शहाजी शिंदे, संगणक प्रणालीतज्ज्ञ
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या फायद्यांविषयी ऐकून कानठळ्या बसणार्या काळात अनेकदा या तंत्रज्ञानाच्या धोक्यांकडे दुर्लक्ष होते. सध्या एआयच्या फोटो एडिटिंग टूलमधून निर्माण झालेल्या एआय साडी ट्रेंडच्या निमित्ताने उजेडात आलेला एका इन्स्टाग्राम यूजर युवतीचा ताजा अनुभव याची पुरेशी साक्ष देतो.
आजच्या डिजिटल युगात एआय तंत्रज्ञानाने मनोरंजन, सर्जनशील प्रयोग आणि सोशल मीडिया ट्रेंडस्मध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. सध्या एआयने आणलेला एक अत्यंत चर्चित ट्रेंड म्हणजे गूगलच्या जेमिनी एआयअंतर्गत येणारा ‘बनाना एआय साडी ट्रेंड’. या ट्रेंडमध्ये यूजर्स महिलांनी आपले छायाचित्र अपलोड केल्यानंतर एआय टूल त्या छायाचित्रांत मनमोहक साडीचे बदल करून सादर करते. सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे हा ट्रेंड वेगाने पसरला आहे. लाखो जणी इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकसह इतर प्लॅटफॉर्मवर स्वतःचे फोटो अपलोड करीत आहेत आणि एआयच्या मदतीने ते साडीत रूपांतरित करून शेअर करत आहेत; मात्र या आनंदात काही वापरकर्त्यांना भयानक अनुभवही आले आहेत आणि त्यामुळे एआय आणि डिजिटल गोपनीयतेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच एका युवतीने तिचा अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्याने अनेक यूजर्सना धक्का दिला. या युवतीने सांगितले की, तिने जेमिनीवर आपला साडीतील फोटो अपलोड करून आपल्या आवडीचा प्रॉम्प्ट दिला; मात्र तयार झालेल्या प्रतिमेत तिच्या शरीरावरील तीळदेखील स्पष्ट दिसून आला. एआय तंत्रज्ञान अखेर कोणत्याही व्यक्तीच्या शरीरातील गुप्त तपशिलांचा शोध कसा घेते? हा काही योगायोग नसून एआयच्या गुप्तहेरगिरीचेच रूप मानले पाहिजे, ज्यात तो प्रत्येक फोटो स्कॅन करून डेटाबेसशी जोडतो आणि आपल्या खासगी तपशिलांचा पर्दाफाश करतो. सदर युवतीच्या अनुभवाने अनेक लोकांमध्ये डिजिटल गोपनीयतेबाबत भीती निर्माण केली. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या व्हिडीओला सात मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले, तसेच शेकडो कमेंटस् आल्या. एक यूजर म्हणाला, सर्व काही जोडलेले आहे. जेमिनी गुगलचे आहे आणि ते तुमचे फोटो आणि व्हिडीओ पाहून एआय प्रतिमा तयार करतात.
दुसर्या यूजरने लिहिले, माझ्यासोबतही असे झाले. माझे टॅटू, जे माझ्या मूळ फोटोमध्ये दिसत नाहीत, प्रतिमेत स्पष्ट दिसत होते. तिसर्या यूजरने स्पष्ट केले, एआय असेच कार्य करते. तुमच्या डिजिटल फूटप्रिंटमधून माहिती काढून ती वापरली जाते. त्यामुळे तुम्ही जे फोटो अपलोड केले, त्याचादेखील वापर केला जातो. हा अनुभव स्पष्ट करतो की, एआय फक्त क्रिएटिव्ह किंवा मनोरंजनात्मक साधन नाही, तर वापरकर्त्यांच्या डिजिटल फूटप्रिंटवर आधारित माहिती मिळविणारे तंत्रज्ञान आहे. जेमिनी एआयसारखे मॉडेल्स वापरकर्त्यांच्या आधीच्या फोटो, व्हिडीओ आणि ऑनलाईन उपस्थितीचा अभ्यास करतात आणि त्यानुसार प्रतिमा तयार करतात. त्यामुळे वापरकर्त्यांना समजत नसले, तरी एआय त्यांच्या व्यक्तिगत गोपनीयतेला प्रचंड धोका निर्माण करू शकतो.
बनाना एआय साडी ट्रेंडसारख्या प्रयोगांमध्ये वापरकर्त्यांची उत्सुकता खूप जास्त दिसून येते. तरुणाई आपल्या डिजिटल व्यक्तिमत्त्वाचा प्रयोग करायला बिनधास्त प्राधान्य देते. हे करताना ते आपल्या वैयक्तिक माहितीबाबत निष्काळजी राहतात. सोशल मीडिया आणि एआय प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ किंवा व्यक्तिगत माहिती अपलोड करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. एआयच्या माध्यमातून तयार होणार्या प्रतिमांमध्ये आपल्या प्रतिमेचा वापर करून धक्कादायक परिणाम समोर येऊ शकतात. हा डेटा चुकीच्या हातात गेल्यास व्यक्तिगत गोपनीयतेसाठी गंभीर धोका निर्माण करतो. दुसरी ताजी घटना एका ख्यातनाम धर्मगुरूच्या डीपफेक व एआयनिर्मित व्हिडीओची आहे. यामध्ये बेंगळुरूतील एका महिलेची फसवणूक झाली. एआय तंत्रज्ञान मानसिक आरोग्यासाठीसुद्धा धोकादायक ठरत आहे. चॅटबॉटस्ना विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे अनेकदा अतिशय घातक असतात. अमेरिकेतल्या एका किशोराचे उदाहरण समोर आले आहे, ज्याने चॅटजीपीटीशी आत्महत्येचे विचार शेअर केले. बॉटने त्याला प्रशिक्षकाप्रमाणे मार्ग सुचवून इतके गोंधळात टाकले की, त्या किशोराने खरोखर आत्महत्या केली.
अलीकडील एका अहवालातून समोर आले आहे की, चॅटजीपीटी आणि जेमिनी यांना विचारले गेले की, पुढील फुटबॉल सामन्यात कोणत्या टीमवर डाव लावावा, तेव्हा दोघांनीही एकाच सामन्यासाठी एकसारखे भाकीत वर्तवले. त्यांनी सांगितले की, ओले मिस ही टीम केंटकीला 10.5 गुणांनी हरवेल; मात्र वास्तवात ओले मिस सात गुणांनी जिंकली. प्रश्न हा नाही की, एआयने चुकीचा सल्ला कसा दिला? सट्टा बेकायदेशीर असताना एआयने असा सल्लाच का दिला? तज्ज्ञांच्या मते एआय चॅटबॉटस्मध्ये ‘कॉन्टेक्स्ट विंडो’ असते, जी तुमच्या आधीचे संवाद लक्षात ठेवते; मात्र ती प्रत्येक गोष्टीला समान महत्त्व देत नाही.
ट्युलन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका युमेई हे यांनी हा मुद्दा सिद्ध केला. त्यांनी दाखवले की, जेव्हा एआयला प्रथम जुगाराविषयी सल्ला विचारला आणि त्यानंतर व्यसनाविषयी चर्चा केली, तेव्हा एआयने जुगाराविषयी दिलेल्या सल्ल्यालाच अधिक महत्त्व दिले आणि तसाच प्रतिसाद देत राहिला; पण जेव्हा त्यांनी नवीन चॅट सुरू करून प्रथम जुगाराच्या व्यसनाबद्दल विचारले, तेव्हा एआयने स्पष्टपणे डाव लावण्याचा सल्ला देण्यास नकार दिला. याचा सरळ अर्थ असा की, एआयचे वर्तन तुमच्या संवादाच्या पद्धतीवर अवलंबून असते. चॅटजीपीटीने मान्य केले आहे की, त्यांचे सुरक्षा फिचर्स लहान संभाषणात अधिक चांगले काम करतात; पण लांब संभाषणात एआय पूर्वीच्या संवादावर आधार घेऊन चुकीची उत्तरे देऊ शकतो. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला आहे की, एआयशी जास्त संभाषण टाळावे. कारण, ते तुम्हाला सहजपणे फसवू शकते.
एआयचा वापर फक्त प्रतिमा तयार करण्यापुरता मर्यादित नाही. अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे प्रचंड वाढलेली आहेत. या फसवणुकीच्या पद्धतींमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापरही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. काही स्कॅमर लोकांना फसवण्यासाठी एआयच्या मदतीने संदेश तयार करून पाठवतात. ताज्या तपासणीत असेही समोर आले की, काही प्रसिद्ध एआय चॅटबॉट काही मिनिटांत फिशिंग ई-मेल तयार करताहेत. चॅटजीपीटी, ग्रोक आणि मेटा एआयसारखे चॅटबॉटस् फिशिंग ई-मेल तयार करण्यात सक्षम आहेत. एका प्रयोगात एआयच्या ग्रोकने वरिष्ठ नागरिकांना लक्ष्य करणारे फिशिंग ई-मेल्स तयार केले. ओपन एआयच्या चॅटजीपीटी-5 मॉडेलने प्रारंभी असे काम करण्यास नकार दिला होता; परंतु हे काम शैक्षणिक उद्देशासाठी वापरायचे असे सांगितले तेव्हा बँकिंगसंदर्भातील फिशिंग ई-मेल तयार करणे आणि त्यामध्ये वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाची माहिती सूत्रबद्ध पद्धतीने देणे सुरू केले. यावरून असे संदेश ठकसेनांच्या हातात गेल्यास किती धोका होऊ शकतो, हे स्पष्ट होते. एक प्रयोगात असे दिसून आले की, तयार केलेले फिशिंग ई-मेल 108 वरिष्ठ नागरिकांना पाठवले गेले. त्यापैकी सुमारे 11 टक्के लोकांनी ई-मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले. यामुळे एआय योग्य सुरक्षात्मक उपायांशिवाय वापरले गेले, तर ते सायबर गुन्हेगारी खूप वेगाने वाढवू शकते, हे स्पष्ट झाले. हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून सामाजिक आणि कायदेशीर आव्हानदेखील आहे. सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी यासाठी कठोर नियम, जागरूकता मोहीम आणि सुरक्षा उपाय यावर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. समाजातील नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा शिक्षण आणि फिशिंग ओळखण्याची क्षमता वाढवणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.