प्रा. सतीश कुमार, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांनी गेल्या काही दिवसांत झालेल्या रक्तरंजित सीमासंघर्षानंतर दोहा (कतार) येथे युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. हा करार केवळ दोन देशांमधील तातडीचा संघर्ष रोखण्यासाठी नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियातील शांततेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. 2021 मध्ये तालिबानने काबूलवर पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संबंधांमध्ये सलग वाढत चाललेली अविश्वासाची दरी आता पहिल्यांदाच औपचारिक चर्चेत उतरली आहे. दोहा चर्चेमध्ये कतार आणि तुर्किये यांनी मध्यस्थी केली हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ आणि अफगाण संरक्षणमंत्री मोल्ला मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी करारावर स्वाक्षरी केली.
या करारानुसार, दोन्ही देश एकमेकांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाया करणार नाहीत आणि कोणत्याही दहशतवादी गटांना आश्रय देणार नाहीत. हे एक महत्त्वाचे वचन आहे; कारण गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानकडून वारंवार असा आरोप केला जात होता की, अफगाण भूमीचा वापर पाकिस्तानी लष्करावर हल्ल्यांसाठी होत आहे. पाकिस्तानने अनेकदा अफगाणिस्तानातील तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेवर दोषारोप केला आहे की, ती अफगाण भूमीवरून कार्यरत आहे आणि पाकिस्तानात दहशतवादी हल्ले घडवते. याउलट तालिबानचा दावा आहे की, पाकिस्तान स्वतः दहशतवाद्यांना वापरून अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण करत आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या सावलीत सीमावाद वाढत गेला आणि अखेर अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारतात आले असताना, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर या संघर्षाचे रूपांतर युद्धात झाले होते. गेल्या महिनाभरात तीव्र संघर्ष, हवाई हल्ले आणि शेकडो जखमींनंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या पार्श्वभूमीवर दोहा बैठक झाली. चर्चेतून तत्काळ आणि संपूर्ण युद्धविराम निश्चित करण्यात आला असून, दोन्ही पक्षांनी पुन्हा इस्तंबूल येथे भेट घेण्याचे ठरवले आहे. या चर्चेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कतार व तुर्किये यांची भूमिका. हे दोन्ही देश आता अफगाणिस्तानातील राजनैतिक प्रक्रियेत मध्यस्थी म्हणून पुढे येत आहेत. यामुळे अमेरिकेच्या अनुपस्थितीत नवे प्रादेशिक संतुलन निर्माण होत आहे.
असे असले तरी युद्धविराम झाल्यानंतरही काही तासांतच पाकिस्तानकडून अफगाण भूमीवर नवीन हवाई हल्ले झाल्याचे अफगाण अधिकार्यांचे म्हणणे आहे. यामुळे हा करार प्रत्यक्षात किती काळ टिकणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. तरीसुद्धा तालिबान नेतृत्वाने संयम दाखवत प्रत्युत्तरात्मक हल्ले न करण्याचे आदेश दिले आहेत. कारण, चर्चेचा सन्मान राखणे त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा मुद्दा बनला आहे. दोहा युद्धविरामाची घोषणा ही फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसाठीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक दिलासा मानली जात आहे. या प्रदेशातील अस्थिरता भारतासाठी थेट सुरक्षा आणि आर्थिक परिणाम घडवणारी ठरते. कारण, भारत गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प राबवत आहे. भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध राहिला आहे. तालिबान सत्तेत येण्यापूर्वीच्या काळात भारताने काबूलपासून हेरातपर्यंतचे रस्ते, सलमा धरण, अफगाण संसदेची इमारत आणि असंख्य आरोग्य, शिक्षण प्रकल्प उभारले. या सर्व प्रयत्नांचा उद्देश अफगाणी जनतेमध्ये शांतता, शिक्षण आणि रोजगार वाढवणे हा होता. मात्र, 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पांपैकी अनेक ठप्प झाले. कारण, तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता नसल्यामुळे थेट सहकार्य थांबले. तरीही भारताने आपला राजनैतिक संवाद पूर्णपणे बंद केला नाही. दोहा, ताश्कंद आणि मॉस्कोमार्गे भारत सतत अफगाण नेत्यांशी संपर्क ठेवून होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान-अफगाण संघर्ष भारतासाठी अत्यंत चिंताजनक ठरला होता. कारण, जर हा सीमासंघर्ष दीर्घकाळ चालला असता, तर अफगाणिस्तानातील स्थैर्याचा पाया अधिक डळमळीत झाला असता आणि भारताच्या विकास प्रकल्पांवर पुन्हा संकट आले असते.
भारताचे परराष्ट्र धोरण नेहमीच शांततेतून विकास या तत्त्वावर आधारलेले आहे. दक्षिण आशियात शांतता टिकवून ठेवणे म्हणजे भारताच्या व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेला अनुकूल वातावरण निर्माण करणे. अफगाणिस्तान भारतासाठी मध्य आशियाकडे जाणारे प्रवेशद्वार आहे. चाबहार बंदर आणि झरांज-दिलाराम महामार्गासारखे प्रकल्प भारताने अफगाणिस्तानमार्गे इराण आणि मध्य आशियाशी जोडणी साधण्यासाठी सुरू केले आहेत. हे प्रकल्प सुरळीत राहावेत, यासाठी त्या भागातील शांतता आवश्यक आहे. त्यामुळे पाकिस्तान-अफगाण युद्धविराम भारतासाठी सकारात्मक घडामोड आहे.
तालिबान सत्तेत आल्यानंतर चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तान या देशांनी अफगाणिस्तानाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध प्रस्थापित केले आहेत. चीनला अफगाणिस्तानातील खनिज संपत्ती आणि बेल्ट-अँड-रोड उपक्रमाचा विस्तार महत्त्वाचा वाटतो, तर रशिया प्रादेशिक स्थैर्यावर लक्ष ठेवून आहे. भारतासाठी मात्र मानवतावादी आणि विकासात्मक द़ृष्टिकोन सर्वाधिक महत्त्वाचा आहे. भारताने नेहमी सांगितले आहे की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ नये आणि त्या देशात सर्वसमावेशक शासन निर्माण व्हावे. या द़ृष्टिकोनातून पाहता, दोहा युद्धविराम हे भारताच्या भूमिकेला अनुकूल आहे. कारण, अफगाण सरकारने या करारात स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध होणार नाही. तथापि, या युद्धविरामाचे यश अजूनही अनिश्चित आहे. कारण, दोन्ही देशांतील अविश्वास फार खोल आहे.
पाकिस्तान अजूनही तालिबान शासनावर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप करत आहे, तर तालिबान पाकिस्तानला दोष देत आहे की, त्यांनी अफगाण सीमेवरून हवाई हल्ले करून आमचे नागरिक ठार केले. जर हे आरोप सुरू राहिले, तर युद्धविरामाचे अस्तित्वच नाहीसे होईल. मात्र, कतार आणि तुर्किये यांच्या मध्यस्थीने सुरू झालेली ही संवाद प्रक्रिया पुढेही सुरू राहिली, तर आंतरराष्ट्रीय समुदाय विशेषतः भारत या संवादाला अधिक बळ देऊ शकेल. भारताने आपली गुडविल डिप्लोमसी (सद्भावनाधारित कूटनीती) वापरून तालिबानशी मानवी मदत आणि विकास सहकार्याच्या स्तरावर संवाद ठेवायला हवा.
सकारात्मक आशेचा किरण
भारत सध्या अफगाणिस्तानमध्ये अन्नधान्य, औषधे आणि शिक्षणविषयक मदत पुरवत आहे. गेल्यावर्षी भारताने 50,000 टन गहू आणि वैद्यकीय साहाय्य काबूलला पाठवले होते. अशा मानवतावादी मदतीतून भारताने आपला प्रभाव राखला आहे. जर युद्धविराम टिकून राहिला, तर भारत पुन्हा काही विकास प्रकल्प सुरू करू शकेल. विशेषतः, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात. तसेच, अफगाणिस्तान स्थिर राहिला, तर भारताचे मध्य आशियाशी व्यापारमार्ग खुले राहतील आणि संपूर्ण दक्षिण आशियात स्थैर्य निर्माण होईल.
एकूणच, दोहा युद्धविराम हा दक्षिण आशियातील सध्याच्या अस्थिरतेत एक सकारात्मक किरण आहे. तो दीर्घकाळ टिकला, तर केवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानलाच नव्हे, तर भारतालाही आर्थिक आणि राजनैतिक लाभ होईल. भारताने कायम ठेवलेली शांततामूलक भूमिका या प्रक्रियेत महत्त्वाची ठरेल. अफगाणिस्तानात शांतता टिकली, तर भारताच्या शेजार्यांशी विकास आणि सहकार्य या नीतीला नवी ऊर्जा मिळेल आणि दक्षिण आशिया दीर्घकाळानंतर स्थैर्याच्या मार्गावर परत येईल, हा या युद्धविरामाचा खरा अर्थ आहे.