डॉ. मंगेश कश्यप
पाऊस मोजणे ही पहिली पायरी झाली; पण मोजलेला पाऊस जमिनीतून वाहून समुद्रात गेला, तर त्या मोजणीचा काय उपयोग? खरी कसोटी असते हे पाणी पकडायचे कसे, साठवायचे कसे आणि भविष्यासाठी जपायचे कसे? चला, या रंजक प्रवासाला सुरुवात करूया!
छतावरील पाणी साठवण ही सर्वात जुनी आणि सोपी पद्धत. रोमन साम्राज्यानेही जलवाहिन्या (aqueducts) आणि छतावरील पाणी वाहिन्यांची विस्तृत व्यवस्था विकसित केली होती, ज्यामुळे आजच्या गटरआधारित व्यवस्थांचा पाया घातला गेला. दक्षिण आशियात आणि इतर अनेक देशांत हजारो वर्षांपासून ही पद्धत वापरली जाते .
राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात खादिन (Khadin) नावाची अनोखी पद्धत विकसित झाली. हे एक चातुर्यपूर्ण बांधकाम आहे, जे पृष्ठभागावरील वाहते पाणी शेतीसाठी साठवते. पावसाचे पाणी जमिनीवर आणि जमिनीत साठवून पाण्याने भरलेल्या त्या जमिनीचा पुढे पीक उत्पादनासाठी वापर केला जातो.
हे तंत्र आजही अनेक भागांत वापरले जाते. राजस्थानात आजही जास्त जलधारक वृक्ष लागवड करण्याची प्रथा चालू आहे. मोठमोठी झाडे त्यांच्या मुळाशी पाणी धरून ठेवतात.
त्या प्रथेचा एक भाग म्हणून राजस्थानातील पिपलंत्री गावात मुलीच्या जन्माच्या वेळेस अकरा वृक्ष लागवड करण्यात येतात आणि त्या वृक्षांची देखभाल मुलीच्या भावी आयुष्याची तरतूद म्हणून केली जाते. ज्यामुळे स्थानिक भूजलाची पातळी वाढते आणि गरजेनुसार पाणी उपलब्ध होते.
गावपातळीवर तलाव खणणे, छोटे बंधारे (check dams) बांधणे ही पारंपरिक भारतीय पद्धत. खर्च कमी, बांधकाम सोपे; पण पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते आणि साठवण क्षमता मर्यादित असते. हा या पद्धतीचा मोठा तोटा.
भूमिगत साठवण टाक्या (Underground Tanks / Cisterns)
आधुनिक काळात भूमिगत सिमेंट किंवा फायबर टाक्या बनवल्या जातात. यात पावसाचे पाणी छतावरून गोळा करून पाईपद्वारे पाणी साठवण्याच्या टाकीमध्ये वळवले जाते. या टाक्यांमध्ये कचरा आणि दूषित पदार्थ काढून टाकणारे फिल्टर बसवलेले असतात, ज्यामुळे साठवलेले पाणी वापरण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित राहते.
स्मार्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम
युरोपात आता एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आले आहे. छतावरील गटर, पाने पकडणारे फिल्टर, गाळणी यंत्रणा आणि भूमिगत टाकी यांसोबत आता सेन्सर्स आणि स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा जोडली जाते. हे सेन्सर्स पाण्याची पातळी, गुणवत्ता सतत मोजतात आणि गरज पडल्यास स्वयंचलितपणे पाणी वळवतात किंवा पाण्याची साठवण थांबवतात.
नेदरलँडस्चा निसर्गआधारित प्रयोग
नेदरलँड्समध्ये एक अनोखी संकल्पना विकसित झाली आहे. BlueBloqs नावाची सर्कुलर वॉटर सिस्टीम, जी शहरी भागांत निसर्गआधारित उपायांद्वारे पावसाचे पाणी साठवते.
हे तंत्रज्ञान शहरातील उद्याने आणि सार्वजनिक जागांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी आणि साठवण्यासाठी करते. निसर्ग आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम!
भारताचा 'भुंगरू' : जमिनीखाली पाणी इंजेक्ट करणे
भारतातही एक अद्भुत शोध लागला आहे. 'भुंगरू' (गुजराती भाषेत म्हणजे 'पेंढा'), जे मान्सूनचे वाहते पाणी थेट जमिनीखालील जलधरांमध्ये (aquifers) इंजेक्ट करते, जेणेकरून ते नंतर वापरता येईल. कोरडवाहू भागांतील शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरले आहे.
जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया : रोजच्या जीवनाचा भाग
जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांत रेनवॉटर हार्वेस्टिंग ही सामान्य गोष्ट बनली आहे . तेथे प्रत्येक नवीन घर बांधताना पाणी साठवण्याची यंत्रणा डिझाईनचाच भाग असते. पर्याय नाही. बांधकामासाठी ही महत्त्वाची अट आहे!
अमेरिकेतील ग्रीन बिल्डिंग चळवळ
ग्रीन बिल्डिंग चळवळीमुळे अमेरिकेतही रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. शाळा, हॉस्पिटल, मोठ्या व्यावसायिक इमारती सगळीकडे ही यंत्रणा बसवली जाते.
विकसनशील देशांतील सौरऊर्जाआधारित उपाय
विकसनशील देशांत मात्र वेगळी गरज आहे. स्वच्छ पाणी मिळवणे. अनेक स्वयंसेवी संस्था आता सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाळणी यंत्रणेसोबत पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा जोडत आहेत, ज्यामुळे वीजजोडणी नसलेल्या भागांतही स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते. मेक्सिकोतील एका गावाने असेच सौरऊर्जेवर चालणारे यंत्र वापरून संपूर्ण गावाला स्वच्छ पाणी पुरवले आहे.
फायदे आणि तोटे : दोन्ही बाजू समजून घेऊ
फायदे : पाण्याची साठवण शहरी पुराचे प्रमाण कमी करते, जमिनीची झीज थांबवते आणि भूजल पुनर्भरणात मदत करते. यासोबतच नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होतो आणि स्वतंत्र, किफायतशीर पाणीपुरवठा मिळतो.
तोटे : गरिबीत राहणाऱ्या लोकांना मोठ्या जमिनीवरील टाक्या परवडणे कठीण असते. याशिवाय सुरुवातीचा बांधकाम खर्च जास्त असतो. नियमित देखभाल लागते आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सतत निरीक्षण आवश्यक असते.
जगभरातील या सगळ्या पद्धती बघितल्या की, एक गोष्ट स्पष्ट होते, पाऊस साठवणे, जमिनीत मुरवणे हे केवळ तंत्रज्ञानाचे काम नाही, ते सामाजिक जाणिवेचेही काम आहे. युगांडासारख्या देशांत जिथे पुरेसा पाऊस पडत असूनही योग्य साठवण यंत्रणा नसल्यामुळे हे मौल्यवान पाणी वाया जाते, तिथे तंत्रज्ञानापेक्षा जागरूकता आणि सामुदायिक सहभाग जास्त महत्त्वाचा ठरतो.
भारतासाठी खरा धडा हाच आहे. आपल्याकडे खादिन, बंधारे, तलाव यांसारखे शतकानुशतकांचे शहाणपण आहे आणि आता स्मार्ट सेन्सर्स, भुंगरूसारखे आधुनिक तंत्रज्ञानही आहे. गरज आहे फक्त या दोन्हींचा सुंदर संगम घडवण्याची आणि असे जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्याअर्थाने प्रत्येक पावसाच्या थेंबाचा सन्मान होईल.
चला तर मग आपणही या पावसाळ्यात आपल्या परिसरातील पाऊस मोजूयात आणि भविष्याकरिता साठवूयात!