डॉ. सुकृत खांडेकर
आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांत 9 एप्रिल रोजी मतदान पार पडले आणि आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधे 23 व 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात आसाममधे 85 , केरळमधे 78 व पुद्दुचेरीत 90 टक्के मतदान झाले. विक्रमी मतदानातून मतदारांचा लोकशाहीवर विश्वास द़ृढ होत असल्याचे सर्व देशाला दिसून आले तसेच विक्रमी मतदान हे राजकीय बदलाचे संकेत तर नाहीत ना, असेही अंदाज व्यक्त केले गेले. आसाम, केरळमधील विक्रमी मतदानाने तामिळनाडूत द्रमुक आणि अण्णा द्रमुक-भाजप युती सावध झाली आहे.
आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. केरळमधे 140, पुद्दुचेरीत 30, तामिळनाडूत 234, तर पश्चिम बंगालमधे 294 जागा आहेत. या निवडणुकीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा व भविष्य पणाला लागले आहे. या सर्व निवडणुकांमधे भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपचे विविध राज्यांतील एक डझन मुख्यमंत्री, पक्षाचे दोनशेहून अधिक खासदार, विविध राज्यांतील सहाशेहून अधिक आमदार, पक्षाचे नेते, प्रमुख कार्यकर्ते, पन्ना प्रमुख अशी भाजपने हजारो प्रशिक्षित व निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज तैनात केली आहे. तीन राज्यांत मतदान पूर्ण झाल्याने भाजपने आता तामिळनाडू व पश्चिम बंगालवर सारे लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, तसेच दोन डझन केंद्रीय मंत्री प्रचारात तैनात आहेत. भाजपला आसाममधील सत्ता कायम राखायची आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता ममता बॅनर्जींकडून खेचून घ्यायची आहे. केरळ व तामिळनाडूत पक्षाच्या मतदानाची टक्केवारी वाढवून विधानसभेत आपली उपस्थिती निश्चित करायची आहे.
हिमंता बिस्व सरमा, पिनराई विजयन, एम. के. स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी हे चारही मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात ताकदवान आहेत. त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांचा पक्ष तिथे भक्कम आहे. हे चारही मुख्यमंत्री महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार, जातीयवादाचे कितीही आरोप झाले, तरी त्यांना हटवणे सोपे नाही. शेवटी निवडणुकीत व राजकारणात काहीही होऊ शकते, म्हणूनच कोणीही किंचितही गाफील राहण्याचा धोका पत्करत नाही. हिमंता बिस्व सरमा हे भाग्यवान आहेत. कारण, ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वात बलाढ्य राजकीय पक्षाची ताकद उभी आहे. ममता, स्टॅलिन किंवा विजयन यांना भाजपच्या कूटनीतीचा मोठा धोका आहे. निवडणूक आयोग, सीबीआय किंवा इडी या शक्तिशाली केंद्रीय यंत्रणा भाजपच्या हाती आहेत किंवा त्यावर भाजपचे नियंत्रण आहे. मतदार यादी सुधारणेचा फटका प्रत्येक राज्याला बसला आहे. म्हणूनच ममता आणि स्टॅलिन यांना अहोरात्र सतर्क राहूनच निवडणूक लढवावी लागत आहे.
ममता , स्टॅलिन किंवा सरमा हे तिघेही मतमोजणीनंतर म्हणजेच 4 मेनंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा मुकुट धारण करू शकतील; पण केरळचे विजयन यांचे सांगता येत नाही, असे अनेक सर्व्हे प्रसिद्ध झाले आहेत. केरळमधे प्रत्येक निवडणुकीनंतर सरकार बदलते अशी परंपरा आहे. 2021 मध्ये विजयन यांनी काँग्रेसचा पराभव करून केरळची सत्ता मिळवली. गेल्या पाच वर्षांत केंद्रातील भाजपशी संघर्ष करीत सरकार चालवले. या काळात राज्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने व भाजपने बरेच हातपाय पसरले. एकीकडे काँग्रेसचे आव्हान व दुसरीकडे भाजपचा विस्तार अशा स्पर्धेत विजयन डाव्या आघाडीची सत्ता कायम राखतील का? काँग्रेस नकोच; पण 81 वर्षे वयाचे विजयन परवडले, अशी मानसिकता असणारा एक प्रवाह भाजपमध्ये आजही आहे.
राज्याचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करूणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन यांना वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून मुख्यमंत्रिपद स्वीकारणे व सांभाळणे हे तसे सोपे नव्हते. स्टॅलिन व त्यांच्या सरकरावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले. केंद्रातील मोदी सरकारशी जमवून घेणे त्यांना फारसे जमले नाही. तामिळ भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांच्याशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. लोकप्रिय अभिनेता विजय टीव्हीके याने स्टॅलिन व त्यांच्या द्रमुक पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्याच्या सभांना व रोड शोला राज्यात सर्वत्र अफाट गर्दी खेचली जात आहे. विजय यांनी 15 टक्के मते मिळवली, तरी विधानसभा अधांतरी येऊ शकते. शिवाय अँटिइनकबन्सीचा धोका स्टॅलिन यांना होऊ शकतो.
तामिळनाडू व पश्चिम बंगालमधे सत्तेवर प्रादेशिक पक्ष आहेत. आसाममधे भाजप हा राष्ट्रीय पक्ष सत्तेवर आहे. आसामी जनतेत मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे ‘मामा’ म्हणून परिचित आहेत. काँग्रेसने त्यांना उपेक्षित ठेवले म्हणून ते भाजपमध्ये आले. त्यांच्यातील संघटन कौशल्य मोदी-शहांनी ओळखले व आसामची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली. सरमांच्या रूपाने इशान्य भारतात भाजपला एक लढाऊ व कार्यक्षम नेता मिळाला. योगी आदित्यनाथ व देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपशासित राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून हिमंता सरमा यांचे नाव घेतले जाते. आसामधील 126 मतदारसंघांपैकी 23 मुस्लीमबहुल आहेत. बाकीच्या मतदारसंघांत हिंदूंचे बहुमत आहे. हिमंता यांनी हिंदू व्होट बँक भाजपसाठी भक्कम केली आहे. काँग्रेस नेता गौरव गोगोई हे भाजपच्या विरोधात लढत असले, तरी पक्षाकडील संघटन विस्कळीत आहे आणि पाठोपाठच्या पराभवांमुळे काँग्रेस खचली आहे.
सर्व देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लागले आहे. सलग तीन वेळा सत्ता स्थापन करणार्या व मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक संपादन करणार्या ममता बॅनर्जी यंदाच्या निवडणुकीत चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. या निवडणुकीला तृणमूल काँग्रेसने ‘दीदी विरुद्ध निवडणूक आयोग’ असा संघर्ष असल्याचे म्हटले आहे. आमची लढत भाजपशी नाही, तर निवडणूक आयोगाशी आहे, असे ममता स्वत: सांगत आहेत. पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 91 लाख नावे वगळण्यात आली. त्याचा लाभ भाजपला किती होईल, हा कळीचा मुद्दा आहे. ममता यांनी प. बंगालमधील 34 वर्षांची कम्युनिस्टांची राजवट उलथवून मोठा पराक्रम केला होता. आता ममता यांच्या तृणमूल काँग्रेसची पंधरा वर्षांची राजवट हटविण्यात भाजपा यशस्वी होईल का? 294 जागांच्या विधानसभेत 200 पेक्षा जागा जिंकण्याचे टार्गेट तृणमूल काँग्रेसने जाहीर केले आहे. ममतांनी चौथ्यांदा विजय मिळवला, तर त्या इंडिया आघाडीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी पुढे येऊ शकतात. गेल्या निवडणुकीत भाजपचे 77 आमदार विजयी झाले होते. भाजपाने शंभरी ओलांडली, तरी ते मोठे यश समजले जाईल.