AC and Environment | एसीची गरज आणि पर्यावरणाचा समतोल 
बहार

AC and Environment | एसीची गरज आणि पर्यावरणाचा समतोल

पुढारी वृत्तसेवा

कावेरी गिरी

एप्रिल-मे महिना सुरू झाला की, देशातील अनेक भाग अक्षरशः तापायला लागतात. शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे जाते, तर ग्रामीण भागातही उकाडा असह्य होतो. अशा स्थितीत घर, कार्यालये, मॉल्स, रुग्णालये, वाहनं सर्वत्र एसीचा वापर झपाट्याने वाढत आहे; मात्र या वाढत्या वापराचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

गेल्या काही वर्षांत पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. जंगलतोड, औद्योगिकीकरण, वाहनांचा धूर, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन यामुळे हवामान बदल अधिक तीव्र झाला आहे. परिणामी, उष्णतेच्या लाटा (कशरीुंर्रींशी) अधिक काळ टिकू लागल्या आहेत. शहरांमध्ये काँक्रीटची वाढ आणि झाडांची कमतरता यामुळे ‘हीट आयलंड इफेक्ट’ निर्माण होतो. त्यामुळे शहरांचे तापमान आसपासच्या भागांपेक्षा अधिक राहते. या पार्श्वभूमीवर एसी हा उष्णतेपासून दिलासा देणारा महत्त्वाचा पर्याय ठरतो. विशेषतः वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि घरातून काम करणार्‍या लोकांसाठी एसीचे महत्त्व वाढले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये किंवा औषध उत्पादन उद्योगांमध्ये नियंत्रित तापमान आवश्यक असते. त्यामुळे एसीचा वापर पूर्णपणे थांबवणे व्यवहार्य नाही.

एसीचा पर्यावरणावर परिणाम

एसी थंड हवा देता; पण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होते. भारतात अजूनही मोठा भाग कोळशावर आधारित वीज प्रकल्पांमधून तयार होतो. त्यामुळे एसी जास्त वापरला की, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनही वाढते. हेच उत्सर्जन जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरते. याशिवाय, एसीमध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरंट गॅसेस पर्यावरणासाठी धोकादायक असतात. जुन्या प्रकारातील काही गॅसेस ओझोन थराला हानी पोहोचवतात, तर नवीन गॅसेसही ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’ वाढवू शकतात. एसीमधून बाहेर टाकली जाणारी गरम हवा शहरांतील बाह्य तापमान अधिक वाढवते. म्हणजेच एसी जितका वाढेल, तितके शहर अधिक तापेल आणि पुन्हा एसीची गरज वाढेल, असे दुष्टचक्र तयार होते.

वाढती मागणी आणि भविष्यातील धोका

भारतासारख्या विकसनशील देशात मध्यमवर्ग झपाट्याने वाढतो आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने अनेक घरांमध्ये एसी पोहोचतो आहे. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, पुढील काही दशकांत भारतात एसी वापरणार्‍यांची संख्या अनेक पटींनी वाढू शकते. ही वाढ पर्यावरणपूरक पद्धतीने नियंत्रित झाली नाही, तर ऊर्जा संकट आणि प्रदूषण अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसी वापर बंद करण्याऐवजी ‘जबाबदारीने वापर’ हा मार्ग स्वीकारणे आवश्यक ठरते.

समन्वय साधण्यासाठी काय करता येईल?

योग्य तापमान ठेवणे गरजेचे

अनेक जण एसीचे तापमान 18 किंवा 20 अंशांवर ठेवतात. प्रत्यक्षात 24 ते 26 अंश सेल्सिअस हे तापमान शरीरासाठी आरामदायी आणि ऊर्जा बचतीसाठी योग्य मानले जाते. प्रत्येक एक अंश कमी केल्यास विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे कमी तापमान ठेवणे टाळायला हवे.

ऊर्जा कार्यक्षम एसी निवडणे

आज बाजारात ‘इन्व्हर्टर’ आणि ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ असलेले एसी उपलब्ध आहेत. हे एसी तुलनेने कमी वीज वापरतात. सुरुवातीला किंमत जास्त वाटली, तरी दीर्घकालीन द़ृष्टीने ते किफायतशीर ठरतात. ऊर्जा कार्यक्षम उपकरणांच्या वापराला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

घरांची रचना बदलणे

पूर्वीच्या घरांमध्ये नैसर्गिक वायुवीजन, उंच छत, अंगण आणि झाडांचा वापर असल्याने घर तुलनेने थंड राहत असे. आधुनिक इमारतींमध्ये मात्र काचांचा आणि काँक्रीटचा अतिरेक दिसतो. त्यामुळे उष्णता अधिक साठते. घरांच्या छतावर उष्णतारोधक रंग, सोलर पॅनल्स, हिरवळीचे छप्पर (ॠीशशप ठेेष) आणि योग्य वायुवीजन वापरल्यास एसीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते.

झाडे आणि हरित क्षेत्र वाढवणे

एका मोठ्या झाडामुळे आसपासचे तापमान काही अंशांनी कमी होऊ शकते. शहरांमध्ये झाडांची संख्या वाढवणे, उद्याने जपणे आणि वृक्षतोड रोखणे ही दीर्घकालीन उपाययोजना आहे. नैसर्गिक सावलीमुळे एसीची गरजही कमी होऊ शकते.

सौरऊर्जेचा वापर

एसी दिवसा सर्वाधिक वापरला जातो आणि त्याच वेळी सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे घरांवर सोलर पॅनल बसवून एसी चालवणे हा पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. अनेक देशांमध्ये ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पना यशस्वी होत आहे. भारतातही ती व्यापक करण्याची गरज आहे.

जीवनशैलीत छोटे बदल

सतत एसीमध्ये राहण्याऐवजी काही वेळ नैसर्गिक हवेत राहणे, हलक्या रंगांचे सूती कपडे वापरणे, पडदे लावून सूर्यप्रकाश कमी करणे, पंख्याचा योग्य वापर करणे अशा छोट्या उपायांनीही एसीचा वापर कमी करता येतो.

सरकार आणि समाजाची जबाबदारी

फक्त व्यक्तीने बदल करून हा प्रश्न सुटणार नाही. ऊर्जा कार्यक्षम इमारतींचे नियम कडक करणे, सार्वजनिक ठिकाणी हरित क्षेत्र वाढवणे आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शहरे विकसित करताना पर्यावरणपूरक नियोजनाला प्राधान्य द्यायला हवे.

तसेच, नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. ‘आरामासाठी एसी आवश्यक आहे; पण त्याचा विवेकपूर्ण वापर अधिक आवश्यक आहे,’ ही भावना समाजात रुजवावी लागेल.

वाढती उष्णता ही आता केवळ ऋतूतील बदलाची बाब राहिलेली नाही, तर ती हवामान बदलाची गंभीर चेतावणी आहे. एसी हा त्यावरचा तात्पुरता उपाय असू शकतो; पण तोच पर्यावरणाला अधिक हानी पोहोचवत असेल, तर भविष्यातील संकट आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे एसीचा वापर टाळण्यापेक्षा तो अधिक जबाबदारीने, ऊर्जा कार्यक्षमतेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करणे आवश्यक आहे.

मानवी आराम आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नाहीत. योग्य तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि सजग जीवनशैली यांच्या मदतीने या दोघांमध्ये समतोल साधणे शक्य आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी थंड हवा आणि स्वच्छ पृथ्वी दोन्ही जपायचे असतील, तर आजच योग्य निर्णय घ्यावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT