Asim Munir | ‘जिहादी जनरल’च्या धूर्त चाली Pudhari File Photo
बहार

Asim Munir | ‘जिहादी जनरल’च्या धूर्त चाली

पुढारी वृत्तसेवा

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

असीम मुनीर हे एक धूर्त, लबाड व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे, त्याचे विश्लेषण करणे आणि आवश्यक ती कारवाई करणे अत्यावश्यक आहे. आर्य चाणक्य म्हणाले होते, जिथवर धोरणात्मक मुद्द्यांचा संबंध आहे, कधीही झोपलेल्या स्थितीत सापडू नका. हे असीम मुनीर यांच्याबाबत अक्षरशः लागू होते.

1976 चा वसंत ऋतू. पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर विचार करत होते. विषय होता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी कोणाची नेमणूक करावी? शेवटी त्यांनी लेफ्टनंट जनरल मोहम्मद झियाउल हक यांची निवड केली, जरी ते सर्वांत कनिष्ठ अधिकारी होते; पण फक्त 13 महिन्यांतच जनरल झिया यांनी भुट्टो यांना तुरुंगात टाकले आणि नंतर फासावर लटकवले. झिया यांनी पाकिस्तानचे इस्लामीकरण केले, जिहाद सुरू केला. सलग 11 वर्षे सत्तेवर राहिले आणि शेवटी एका विमान दुर्घटनेत त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला.

2025 मध्ये हाच इतिहास पुन्हा घडताना दिसतो आहे. 2022 मध्ये जनरल असीम मुनीर यांची पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली. इम्रान खान आणि जनरल बाजवा यांच्यातील संघर्षानंतर असीम मुनीर हे एक सुरक्षित पर्याय मानले गेले. मुनीर हे वॉशिंग्टनच्या जवळचे, बीजिंगसमोर नम्र आणि स्वतःला पाकिस्तानला स्थैर्य मिळवून देणारा नेता म्हणून सादर करणारे व्यक्तिमत्त्व आहे. अधिकृतरीत्या ते नम्रतेचा मूर्तिमंत आदर्श मानले जातात. सौम्य उर्दू-इंग्रजी मिश्र भाषेत ते पाश्चिमात्य राजनैतिकांना सांगतात की, आम्ही लोकशाही स्थैर्याला कटिबद्ध आहोत. सामरिक विचारवंतांना ते खात्री देतात, पाकिस्तानची अण्वस्त्रे सुरक्षित आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ते सांगतात, चीन आमचा मित्र आहेच शिवाय अमेरिकादेखील आमची मैत्रीण आहे आणि चिनी अधिकार्‍यांना ते हमी देतात की, तुम्ही आमचे कायमस्वरूपी सर्व ऋतूंतील मित्र आहात. ते क्रिप्टो व्यवहारांचे समर्थन करतात, पेंटॅगॉनशी पुन्हा संबंध प्रस्थापित करतात, आयएमएफच्या अटींसाठी संकेत देतात. त्यांचे लष्कर चीनसाठी सुरक्षा पुरवठादार बनले आहे. ग्वादरचे संरक्षण, बलुचिस्तानमध्ये चिनी हितसंबंधांचे रक्षण, बंडखोरांविरोधात कारवाई आणि पाकिस्तानच्या आर्थिक धोरणांचे रक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट बनले आहे.

मुनीर हे पूर्वसुरींचे मिश्र स्वरूप आहेत. झियांसारखे ते धर्म आणि श्रद्धेचा वापर करतात, मुशर्रफसारखे पाश्चिमात्यांना भुलवतात आणि जिहादींना आश्रय देतात. कायानी आणि रहीलसारखे सैनिकी सत्तेचा विस्तार करतात. बाजवासारखे संपत्ती आणि जमीन गोळा करतात. त्यांनी भ्रष्टाचार, फसवणूक आणि लष्करी अपमानाद्वारे पाकिस्तानला दहशतवाद, फुटिरतावाद आणि गरिबीच्या खाईत ढकलले आहे. परकीय शक्तींसाठी ते एक मोहरा बनले आहेत. अमेरिकेला त्यांनी खात्री दिली आहे की, ते जिहादींचा बंदोबस्त करतील, अण्वस्त्रे सुरक्षित ठेवतील आणि चीनचा अतिरेक थांबवतील. त्याच वेळी त्यांनी चीनलाही आश्वासन दिले आहे की, पाक लष्कर त्यांच्या गुंतवणुकीचे रक्षण करेल, बलुचींचा असंतोष दडपेल आणि अमेरिकन प्रभावाला दूर ठेवेल. पण, पाकिस्तानच्या जनतेसाठी त्यांना काहीच देणेघेणे नाही. त्यांनी असंख्य नागरिकांना तुरुंगात टाकले, आपल्या विरोधातील आवाज दडपले आणि निवडणुका रोखल्या आणि हे सर्व केले ते लोकशाहीच्या आणि स्थैर्याच्या नावाखाली. असीम मुनीर यांनी लष्करी धोरण आणि इस्लामी धर्मशास्त्र यांची सरमिसळ केली असून धर्मसत्तेचा लष्करात खुलेपणाने वापर केला आहे. ते नेहमी सांगतात की, पाकिस्तानी लष्कर ईमान, तक्वा आणि जिहाद फि सबीलिल्लाह या तत्त्वांवर कार्य करते. त्यामुळे पारंपरिक सैनिकी कारवाई आणि धार्मिक अतिरेकी गट यामध्ये एक आघाडी निर्माण झाली आहे. त्यांना मुस्लीम जगतात ‘जिहादी जनरल’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी कठोर पंथीय मौलवींशी आणि धार्मिक राजकीय गटांशी हातमिळवणी केली असून त्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्र नियंत्रणाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

ते वारंवार द्विराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख करतात आणि काश्मीरला पाकिस्तानच्या गळ्याची शीर म्हणतात. ही भाषा जिहादींना हिंसक कारवायांसाठी उचकवत आली आहे. दि. 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे आयएसआयने 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली. ही कारवाई दोन एसएसजी कमांडोंनी आणि दोन जिहादींनी केली. त्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील नऊ जिहादी तळांवर जोरदार हल्ला केला. चार दिवस चाललेल्या संघर्षात पाकिस्तानला आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी नुकसान सोसावे लागले. त्यांच्या प्रत्युत्तरात एकसंधपणा नव्हता. या घटनेमुळे मुल्ला-मिलिटरी अलायन्स पुन्हा केंद्रस्थानी आली आणि पाक लष्कर इस्लामचे रक्षणकर्ते म्हणून पुढे आले. या तथाकथित रक्षणामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ किंवा बुनियान अल-मद्रूरदरम्यान पाकिस्तान लष्कराने लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मारल्या गेलेल्या नेत्यांवर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. त्यांच्या अंत्यसंस्काराला लेफ्टनंट जनरलपासून कर्नलपर्यंत सगळे हजर होते. यामुळे राज्य प्रायोजित दहशतवादाचे (स्टेट स्पॉन्सर टेररिझम) उघड समर्थन झाले.

असीम मुनीर यांनी भारताशी शांततेच्या कोणत्याही संवादाची सुरुवात केली नाही. त्यांचे लक्ष कायम जिहादी भाषणांवर आणि लष्करी वाढीवर राहिले आहे. त्यामुळे भारताशी तणाव वाढला असून पाकिस्तानमध्ये अंतर्गत अराजकता पसरली आहे. पहलगाम हल्ल्यासाठी असीम मुनीर आणि आयएसआय पूर्णपणे जबाबदार आहेत. आपल्याकडे ठोस पुरावा नव्हता. 2008 च्या मुंबई हल्ल्यासारखी केस होण्यासाठी एखादा हल्लेखोर जिवंत सापडणे आवश्यक होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताने जिहादी तळांवर आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करून तुम्ही कुठेही असलात, तरी आम्ही तुम्हाला भिडू शकतो, असा संदेश दिला. दि. 28 जुलै 2025 रोजी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एसएसजी कमांडो मुसा हाशिम सुलैमानी आणि त्याचा साथीदार ठार केला. हे एक महत्त्वाचे यश होते, जे भारताच्या सामरिक क्षमतेचे आणि इच्छाशक्तीचे प्रमाण मानले गेले.

दि. 25 जून रोजी असीम मुनीर अमेरिकन लष्करी मुख्यालयाच्या अधिकृत भेटीस गेले; पण पाक लष्कराने हे भासवले की, ते अमेरिकन लष्कराच्या 250व्या वर्धापनदिनाच्या परेडसाठी आमंत्रित झाले आहेत. या गोष्टीमुळे दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आश्चर्य व्यक्त झाले. प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना फक्त एका औपचारिक जेवणासाठी आमंत्रित केले होते. कारण, त्यांनी अमेरिकेला माहिती आणि सुरक्षेचे भ्रम दिले होते; पण वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या विरुद्ध मोठा निषेध झाला. विशेषतः इम्रान खान यांच्या समर्थकांकडून जून 2025 मध्ये पाकिस्तानने अमेरिकन सेंट्रल कमांड प्रमुख जनरल मायकेल कुरिल्ला यांना निशान-ए-इम्तियाज (मिलिटरी) पुरस्कार दिला. असीम मुनीर यांनी त्यांचे आभार मानले आणि दोन्ही देशांमधील दहशतवादविरोधी सहकार्य मजबूत होत असल्याचे जाहीर केले. त्या दरम्यान भारत पाकिस्तानच्या दहशतवादाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड करत होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित निर्णयांमुळे उपखंडातील स्थैर्यावर परिणाम होणार आहे. अमेरिका बांगलादेशसोबत म्यानमारविरोधात लष्करी सराव करत आहे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात जवळीक वाढत आहे. अमेरिका या दोघांशीही व्यवहार करत आहे आणि चीन संधीची वाट पाहतो आहे, तो नेपाळ, भूतान आणि शीलंकेसह उत्तरेकडून दबाव टाकू पाहतो आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून झालेल्या जबर मारानंतरही असीम मुनीर यांना पाकिस्तान सरकारने फील्ड मार्शल म्हणून बढती दिली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर आणि लष्करातील एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाक लष्करातील अनेक कोअर कमांडर या बढतीवर नाराज आहेत. फील्ड मार्शल प्रत्यक्ष सैन्याचं नेतृत्व करत नाही, त्यामुळे एकमताने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. 1958 मध्ये जनरल अयुब खान फील्ड मार्शल झाले होते तेव्हा ले. जनरल मूसा खान लष्करप्रमुख होते. असीम मुनीर 30 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांना बाजूला करणं सोपं नसेल, पण आंतरराष्ट्रीय एकाकीकरण निश्चितच वाढेल. अशा अफवा आहेत की ते स्वतः राष्ट्रपती होण्यासाठी लष्करी उठाव करू शकतात. पण सध्याचे राजकारणी आणि सरकार त्यांच्याच इच्छेनुसार काम करत असल्याने ही शक्यता कमी आहे. आतापर्यंत केवळ तीन माजी लष्करप्रमुखांना राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून खास जेवणासाठी बोलावलं गेलं. पण असीम मुनीर हे पहिले कार्यरत लष्करप्रमुख जे ट्रम्प यांच्याकडे जेवले. याचा अर्थ असा की ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानमध्ये खरी सत्ता त्यांच्या हातात आहे. जर त्यांनी लष्करी उठाव केला, तर संयुक्त राष्ट्रासारख्या संस्था पाकिस्तानची मदत थांबवतील आणि हा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडेल. मात्र, अमेरिका, चीन आणि इतर हितसंबंध असलेल्या देशांकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो.

असीम मुनीर यांच्याकडे जनमताचा कौल नाही. त्यांनी इम्रान खान यांनी भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केल्यानंतरच अराजकता निर्माण केली. जेव्हा जेव्हा अशा सुधारणांचा प्रयत्न होतो, तेव्हा आयएसआय आणि असीम मुनीरसारखे लोक भारतावर हल्ला करून लोकांचे लक्ष मूलभूत समस्यांवरून दूर करतात. पहलगाम हल्ल्याचं मुख्य उद्दिष्टच भारतात अशांती पसरवून युद्ध जिहाद आणि आणीबाणी घोषित करून सत्तेवर कब्जा करणे हे होते. असीम मुनीर लवकरच आपला एखादा राजकीय सहकारी पंतप्रधान म्हणून नेमतील आणि स्वतः राष्ट्रपती होतील. आपल्या कृतीचं समर्थन करताना ते म्हणतील की ते पाकिस्तानच्या सुरक्षिततेसाठी, प्रतिष्ठेसाठी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या आडून त्यांनी सैन्यासाठी 2025-26 च्या कापलेल्या अर्थसंकल्पातही 20% वाढ मिळवली. त्यांनी मे 2025 मधील भारताशी झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि भारताने केलेली सिंधू पाणी कराराचे निलंबन याचा आधार घेतला.

लष्करी विचारसरणीत प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते. असीम मुनीर हे सध्या वरच्या पातळीवर आहेत आणि ते दीर्घकाळ पाकिस्तानचे नेतृत्व करतील, अशी शक्यता आहे. ते एक कठोर, अतिरेकी विचारांचे, जिहादी मानसिकतेचे लष्करी अधिकारी आहेत. ते सियाचिन आणि कारगिलमध्ये सक्रिय होते‡. ही दोन्ही मुशर्रफने घडवलेली आपत्ती होती. ज्याप्रमाणे मुशर्रफने 1971 चा बदला घ्यायचा ठरवले होते, तसेच असीम मुनीर यांना सियाचिन, कारगिल आणि बुनियान अल मद्रूर या अपयशाचा सूड घ्यायचा आहे. हे अपयश लक्षात घेता, ते भविष्यात‡बहुधा लवकरच‡भारतावर मोठा हल्ला करू शकतात. असीम मुनीर हे एक धूर्त, लबाड व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे, त्याचे विश्लेषण करणे आणि आवश्यक ती कारवाई करणे अत्यावश्यक आहे. आर्य चाणक्य म्हणाले होते, जिथवर धोरणात्मक मुद्दयांचा संबंध आहे, कधीही झोपलेल्या स्थितीत सापडू नका. हे असीम मुनीर यांच्याबाबत अक्षरशः लागू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT