कर्नल अभय पटवर्धन
दृष्टिपथात आलेली आखाती संघर्षाची युद्धबंदी पुन्हा दुभंगली असून इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. अमेरिकेचे एएच-६४ अपाचे हेलिकॉप्टर होर्मुझ सामुद्रधुनीवर गस्त घालत असताना ओमानच्या आखातात इराणच्या वन वे अटॅक ड्रोनचा बळी ठरल्याने डोनाल्ड ट्रम्प चवताळले आहेत. या युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू हे दोघेही पूर्णपणे एकाच भूमिकेत असल्याचे दिसत होते; मात्र जसजसा हा संघर्ष पुढे सरकत आहे, तसतसे या दोन्ही बड्या नेत्यांमधील धोरणात्मक मतभेद आणि अंतर्गत संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चव्हाट्यावर आले आहेत.
मागील काही दिवसांपासून होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत असतानाच परिस्थिती पुन्हा भडकताना दिसत आहे. मंगळवार, ९ जून २०२६ रोजी अमेरिकेचे एएच-६४ अपाचे हेलिकॉप्टर होर्मुझ सामुद्रधुनीवर गस्त घालत असताना ओमानच्या आखातात इराणच्या वन वे अटॅक ड्रोनचा बळी ठरले. इराणने हे हेलिकॉप्टर मुद्दाम पाडल्याचा आरोप सपशेल फेटाळून लावला असून, त्यांचा ड्रोन चुकून त्या हेलिकॉप्टरवर आदळला असावा, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, एक सक्षम आणि सशक्त युद्धबंदी पुढील ८ ते १० दिवसांत प्रत्यक्षात येईल, असा दावा केला होता. युद्ध सुरू झाल्यापासून त्यांनी अशाप्रकारचे आश्वासन तब्बल ३७ वेळा दिले असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याचा वैमानिक आणि गनर तब्बल दोन तास समुद्रात अडकून पडले होते. त्यांना मध्य पूर्वेत सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी कार्यरत असलेल्या बहरीनस्थित अमेरिकन टास्क फोर्स-५९च्या यूएसएस कॉर्सेअर या मानवरहित पृष्ठभागीय सागरी ड्रोनने वाचवले. ही नौका स्वतंत्रपणे किंवा डेटा लिंकच्या माध्यमातून मानवी ऑपरेटरच्या नियंत्रणाखाली नेटवर्कयुक्त समूहांमध्ये कार्य करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. अमेरिकेने मानवरहित लष्करी नौकेचा केलेला हा पहिलाच ज्ञात बचावात्मक वापर मानला जात असून, पारंपरिक साधनांसोबत मानवरहित वाहनांचा विस्तार करण्याच्या पेंटागॉनच्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे. प्रत्यक्ष संघर्ष परिस्थितीत अशाप्रकारची ही पहिलीच अमेरिकन कारवाई ठरली. २४ फूट लांबीचे हे ड्रोन स्पीडबोटच्या धर्तीवर कार्य करते आणि १००० नॉटिकल मैलांपर्यंत ४५३.५ किलो वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. या बचाव मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेच्या नौदल मध्यवर्ती कमांड आणि ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनने केले.
इराणच्या म्हणण्यानुसार हे हेलिकॉप्टर जाणूनबुजून पाडण्यात आले नव्हते, तर ते त्या परिसरातील अस्थिर परिस्थितीचा बळी ठरले; मात्र या घटनेमुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराला याचे तत्काळ आणि योग्य प्रत्युत्तर द्या, असा आदेश दिल्यानंतर अमेरिकेने इराणवर व्यापक क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये गोरिक आणि केशम बेटांवरील हवाई संरक्षण प्रणाली, सिरिक बेटावरील दोन जलविद्युत प्रकल्प, होर्मुझ, बुशहर, जस्क आणि बंदर अब्बास येथील लष्करी तळ, तसेच इस्फहान आणि अहवाजमधील आण्विक व औद्योगिक केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय सामुद्रधुनी परिसरातील इराणी रडार, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणांनाही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
इराणनेही या हल्ल्याला तातडीने प्रत्युत्तर देत आखातातील २१ ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यांमुळे कुवेतमधील अली अल सालेम एअर बेस आणि अमेरिकन कमांड सेंटर तसेच जॉर्डनमधील एफ-३५ लढाऊ विमान तैनात असलेल्या मुवफ्फक साल्टी एअर बेसचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय बहरीनस्थित अमेरिकन फिफ्थ फ्लीटवरही ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तेथील नुकसानीचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. बहरीनमधील अमेरिकेचे पाचवे फ्लीट, कुवेतमधील अली अल सालेम आणि जॉर्डनमधील अझराक हवाई तळांवर इराणने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागल्याचेही वृत्त आहे.
इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन लष्करी कारवाईला निर्णायक आणि कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत. हा संघर्ष अधिक वाढल्यास त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेवर असेल. अमेरिकन कारवायांना प्रमाणशीर, जलद आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, अन्यथा इराणवर सतत अमेरिकन हल्ल्यांची टांगती तलवार लटकत राहील. इराणचा दावा आहे की, होर्मुझ सामुद्रधुनी क्षेत्र इराण आणि ओमानच्या भौगोलिक प्रभावक्षेत्रात येते. त्यामुळे त्यांच्या भूभागाजवळ तैनात असलेले विदेशी सैन्य मानवी चुका, अपघात किंवा संभाव्य चकमकींमुळे कायम धोक्यात असते. दुसरीकडे, इराणी परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेला इशारा देत म्हटले आहे की, स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आमचा प्रदेश तातडीने सोडा, अन्यथा पुढील सर्वंकष युद्धातील परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
ट्रम्प यांनी इस्रायलला, इराणवरील हल्ले तातडीने थांबवा, अन्यथा यापुढे तुम्हाला अमेरिकन मदतीशिवाय एकट्याने लढावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी इराणवरील हल्ले थांबविल्याचे सांगितले गेले; मात्र ताज्या इराणी हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर, इराण युद्धबंदीसाठी तयार नाही. त्यासाठी त्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल, असे वक्तव्य केले. दुसरीकडे, इराणी राष्ट्रपतींच्या मते ‘ना युद्ध, ना शांतता’ ही परिस्थिती इराणसाठी अनुकूल नाही आणि देश अमेरिकेशी सर्वंकष युद्धासाठी तयार आहे. आता हेलिकॉप्टरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर दिले आहे. पुढे परिस्थिती कोणते वळण घेते आणि इस्रायलची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या मते, ताज्या कारवाईत अमेरिकेने इराणची लष्करी पाळत ठेवण्याची क्षमता, दळणवळण व्यवस्था आणि हवाई संरक्षण केंद्रांना गंभीर धक्का दिला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने होर्मुझ सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजवाहतुकीसाठी बंद करण्याची घोषणा केली; मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावत १० जूनच्या रात्रीही व्यापारी जहाजे सामुद्रधुनीतून नियमितपणे ये-जा करत असल्याचे सांगितले. एप्रिल 2026 मध्ये इराण-अमेरिका युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर घडलेला हा सर्वात मोठा संघर्ष मानला जात आहे. या संघर्षामुळे जागतिक तेलसाठ्यांवरील दबाव वाढला असून तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. व्यापारी तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. ११ जूनच्या पहाटेपर्यंत तरी या संकटावर कोणताही राजकीय तोडगा निघण्याची शक्यता दिसत नव्हती.
या नव्या संघर्षानंतर तेलाचे दर प्रतिबॅरेल ९८.७२ डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. युद्ध पुन्हा व्यापक स्वरूपात भडकले, तर भारतासह संपूर्ण जगाला त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आजमितीस या संघर्षामुळे जागतिक महागाईत १८ ते २६ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे सुमारे ४५० लाख लोक उपासमारीच्या धोक्याला सामोरे जात असल्याचेही सांगितले जाते. युद्ध आणखी तीव्र झाले, तर त्यातून जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागू शकतो, यात शंका नाही.
पश्चिम आशियातील या युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे दोघेही पूर्णपणे एकाच भूमिकेत असल्याचे दिसत होते; मात्र जसजसा हा संघर्ष पुढे सरकत आहे, तसतसे या दोन्ही बड्या नेत्यांमधील धोरणात्मक मतभेद आणि अंतर्गत संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चव्हाट्यावर आले आहेत. ‘एकच युद्ध मात्र भिन्न उद्दिष्टे’ अशी काहीशी परिस्थिती या दोन्ही मित्रांमध्ये निर्माण झाली आहे. नेतान्याहू यांच्यासाठी हे युद्ध केवळ संरक्षणापुरते मर्यादित नसून, इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहचे अस्तित्व पूर्णपणे संपवून टाकण्याची ही एक ऐतिहासिक संधी आहे, असे त्यांचे मत आहे. इस्रायलमध्ये येऊ घातलेल्या निवडणुका आणि अंतर्गत राजकीय दबाव पाहता, नेतान्याहू यांना या युद्धात निर्णायक विजय सिद्ध करायचा आहे. तथापि, ट्रम्प यांच्या दबावामुळे इस्रायलला नाईलाजाने काही पावले मागे घ्यावी लागत आहेत. बैरूत येथे झालेल्या मोठ्या लष्करी कारवाईनंतर इस्रायलने इराणवर थेट आणि मोठा प्रतिहल्ला करण्याची संपूर्ण तयारी केली होती. इराणच्या अणुकेंद्रांना आणि लष्करी तळांना लक्ष्य करून या भागातील त्यांचे वर्चस्व कायमचे संपवण्याचा इस्रायलचा हेतू होता; मात्र नेमक्या याच वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर प्रचंड राजनैतिक दबाव आणला. कोणत्याही परिस्थितीत इराणवर मोठा हल्ला करू नये, असे फर्मान ट्रम्प प्रशासनाने सोडल्यामुळे इस्रायलला आपले मनसुबे गुंडाळावे लागले होते. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे इराणला पुन्हा एकदा संघटित होण्याची संधी मिळाली, असा आरोप इस्रायली संरक्षणतज्ज्ञांकडून केला जात आहे. ट्रम्प हे इराणसोबतच्या राजनैतिक वाटाघाटींवर आणि अमेरिकेला नव्या युद्धातून बाहेर काढण्यावर अधिक भर देत आहेत. कारण, त्यांना हे युद्ध लवकरात लवकर संपवून खनिज तेलाची आंतरराष्ट्रीय वाहतूक करणारी होर्मुुझची खाडी खुली करायची आहे, जेणेकरून अमेरिकेतील इंधनाचे दर नियंत्रणात राहतील. अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र देश असलेला इस्रायल आता स्वतःची स्वतंत्र रणनीती आखण्याच्या विचारात आहे. इस्रायल आपले लष्करी स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काय पावले उचलतो, यावरच पश्चिम आशियाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.