बहार

Bahar Article : नानाची लव्हस्टोरी

Arun Patil

(Bahar Article) संबंधातला कुणी बी असू द्या. काय टेंशनमधे असला म्हणा, न्हायतर त्यास्नी वाईज हसायची हुक्की आली की, ती माजी बारीक कळ काढत्यात. स्थळंच येईनात आणि शेतकर्‍यांच्या पोरांची लग्नं हुईनात. नुसत्या खटपटीनं वय गुदमरून म्होरं जाय लागलंय. त्या टेंशनमधे पोरं हायत आणि त्यात एका शेतकर्‍याच्या पोरानं परदेशात पोरीला परपोज केलं. त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली ते पोरास्नी जरा डाचलं. माज्या म्होरं काही कळगुट्यांनी ह्यो विषय काढला.

म्हणालीत नाना, आमच्या हृदयाला काय बाभळीचं काटं हायत व्हय? एका बी पोरीला ओढीनं वाजत्यालं हे गोडीचं ठोकं ऐकाय यीत न्हाईत. ढुंकून बघत बी न्हाईत. शेतकरी तरुण म्हजे 'माणूस' न्हाई का ओ? कवा कवा वाटतंय, ज्यात ही प्रेमाची भावना निर्माण होती ते हृदय कोळ्याला द्यावं आणि लांब समुद्रात न्ह्यून बुडवाय सांगावं. एक तरी देवानं ज्येच्या त्येच्या स्थळाची जोडणी पक्की व्हीत न्हाई तोवर बालपण तसंच ठेवावं. न्हायतर मग डायरेक्ट उक्तं म्हातारपण द्यावं.

अवो, ही तरुणपणाची मधली स्टेज दांडगी घातकी. सगळ्यात माप हुरूप असतोय खरं, स्वरूप घटकं घटकला बदलत र्‍हातय. वर आणि आमालाच थिरथिरेपणाचा बोल लागतोय. तुमचं काय ओ, दिली ती केली आणि संसार थाटला. तुमाला प्रपोजचा, प्रेमाचा काय धत्तुरा कळणार? पोरांच्या ह्या शब्दांनी सुतळी बॉम्बला उदकाडी लावल्यावानी झालं. बहाद्दरास्नी वाटलं, ह्यो नाना उक्ताच म्हातारा झाला. वर त्वांड करून म्हंत्यात, मला काय धत्तुरा कळणार? अंदाज बांधताना बी थोडा अंदाज असावा लागतो.

अवो, टप्प्याचा अंदाज घेतल्याशिवाय खडा मारला, त्यो अल्लडपणा हुतोय. माजं बी लव्ह मॅरेज हाय, हे त्यास्नी काय दखल? माजं लव्ह मॅरेज असं मी नुस्तं म्हणलं तसं त्या पोरांनी कान टवकारलं. बसल्या ठिकाणी बुडाखाली लाल मुंग्या उठल्यावानी गडी जागा बदलून आपुआप म्होरं सरकलंत. दार उघडल्याव कपाटातलं आणि व्हट उघडल्याव काळजातलं दिसणार हेची त्यास्नी गॅरंटी हुती. आवंढा गिळून म्हणालीत नाना सांगा की तुमची लव्हस्टोरी?

चाळीस वर्षांपूर्वीची ही स्टोरी (Bahar Article)

आजोळ म्हंजे प्रत्येकाला त्याच्या जिव्हाळ्याचं घर. सुट्टीत मी मामाच्या गावाला जायचा. सुट्टी कवा तर जवा माज्या मनात यील तवा. आता माजी ही 'बायकू' म्हंजे मामाच्याच गल्लीतली माझ्यापेक्षा पाच-सात वर्षांनी लहान असल्याली ती 'पोरगी'. कवा कवा तिच्या आईसंगं मामाच्या घरात यायची. तिची आई माज्या मामीची दोस्तीण. माणूस घरी येतंय म्हणल्याव वळखीचं हुतंय. तशी वळख आणि पहिली भेट बी म्हणा. तसं कळत असं काय न्हवतं. पण उगा अधीमधी कायतर वेगळंच वाटायचं.

आईसंगट ती आली न्हाई तर ते कायतर चुकल्या चुकल्यागत वाटायचं. थोड्या वेळानं ती आईला बोलवायला म्हणून यायची तवा त्यो मामाच्या घराचा सोपा मला माणसांनी भरल्यागत वाटायचा. आता जोकून बघायचं म्हणून का काय हे तिलाच ठाऊक. पण घराकडं यायची बंद झाली. मी गेलो की याचीच न्हाई. असं का हुतय ते बी कळंना, खरं मला चैन पडंना. गेलो तिच्या घराकडं. तिची आई म्हणली ये की बाळ. असं परक्यावानी दारातनंच काय बघतोस रं लाजवाटा? आत पोरीचा हसल्याला आवाज आला. धीरानं मी घरात जाणार, तेवढ्यात तिचा बा जोरात खाकरला.

त्या खाकरण्यातनं परत हिकडं आलास तर माझ्याशी गाठ हाय, अशी तंबी दिल्यागत वाटलं तरी बी आत जाऊन बसलो. काय बोललो न्हाई, खाल्लं न्हाई. बसून राह्यलो. भातकापणी, उसाची लावण, भुईमुगाच्या शेंगा काढणं या पावणेरच्या कामात शिवारात भेट व्हायची तवा मग सगळ्यांच्या संगट का असंना, पण दिवसभर एकत्र. एकदा असंच भातकापणी, झोडणी सुरू होती. दुपारपास्नं वंदप हुतं. सांजच्याला ढग धरलं. भात झाकायची गडबड सुरू झाली. अचानक जोरात विजा सुरू झाल्या आणि मामीला तिनं विचारलं, मामी, सदू कुठं हाय?

ढगातल्या पाण्याआधी डोळ्यातलं पाणी भुईवर पडलं तिथच हे मनाचं मनाशी नातं जडलं. रानात विजंचा आणि मनात तिचा आवाज घुमत राहिला. मामाला मी मनातलं सांगितलं आणि काही वर्षांनं मग तिच्या लग्नाचा विषय निघाला तवा मामानं सांगितलं. स्थळं बघू नका. जे मी फिक्स केलंय तेच हुणार आणि करायचं बी तेच. शिवारातल्या सदूची तिनं सदाचीच साथ केली ती अशी. पोरं म्हणली नाना, धारा काढायची वेळ झाली. काकी सदूची वाट बघत असंल. जाऊया न्हवं? या लग्नाच्या सुगीत शेतकर्‍यांच्या खळ्यात वारं द्यायच्या सुपाला लक्ष्मीचा हात लाभू दे. (Bahar Article)

SCROLL FOR NEXT