AI Impact on Education | पारंपरिक शिक्षण पद्धत कालबाह्य होईल? Pudhari File Photo
बहार

AI Impact on Education | पारंपरिक शिक्षण पद्धत कालबाह्य होईल?

पुढारी वृत्तसेवा

प्रा. डॉ. संजय वर्मा, माध्यमतज्ज्ञ-विचारवंत

ओपन एआयचे सर्वेसर्वा सॅम अल्टमन यांनी एआयच्या वाढत्या प्रसारामुळे आणि तंत्रज्ञानामुळे आपला मुलगा शिक्षणासाठी महाविद्यालयात जाईल, असे वाटत नाही, असे मत मांडून कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जगभरात दाटलेल्या भीतीला नवी फोडणी दिली आहे. वास्तविक अल्टमन यांचे वक्तव्य भारतापेक्षा अमेरिका आणि विद्यापीठांसाठी चिंतेचा विषय असायला हवा; मात्र कंपन्यांकडून एआयचे वेगवेगळे मॉडेल आणले जात असताना शिक्षण क्षेत्रासमोर नवीन आव्हाने निर्माण होत आहेत.

साधारणत: तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये ओपन एआय नावाच्या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या माध्यमातून कार्य करणारी भाषिक चॅटबोट-चॅटजीपीटी लाँच केली आणि जगभरात खळबळ उडाली. या शोधामुळे शिक्षण विश्वातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या आविष्काराच्या लोकार्पणानंतर पाच दिवसांतच जगात दहा लाख लोकांनी चॅटजीपीटीचा वापर सुरू केला. परिणामी, अमेरिकेच्या काही विद्यापीठात चॅटजीपीटी वापरण्यावर बंदी घालण्यात आली. न्यूयॉर्क आणि सिएटल येथील विद्यापीठ, महाविद्यालयांच्या प्रशासनाने त्यांच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये असताना स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप तसेच सर्व्हरशी जोडलेल्या संगणकावर चॅटजीपीटीला ब्लॉक करून ठेवले. सध्या चर्चा करण्याचे कारण म्हणजे, ओपन एआयचे सर्वेसर्वा सॅम अल्टमन यांनी एआयच्या वाढत्या प्रसारामुळे आणि तंत्रज्ञानामुळे आपला मुलगा शिक्षणासाठी महाविद्यालयात जाईल, असे वाटत नाही, असे मत मांडून आणखीच गोंधळ निर्माण केला आहे.

वास्तविक अल्टमन यांचे वक्तव्य भारतापेक्षा अमेरिका आणि विद्यापीठांसाठी चिंतेचा विषय असायला हवा. कारण, दर्जात्मक उच्च शिक्षण असल्याचा दावा करत ही विद्यापीठे जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करत असतात. दुसरे म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्थलांतरितांसंदर्भातील मुद्दा आणि अमेरिकी विद्यापीठांतील वैचारिक स्वातंत्र्य यातील द्वंद्व तूर्त बाजूला ठेवले, तरी या नामांकित विद्यापीठांची प्रतिष्ठा अजूनही कायम आहे; मात्र कंपन्यांकडून एआयचे वेगवेगळे मॉडेल आणले जात असताना शिक्षण क्षेत्रासमोर नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. म्हणूनच अल्टमन यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा संयुक्तिक वाटतो. म्हणूनच पारंपरिक शिक्षण पद्धतीचे भवितव्य एआयमुळे संकटात तर आले नाही ना, असा विचार येतो.

सध्याच्या एआयच्या युगात प्राध्यापक, शिक्षकांसमोरचे आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांना एआयचा वापर करण्यापासून कसे रोखावे? शाळा, महाविद्यालयांतील सामान्य अभ्यासक्रमातच नाही, तर पीएच.डी.साठी संशोधन करणारे विद्यार्थीदेखील एआयची मदत घेत संशोधन पेपर तयार करत आहेत. असेच एक प्रकरण अमेरिकेच्या मिनिसोटा विद्यापीठात नुकतेच घडले आहे. पीएच.डी.च्या एका विद्यार्थ्याला परीक्षेत एआयचा वापर केल्याने दोषी ठरविण्यात आले. संशोधन कार्यातील गुंतागुंत, महत्त्व अणि त्याचे पावित्र्य ओळखून केलेली कारवाई योग्य ठरवता येईल. त्याचवेळी संबंधित विद्यार्थ्याने एआय तपासणीत अनियमितेतचा आरोप करत विद्यापीठाने पारदर्शक पद्धतीने प्रक्रियेचे पालन न केल्याचा आरोप करत प्रोफेसरविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. आणखी एक प्रकरण नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे असून तेथील प्रकार वेगळा आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या प्राध्यापकाविरोधात तक्रार नोंदविली आणि अध्यापनासाठी त्यांनी वापरलेले शैक्षणिक साहित्य एआय टूल्सने तयार केल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे होते. विद्यार्थ्याने या आधारावर शिकवणीचे शुल्क परत मागितले. प्रोफेसरने एआयचा वापर केल्याचे मान्य केले आणि अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याची गरज बोलून दाखविली. या घटनांवर प्रकाश टाकला, तर अल्टमन हे नवीन आव्हाने आणि शंका उपस्थित करत असतील, तर ते बरोबरच असल्याचे वाटते. सध्याच्या काळात नामांकित विद्यापीठात ज्या पद्धतीने उच्च शिक्षण शिकवले जाते, ते पाहता येत्या पाच-सहा वर्षांत त्याच्या स्वरूपात बदल केला नाही, तर विद्यार्थी एआयला गुरू मानू लागतील. त्यामुळे पारंपरिक शिक्षण केंद्र आणि पद्धतीला वाचवायचे असेल, तर ज्याप्रमाणे एआय आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या मागे हात धुवून लागले आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने ते वाचविण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

आजच्या काळातील शिक्षणाचे मॉडेल पाहिले, तर यात उच्च शिक्षणाचा अर्थ हा रँकिंग आणि शोधासाठी मदत करणार्‍या पंचतारांकित प्रणालीवर अवलंबून आहे. कागदावर या संस्था नामांकित वाटू लागतात. शिक्षण मंडळांच्या नियमांचे आणि निकषांचे पालन करणार्‍या शिक्षण संस्था मोठा गाजावाजा करत रँकिंगचा बोलबाला करत असतात. या आधारावर पैशाची लयलूट करणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश येते; मात्र या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या बाजारात स्वत:ची पात्रता सिद्ध करता येत नाही आणि त्यांचे संशोधन कोणत्याही उद्योगात मान्य केले जात नाही. या शिक्षण संस्था एवढ्या पात्र असतील, तर तेथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत गुगल, ट्विटर, टिकटॉक, डीपसीक किंवा चॅटजीपीटीसारखे मॉडेल का तयार करता आले नाही? भारतात आयफोन का तयार होऊ शकला नाही? जगाला भुरळ पाडणारी सौरऊर्जा प्रणाली भारतात का विकसित होऊ शकली नाही?

याचा सारासार विचार केला, तर कॉपी करणे, प्रोजेक्ट तयार करणे हा एक भाग आणि सखोल अभ्यास (क्रिटिकल थिंकिंग) करत शोध लावणे हा दुसरा मुद्दा. एखादा शिक्षक बराच काळ अभ्यास आणि संशोधन करून एखाद्या शिक्षण संस्थेत संशोधन पेपर घेऊन गेला, तर त्याला नाकारले जाते. अमेरिकेत असे काही घडले नाही आणि तुम्ही उगाचच वेळ वाया घालवला असे म्हणून पाठवणी केली जाते. मूलभूत, सखोल अभ्यास, चिंतन आणि मौलिक संशोधनाबाबत नकारात्मक द़ृष्टिकोन बाळगला जात असल्याने आपली बहुतांश विद्यापीठे ही केवळ पदवी देण्याची ठिकाणे झाली आहेत. लक्षात ठेवा, एआय तंत्रज्ञान मूळ विचारसरणीची जागा घेऊ शकत नाही. तो एक कॅलकुलेटरप्रमाणे आकडेमोड करतो. तुम्ही जे कमांड देता त्यानुसार त्याचा रिझल्ट मिळतो. त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर चॅटजीपीटीसारखे टूल एका प्रश्नाचे अनेक उत्तरे देऊ शकते; परंतु जेव्हा एखाद्या नवीन स्थितीत मूलभूत उपाय शोधण्याचा मुद्दा येतो तेव्हा एआय गडबडून जाते. यावरून चॅटजीपीटीसारख्या लार्ज लँग्वेज मॉडेलकडे इतिहासासंदर्भात बराच डेटा असतो; परंतु तो इतिहास आणि ऐतिहासिक द़ृष्टिकोन योग्यरितीने समजून घेतलेले नसते. अशावेळी भाषा आणि उपलब्ध डेटाच्या आधारावर तुम्हा हवे असणारे आणि सत्याजवळ जाणारे उत्तर मिळते. या मॉडेल्सकडून अभिजात उत्तर देण्याची अपेक्षा बाळगणे चुकीचे राहू शकते.

एआय टूल्स हे स्वत:च लिहिलेले लेखही समजून घेत नाही. त्यांना शब्दांचा शब्दशः अर्थ ठाऊक नसतो. ते केवळ उपलब्ध डेटा आणि त्यास अनुसरून असलेल्या तथ्याच्या आधारे भाषेला शिस्तबद्ध रितीने सादर करतात. त्यांनी लिहिलेला लेख एखाद्या तज्ज्ञाने लिहिलेल्या लेखाप्रमाणे असू शकतो; परंतु ते तथ्यात्मकरीत्या चुकीचे असू शकते. त्यांचे संपादनहीअ‍ॅकॅडमिक दर्जाचे नसते. त्यांच्यात समीक्षा आणि संपादनात त्रुटी राहू शकतात; पण या चुका माणसाकडून होण्याची शक्यता नसते. एआय मॉडेल हे उपलब्ध साहित्यातून तथ्यावर प्रक्रिया करत संबंधित बाब आपल्यासमोर सादर करत असते आणि त्यामुळे हे साहित्य आपल्या ज्ञानात भर घालणार नाही आणि त्यातून मूल्य शिक्षण मिळण्याची सुतराम शक्यताही राहत नाही. या गोष्टी लक्षात घेत आणि त्याच्या मर्यादा ओळखत एआयची मदत घेतली, तर काही प्रमाणात हे टूल साह्यभूत ठरू शकते; पण पारंपरिक उच्च शिक्षण पद्धत आणि शिक्षण संस्थांना वाचवायचे असेल, तर मूळ विचारसरणी जोपासणार्‍या शिक्षणाच्या या परंपरेचे जतन करावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT