतात. चार्ली हेब्दोचा हल्ला हा याच धाटणीतला होता. त्यामुळे युरोपियन देशांनी निर्वासितांचा स्वीकार करताना त्यांची अतिशय कडकपणाने पडताळणी होणे गरजेेचे आहे. बंदुकीचे परवाने देतानाही अशाच प्रकारची स्क्रुटिनी होणे गरजेचे आहे. बाँडी बीचवरील हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत; परंतु यामध्ये निर्वासितांबाबतची धोरणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

इशारा देऊनही...

चार महिन्यांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक पत्र ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिले होते. यामध्ये ऑस्ट्रेलियन सरकारकडून निर्वासितांचे ज्याप्रकारे लांगुलचालन केले जात आहे, त्यातून ज्यू धर्मियांचा छळ केला जात असल्याचे सांगत याबाबत तत्काळ विचार करण्याची गरज असल्याचे आवाहन केले होते; परंतु ऑस्ट्रेलियन सरकारने याबाबत कसलीही कारवाई केली नाही. याचा परिणाम म्हणजे बाँडी बीचवरील दहशतवादी हल्ला आहे. दहशतवाद हा संपूर्ण जगभर पसरलेला असतानाही अमेरिका आणि युरोपियन देश याकडे प्रादेशिक प्रश्न किंवा तिसर्‍या जगातील देशांची समस्या अशा द़ृष्टिकोनातून पाहताना दिसतात. हे पूर्णतः गैर आहे. येत्या काळात या राष्ट्रांनी आपल्या भूमिकेत बदल करणे गरजेचे आहे.

कुठे गेली फाईव्ह आईज इंटेलिजन्स?

दुसरे असे की, ऑस्ट्रेलिया हा फाईव्ह आईज इंटेलिजन्स संघटनेचा सदस्य आहे. ही जगातील सर्वांत जुनी गुप्तहेर संघटना आहे. या संघटनेमध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड हे पाच देश सदस्य आहेत. हे देश सातत्याने एकमेकांना गुप्तचर वार्ता शेअर करत असतात. शीतयुद्धाच्या काळात सुरू झालेल्या या संघटनेची कार्यपद्धती प्रभावी असल्याचे मानले जाते. दूरध्वनीवरून होणारे संभाषण असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे संदेशवहन असो; ही संघटना या सर्वांवर वॉच ठेवण्याचे काम करत असते. कॅनडामध्ये निज्जर या खलिस्तानी नेत्याची हत्या झाली तेव्हा त्यामध्ये भारताचा हात असल्याचा जावईशोध याच संघटनेने लावला होता. असे असूनही आज ऑस्ट्रेलियाला उर्वरित चार देशांकडून या हल्ल्याबाबत कसलीही गुप्तवार्ता किंवा संकेत किंवा इशारा मिळालेला नव्हता. ही बाब ऑस्ट्रेलियाने लक्षात घ्यायला हवी.

पुन्हा एकदा पाकिस्तान कनेक्शन

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या तीन दशकांत जगभरात झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांचा, कारवायांचा मागमूस घेतला असता त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध पाकिस्तान या एकमेव देशाशी असल्याचे स्पष्ट होते. 1993 मध्ये अमेरिकेमध्ये विश्व व्यापार केंद्रावर पहिला दहशतवादी हल्ला झाला. हे केंद्र पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा कट होता; पण तो अयशस्वी ठरला. या हल्ल्याचा मास्टरमाईंड नंतर पाकिस्तानात पळून गेला. भारतीय विमान अपहरणाच्या प्रकरणातला म्होरक्या असणारा मौलाना मसूद अझहर हाही पाकिस्तानच्या मुशीत तयार झालेला दहशतवादी होता. 2001 मध्ये अमेरिकेवर जगातील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील या हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनही पाकिस्तानातच मारला गेला. 2005 मध्ये लंडनच्या इतिहासातील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यातील पाच प्रमुख दोषी पाकिस्तानचेच होते. भारतात तर गेल्या तीन दशकांत झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन उघडकीस झालेले आहे.

अमेरिकेचा दुटप्पीपणा

जगातील प्रमुख दहशतवादी संघटनांपैकी 70 टक्के संघटनांची मुख्यालये पाकिस्तानात आहेत. या संघटनांना केवळ दहशतवादाचे प्रशिक्षणच पाकिस्तान देत नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळही पाकिस्तानकडून दिले जाते. जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्करे तय्यबा असेल या सर्व दहशतवादी संघटनांचे एकमेकांशी लागेबांधे असतात आणि त्या अल कायदा, आयसिस, तालिबान या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संलग्न असतात. हे सर्व जण बहुराष्ट्रीय संस्थांप्रमाणे काम करतात. या संघटनांकडून विविध ठिकाणी दहशतवादी पाठवले जातात आणि तिथले टार्गेट पूर्ण झाल्यानंतर त्यांना इतर देशांत पाठवले जाते. अतिशय सुनियोजितरीत्या गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय करत आहे. याची पूर्ण कल्पना अमेरिकेला आहे; पण याच अमेरिकेच्या दबावाखाली असणार्‍या आयएएमफने आतापर्यंत 14 वेळा पाकिस्तानला बेलआऊट पॅकेज जाहीर केले आहे. इतकेच नव्हे, तर जिया उल हक यांच्या वाटेने निघालेल्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये बोलावून मेजवानी देतात, त्यांना क्षेपणास्त्रे देतात. आता ऑस्ट्रेलियन पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत जाब विचारण्याचे धाडस दाखवणार का? तसे चुकूनही घडणार नाही.

दहशतवादाबाबतची भूमिका जग बदलणार का?

याचे कारण, भारत वगळता प्रत्येक देश दहशतवादाबाबत सोयीस्कर भूमिका घेत आला आहे. त्यामुळेच आजघडीला दहशतवादाची स्पष्ट व्याख्या जगाला करता आलेली नाही. मोठे देश आपल्या अल्पकालीन उद्दिष्टांसाठी पाकिस्तानसारख्या देशाला हाताशी धरत असल्याने ऑस्ट्रेलियातील हल्ल्यासारख्या घटना घडतात. दहशतवाद हा ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर’ असून त्या विरोधात सर्व स्टेट अ‍ॅक्टरनी एकत्र येऊन एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. भारत हीच भूमिका सातत्याने मांडत आला आहे. ऑस्ट्रेलियासह अलीकडील काळात घडलेल्या घटनांनंतर तरी जगाचे डोळे उघडणार का?

काय घडले नेमके?

ऑस्ट्रेलियातील ज्यू समुदायाचे चारशे ते पाचशे लोक हानुका या सणासाठी 14 डिसेंबर रोजी बाँडी बीचवर जमले होते. हा सण प्रामुख्याने दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. जगभरात साजर्‍या होणार्‍या या सणाची सुरुवात 14 डिसेंबर रोजी होणार होती. अशा पारंपरिक सणाच्या आनंदात असणार्‍या ज्यू धर्मियांवर अचानक दोन व्यक्तींनी सुमारे 10 मिनिटांपर्यंत तुफान गोळीबार केला. यामध्ये 100 हून अधिक बुलेटस् झाडण्यात आल्या. साजिद आणि नाविद विक्रम अशी या दोन दहशतवाद्यांची नावे असून ते पिता-पुत्र आहेत. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1996 मध्ये अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर तुरळक हिंसेच्या घटना घडल्या; पण इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी करणारा हा पहिलाच हल्ला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT