Ase Hote Gandhiji Suhas Kulkarni  Pudhari
बहार

Ase Hote Gandhiji: ‘असे होते गांधीजी’ – महात्मा गांधींना नव्याने समजून घेणारं महत्त्वाचं पुस्तक

Ase Hote Gandhiji Book Review: ज्येष्ठ पत्रकार सुहास कुलकर्णी लिखित ‘असे होते गांधीजी’ हे पुस्तक महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करते.

Rahul Shelke

Ase Hote Gandhiji Book Review: महात्मा गांधी हे नाव आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. शाळेच्या पुस्तकांमध्ये ‘राष्ट्रपिता’, स्वातंत्र्यलढ्याचे नेते, अहिंसेचे पुजारी अशी त्यांची ओळख करून दिली जाते. पण गांधीजी खरंच कसे होते? त्यांचे विचार काय होते? त्यांनी फक्त स्वातंत्र्य मिळवून दिलं की त्यापलीकडेही काही मोठं काम केलं? आजच्या काळात हे प्रश्न नव्याने विचारले जात आहेत. कारण सोशल मीडियाच्या युगात गांधीजींबद्दल जितकी माहिती मिळते, तितकेच गैरसमजही पसरताना दिसतात.

अशा काळात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुहास कुलकर्णी यांचं ‘असे होते गांधीजी’ हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. हे पुस्तक गांधीजींचं पारंपरिक चरित्र नाही. जन्म, शिक्षण, विवाह, चळवळी आणि मृत्यू असा सरळसोट जीवनपट इथे नाही. उलट गांधीजींच्या आयुष्यातील निवडक प्रसंग, व्यक्ती, संघर्ष आणि विचार यांची वेगळी उकल या पुस्तकात होते. त्यामुळे गांधी नावाच्या व्यक्तिमत्त्वाकडे एका नव्या नजरेतून पाहण्याची संधी वाचकाला मिळते.

या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखक गांधीजींचं अंध समर्थन करत नाहीत आणि त्यांच्यावर टीकाही करत नाहीत. लेखक कुठेही गांधीजींना देवत्व देत नाहीत, पण त्यांना कमी लेखण्याचाही प्रयत्न करत नाहीत. ते गांधीजींना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुस्तक वाचताना वाचकावर कोणताही विचार लादला जात नाही. उलट, गांधीजींचा खरा विचार काय होता? याच उत्तर वाचकाला या पुस्तकातून मिळतं.

सुहास कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच गांधीजींच्या आयुष्याचे तीन कालखंड मांडले आहेत. यामुळे गांधीजींचा विचार आणि त्यांचं राजकारण कसं विकसित होत गेलं हे समजायला मदत होते. दक्षिण आफ्रिकेतील संघर्ष, भारतात परतल्यानंतरची सामाजिक-राजकीय चळवळ आणि अखेरच्या काळातील देशविभाजनाचा संघर्ष या सर्व टप्प्यांकडे लेखकाने संतुलित नजरेने पाहिलं आहे.

पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, गांधीजींसाठी राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नव्हतं. आज आपण पाहतो तसं राजकारण म्हणजे निवडणुका, पक्षबदल आणि सत्तासंघर्ष एवढ्यावर मर्यादित नव्हतं. गांधीजींसाठी राजकारण हे नैतिकता, सत्य आणि समाजबांधणीशी जोडलेलं होतं. म्हणूनच ते सत्याग्रहाला संघर्षाचं शस्त्र मानतात, पण त्यात हिंसेला जागा देत नाहीत.

या पुस्तकात गांधीजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी आणि फारशा चर्चेत नसलेल्या गोष्टीही समोर येतात. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील तुरुंगाधिकारी जनरल स्मट्स यांच्यासोबतचा प्रसंग. गांधीजींना विरोध करणाऱ्या स्मट्सला गांधीजींनी स्वतःच्या हातांनी बनवलेली चप्पल भेट दिली. राजकीय विरोध असूनही वैयक्तिक कटुता न ठेवणं हा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा पैलू या एका प्रसंगातून स्पष्ट होतो. विरोधकाला शत्रू न मानण्याचा हा विचार आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात अधिक महत्त्वाचा वाटतो.

पुस्तकात गांधीजींचे संबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्याशी कसे होते, याचाही वेध घेतला आहे. या संदर्भात लेखकाने कोणतीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. उदाहरणार्थ, गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्यात मतभेद होते, पण त्याचवेळी दोघांचे उद्दिष्ट समाजसुधारणेशी जोडलेले होते, हेही पुस्तक अधोरेखित करते.

लेखकाने ‘हिंद स्वराज’ या गांधीजींच्या महत्त्वाच्या पुस्तकाचा उल्लेख करून त्यांच्या विचारविश्वाची पायाभरणी समजावून सांगितली आहे. आधुनिकतेबाबत गांधीजींची भूमिका, ग्रामव्यवस्था, स्वावलंबन, नैतिकता आणि मानवी मूल्ये यांचा त्यांनी सातत्याने केलेला विचार पुस्तकातून स्पष्ट होतो.

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाषा. गांधीजींसारखा गंभीर विषय असूनही भाषा कुठेही क्लिष्ट वाटत नाही. सुहास कुलकर्णी यांची शैली साधी, ओघवती आणि प्रवाही आहे. त्यामुळे पुस्तक अभ्यासपूर्ण असूनही कंटाळवाणं वाटत नाही. विशेषतः नव्या पिढीला गांधीजी समजून घ्यायचे असतील, तर हे पुस्तक 'मस्ट रीड' आहे.

महत्त्वाचं म्हणजे, पुस्तकाचा शेवट गांधीजींच्या हत्येवर होत नाही. उलट त्यानंतरही गांधींचा विचार का जिवंत आहेत, जगाला आजही गांधींची गरज का आहे, हे लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे. ‘गांधी अभी जिंदा है’ हे प्रकरण वाचकाला विचार करायला भाग पाडतं. कारण गांधी हे फक्त इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाही, तर आजच्या काळातही संवाद, अहिंसा आणि सहअस्तित्व शिकवणारा विचार आहे, हे लेखक अधोरेखित करतात.

एकूणच, ‘असे होते गांधीजी’ हे केवळ गांधीजींवरच पुस्तक नाही, तर गांधी विचार समजून घेण्याचा एक गंभीर आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. गांधीजींवर प्रेम करणाऱ्यांसाठी, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांसाठी आणि त्यांच्याबद्दल संभ्रम असणाऱ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरतं. आजच्या विभाजित आणि अस्वस्थ काळात गांधींच्या विचारांकडे नव्याने पाहायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचायला हवं.

• पुस्तक : असे होते गांधीजी

• लेखक : सुहास कुलकर्णी

• प्रकाशक : समकालीन प्रकाशन

• पाने: 122, किंमत : 200 रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT