बहार

फलंदाजांसाठी ‘नंदनवन’; मात्र गोलंदाजांसाठी ‘कत्तलखाना!’

Arun Patil

[author title="विवेक कुलकर्णी" image="http://"][/author]

आज (दि. 26 मे) आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना होत असताना एक प्रकर्षाने लक्षात येईल, ते म्हणजे एकीकडे यंदा ही स्पर्धा फलंदाजांसाठी नंदनवन ठरत गेली. पण दुसरीकडे, गोलंदाजांवर जे आघात झाले, ते लौकिक अर्थाने कत्तलखान्यापेक्षा वेगळे नव्हते. भरात भर पडली इम्पॅक्ट प्लेअर नियमाची. पण याचमुळे प्रश्न निर्माण होतो, फक्त फलंदाजांसाठी पोषक नियम करून प्रशासक 'सभ्य गृहस्थांचा खेळ' ही क्रिकेटची प्रतिमा कशी जपणार?

समोर येणार्‍या प्रत्येक चेंडूला सीमापार धाडायचे, हा आयपीएलचाच नव्हे, तर जगभरातील कोणत्याही टी-20 लीगचा अलिखित नियम! येथे मुळात फलंदाज क्रीझवर येतो, तो पहिल्या चेंडूपासूनच तोडफोड फटकेबाजी करण्यासाठी! अशा वेळी मग सर्व नियम धाब्यावर! चेंडू टप्प्यात येवो अथवा न येवो. त्यावर प्रहार करायचाच, ही जवळपास प्रत्येक फलंदाजाची प्रवृत्ती असताना धावांची आतषबाजी ही होणारच! 'एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट,' हा एकच अजेंडा असताना यापेक्षा काही वेगळे घडण्याची अपेक्षाही गैरच! पण या सर्व कालौघात क्रिकेटची जी ससेहोलपट होते आहे, ती सर्वार्थाने चिंतेची!

सर्वप्रथम याला गोलंदाजांची कत्तल का म्हणायचे, ते उमजून घेऊ. पहिल्या 34 सामन्यांचा लेखा-जोखा नजरेखालून घातला की समजेल, यंदाच्या आयपीएलने आजवरचे सारे विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने आपली वाटचाल कायम राखली आहे. यंदा प्रती षटकामागील धाव सरासरी 9.42 अशी अभूतपूर्व राहिलीय. आयपीएल इतिहासातील पहिल्या तीन क्रमांकाच्या सर्वोच्च धावा आणि पहिल्या पाचमधील 4 सर्वोच्च धावा याच मोसमात नोंदवल्या गेल्या आहेत. पहिले 500 षटकार तर पाहता पाहता फलकावर झळकले आणि त्यानंतरही गोलंदाजांची कत्तल इमानेइतबारे सुरूच राहिली!

पहिल्या 34 सामन्यानंतर प्रत्येक षटकामागे 9.42 ची सरासरी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आणि तितकेच विचारप्रवण करायला लावणारी. 2009 मध्ये 7.62, 2010 मध्ये 8.41, 2020 मध्ये 8.54 असा आलेख नेहमी उंचावतच गेला आणि 2023 मध्ये तो 8.81 टक्यांवर पोहोचला. यंदा फलंदाजांच्या नंदनवनात हे सर्व विक्रम मोडले जाणार, ही काळ्या दगडावरची रेघच जणू!

चौकार-षटकारांची बरसात आणि त्याची आकडेवारी आणखी स्तिमित करणारी. यंदा प्रत्येक 13 चेंडूंमागे एक षटकार तर प्रत्येक 7 चेंडूंमागे एक चौकार, या समीकरणाने चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. यंदा पहिले 100 षटकार 1425 चेंडूतच फटकावले गेले होते. सर्वात कमी चेंडूत 100 षटकारांच्या निकषावर ही दुसरी सर्वोच्च आकडेवारी ठरली. यापूर्वी 1278 चेंडूत हा पराक्रम नोंदवला गेला होता; पण यंदा पहिल्या 100 षटकारांनंतर पुढील प्रत्येक षटकारांचे शतक कसे झटपट साजरे केले गेले, ते धक्कादायक आहे.

पहिले 100 षटकार 1425 चेंडूत पूर्ण झाल्यानंतर 200 षटकार, 300 षटकार, 400 षटकार व 500 षटकार हे सर्व माईलस्टोन; आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढणारे ठरले! याचे कारण म्हणजे 200 षटकार 1014 चेंडूंत, 300 षटकार 1334 चेंडूंत, 400 षटकार 1718 चेंडूंत आणि 500 षटकार 1389 चेंडूंत फटकावले गेले!

यंदाच्या हंगामात एकाच डावात 270 पेक्षा अधिक धावसंख्या रचली जाण्याचा पराक्रम तीनवेळा गाजवला गेला. 2024 च्या हंगामापूर्वी झालेल्या 1025 आयपीएल सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्या आरसीबीची होती. ती म्हणजे 263 आणि यात 175 धावांचा वाटा होता एकट्या ख्रिस गेलचा! यंदा हा सर्वोच्च धावांचा विक्रमही पाहता पाहता इतिहासजमा झाला! अगदी दस्तुरखुद्द आरसीबीदेखील एकदा आपलाच विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. तसे पाहता, त्या लढतीत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 83 इतकीच होती. पण अन्य तीन फलंदाजांनी 200 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 40 व त्याहून अधिक धावांच्या आसपास सरासरी योगदान दिल्याने आरसीबी तिथवर पोहोचली होती.

यंदा 8 वेळा 220 पेक्षा जास्त व 5 वेळा 240 पेक्षा अधिक धावांची बरसात झाली. पहिल्या 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये 20 वेळा 60 व त्याहून अधिक धावा झोडपल्या गेल्या. यातील 10 वेळा 72 व त्याहून अधिक धावा वसूल केल्या गेल्या. सनरायझर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्स यांनी तर असे पराक्रम प्रत्येकी तीनवेळा गाजवले. कोलकाता नाईट रायडर्सनेही अशी धमाल दोनवेळा केली.

यंदाच्या मोसमात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पॉवर प्लेच्या 6 षटकांत सर्वाधिक 88 धावा फटकावल्या. पॉवर प्लेमधील सर्वकालीन सर्वोच्च धावांच्या यादीत केकेआरच्या या डावाला चौथे स्थान लाभले आहे.

यंदा 13 वेळा विविध संघांनी 100 धावांचा माईलस्टोन 10 षटके पूर्ण होण्यापूर्वीच सर केला. यापूर्वी, पहिल्या 34 सामन्यांअखेर 10 षटकांपूर्वीच 100 धावा पार केले जाण्याचा सर्वोच्च विक्रम 2023 मध्ये नोंदवला गेला होता. त्यावेळी 8 संघांनी हा माईलस्टोन गाठला होता. यंदा डेथ ओव्हर्समधील सर्वोच्च विक्रम मुंबई इंडियन्सच्या खात्यावर नोंदवला गेला. मुंबईने दिल्लीविरुद्ध डेथ ओव्हर्समध्ये 84 धावा वसूल केल्या. इतके सारे फलंदाजीतील विक्रम, विश्वविक्रम गाजवले जात असताना, गोलंदाजांच्या पृथ्थकरणाच्या चिंध्या उडाल्या नसतील तरच नवल होते! म्हणूनच की काय, यंदा गोलंदाजांना अन्य कोणत्याही हंगामापेक्षा अधिक दडपण झेलावे लागले.

गोलंदाजीची कशी लक्तरे निघाली, त्याची आकडेवारीही अर्थातच भन्नाट आहे. यंदा एकदा-दोनदा नव्हे, तर चक्क 205 वेळा एकाच षटकात 15 पेक्षा अधिक धावा वसूल केल्या गेल्या. 54 वेळा एकाच षटकात 20 व त्याहून अधिक धावा झाल्या. केवळ 16 षटकांत 215 धावांची लयलूट करू देणार्‍या नरीच नोर्त्झेने तब्बल 4 वेळा एका षटकात 20 किंवा त्याहून अधिक धावा मोजल्या. भुवनेश्वर कुमार, रीस टॉपली, हर्षल पटेल यांच्या गोलंदाजीच्याही बर्‍याच चिंधड्या उडाल्या!

यंदाची आयपीएल फलंदाजांसाठी नंदनवन का ठरली, त्याचीही अनेक कारणे आहेत. आश्चर्य वाटेल; पण यंदा 50 फलंदाजांनी 100 व त्याहून अधिक धावांचा रतीब घातला. 28 फलंदाजांचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा अधिक, तर 10 फलंदाजांचा स्ट्राईक रेट 175 पेक्षा अधिक राहिला. अब्दुल समद, दिनेश कार्तिक, अभिषेक शर्मा व आंद्रे रसेल यांनी तर 200 पेक्षा अधिकचे स्ट्राईक रेट नोंदवले. मागील हंगामात 34 सामन्यांअखेर 20 फलंदाजांनी 150 हून अधिक, 5 फलंदाजांनी 175 हून अधिक व एका फलंदाजाने 200 हून अधिकचा स्ट्राईक रेट नोंदवला होता. गोलंदाजांची इतकी कत्तल आयपीएलच्या कोणत्याच हंगामात झाली नाही!

आता जवळपास प्रत्येक सामन्यात 200 पेक्षा अधिक सरासरीने धावा झोडपल्या गेल्या, त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पाटा स्वरूपाच्या खेळपट्ट्या! अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर चेंडू सहजपणे बॅटवर येत राहतो आणि अशा वेळी फटकेबाजी करणे, हा एक प्रकारे डाव्या हातचा मळच! दुसरे कारण म्हणजे कोणताच संघ आता केवळ पॉवर प्लेमध्येच फटकेबाजी करायची, असा विचार करत नाही. पॉवर प्लेमध्ये धावांची बरसात होतेच; पण मधल्या षटकात आणि नंतर डेथ ओव्हर्समध्येही हाच शिरस्ता कायम राखण्याचा प्राधान्यक्रम असतो. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम! यामुळे नाणेफेकीनंतर बदली खेळाडू संघात आणत विशेषत: मधल्या षटकात धावांची आतषबाजी करण्याची मुभा मिळायची आणि या नियमाचा सर्वच संघांनी पुरेपूर फायदा घेतला!

आधुनिक टी-20 क्रिकेटची बदलती समीकरणे पाहता, 250 धावांचा टप्पा सर करणे नवे राहिलेले नाही. शिवाय, बहुतांशी संघ फिरकीपटूंऐवजी मध्यमगती-जलद गोलंदाजांवर अधिक भर देत आले असल्याने यामुळेही झटपट धावांचा वेगही वाढतो आहे. बहुतांशी संघांनी स्पेशालिस्ट पॉवर हिटर्सवर अधिक भर दिल्याने त्याचेही परिणाम दिसून येतच आहेत.

राहता राहिला प्रश्न सभ्य गृहस्थांचा खेळ या प्रतिमेचा. ही प्रतिमा जपण्यासाठी प्रशासकांना सर्वप्रथम केवळ पाटा खेळपट्ट्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर यावे लागेल आणि फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांना, अष्टपैलू खेळाडूंनाही पुरेशी संधी असेल, याची तजवीज करावीच लागेल.

असे केले नाही, तर मात्र आयपीएल दरवर्षी केवळ फलंदाजांच्या विक्रमाचा रेकॉर्ड बुक ठरेल आणि यातून नजाकतदार खेळाची अपेक्षा करणारा चाहता वर्ग तुटला, तर क्रिकेटचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असेल तर यात आश्चर्याचे कारण असणार नाही!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT