सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक-प्रसारक, लेखक बिबेक देबरॉय यांचे अलीकडेच निधन झाले. देशातील प्रतिभावंत आणि नव्या बौद्धिक संकल्पना मांडणार्या लेखकांत देबरॉय यांचा समावेश होता. निष्णात भाषांतरकार असण्याबरोबरच अध्यात्म, संस्कृती आणि इतिहासाचा अनोखा संगम साधणारे त्यांचे विचार दिशादर्शक होते. आर्थिक तज्ज्ञ म्हणून त्यांनी तार्किक विश्लेषणाच्या माध्यमातून धोरणांची दिशा निश्चित केली. ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होते. शिवाय अर्थ मंत्रालयाच्या ‘अमृतकाल’ योजनेचा पायाभूत आराखडा तयार करणे आणि निधी पुरवठा करणे यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही होते. देशाला आर्थिक नवदिशा, नवद़ृष्टिकोन देण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना अद्वितीय प्रतिभावान लेखक आणि तत्त्ववेत्ते या शब्दांत त्यांचा गौरव केला आहे. देबरॉय यांच्या कार्याला उजाळा देताना अनोखे व्यक्तिमत्त्व म्हणून उल्लेख केला. देबरॉय यांचा जन्म 25 जानेवारी 1955 रोजी शिलाँग येथे झाला. त्यांचे पूर्वज सिल्हेटहून (बांगला देश) शिलाँगला स्थलांतरित झाले होते. देबरॉय यांचे शालेय शिक्षण रामकृष्ण मिशनमधून पूर्ण झाले. त्यांनी कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेज आणि नंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण पूर्ण केले. ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले आणि तेथे त्यांची भेट फ्रँक हॅन यांच्याशी झाली. हॅन हे नामांकित ब्रिटिश अर्थतज्ज्ञ. हॅन यांच्या नेतृत्वाखाली देबरॉय यांनी आर्थिक क्षेत्रात संशोधन केले. देबरॉय यांच्या यशोगाथेचा हा पहिला टप्पा होता.
मात्र त्यांची डॉक्टरेट पूर्ण होऊ शकली नाही. त्यांनी अनेक ग्रंथांचा अनुवाद केला. यात महाभारत तसेच पौराणिक कथांचा समावेश आहे. इंग्रजी आणि बांगला भाषेत अनुवाद असलेल्या या ग्रंथांचे अन्य भाषांतही अनुवाद करण्यात आले. वास्तविक ते लेखक होऊ इच्छित होते आणि तसे ते अनेकदा अप्रत्यक्षपणे बोलूनही दाखवत असत. परंतु माणसांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक विषमता पाहून त्यांचा ओढा लेखनाऐवजी आर्थिक संशोधनाकडे गेला. यावर काम करण्याचा त्यांनी विचार बोलून दाखविला.
देबरॉय यांनी चार दशकांच्या काळात क्रीडा सिद्धांत, आर्थिक सिद्धांत, उत्पन्न आणि सामाजिक असमानता, गरिबी, कायद्यातील सुधारणा, रेल्वे सुधारणा आणि भारतविद्या (इंडोलॉजी) क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. बहुभाषिक प्रतिभा असणार्या देबरॉय यांचे सहलेखन असणार्या ‘इंक्ड इन इंडिया’ पुस्तकाची खूप चर्चा झाली. ‘गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक’ हे त्यांचे पुस्तक आर्थिक सुधारणांसाठीचा महत्त्वाचा ऐवज मानला जातो. ते नीती आयोगाचे देखील सदस्य होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2015 मध्ये पद्मश्री आणि 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया-इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला. वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्व क्षमता, सार्वजनिक सेवा, विविध क्षेत्रांतील कार्य, दिवाळखोरीसंदर्भातील कायदा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना इन्सॉल्व्हन्सी लॉ अकादमी एमिरेटस् फेलोशिपने गौरविण्यात आले.
आपली मातृभूमी आणि मातृभाषा असलेल्या बांगलावर त्यांचे अतोनात प्रेम होते. कोलकाता येथील आठवणी नेहमीच त्यांना ताजेतवाने करत असत. बांगलाप्रेमापोटी ते कोलकाता आणि शिलाँगला नेहमी भेट देत असत. एका मुलाखतीत त्यांनी बोलताना शिलाँग आणि कोलकाता येथील दिवस कधीही विसरू शकत नाही, ही दोन्ही ठिकाणं माझे प्रेरणास्रोत असून त्या मनाला उभारी देण्याचे काम करतात, असे म्हटले होते. ते काही काळ आर्थिक वर्तमानपत्राचे सल्लागार संपादकदेखील राहिले आहेत.
फार कमी लोकांना ठाऊक असेल; पण भारतीय रेल्वेचा कायापालट होण्यामागे देबरॉय यांचे मोलाचे योगदान होते. ते आपल्या विचारांवर ठाम असायचे. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट, भारतीय व्यापार संस्था आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक रिसर्च या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. संसद टीव्हीवरील ‘इतिहास’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील त्यांनी केले होते. टेलिव्हिजनसमवेत काम करण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होता, असे ते म्हणत. विद्यार्थी या नात्याने त्यांनी टेलिव्हिजन क्षेत्राला जवळून अनुभवले आणि पत्रकारिता करण्याबरोबरच भाषांतरकार म्हणून प्रचंड काम केले.
देबरॉय यांनी केलेल्या अनुवादात ‘महाभारत’च्या संपूर्ण आवृत्तीची इंग्रजीतील दहा खंडांची मालिका, गीता, हरिवंश, वेद आणि वाल्मीकी रामायण (तीन खंड) याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांनी भागवत पुराण (तीन खंड), मार्कंडेय पुराण (एक खंड), ब्रह्म पुराण (दोन खंड), विष्णू पुराण (एक खंड), शिवपुराण (तीन खंड) आणि ब्रह्मांड पुराण (दोन खंड) याचे भाषांतर केले आहे. मन्मथनाथ दत्त यांच्यानंतर महाभारत आणि रामायण या दोन्हींचे संपूर्ण रूपातून इंग्रजीत अनुवाद करणारे देबरॉय हे दुसरे व्यक्ती होत. शिवपुराण अनुवाद हा केवळ अनुवादच म्हणूनच नाही तर एक बौद्धिक सेतू म्हणून ओळखला जातो. तो वाचकांना समकालीन भारताच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाशी जोडतो.
देबरॉय यांनीं शिवपुराणातील अतिशय कठीण मुद्दे, आख्यायिका आणि आध्यात्मिक दृष्टिकोन अतिशय कौशल्याने मांडले आहेत. देबरॉय यांची जीवन, मृत्यू आणि अष्टवक्र गीता ही पुस्तकेही चर्चेत राहिली. आर्थिक सल्लागाराच्या रूपातून ‘अमृतकाल’ची मांडलेली नवीन संकल्पना त्यांचे विशेष कार्य अधोरेखित करते. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘अमृतकाल’ साकारताना व्यापक बदल आणि कठोर निर्णय घेण्याचेही खडतर आव्हान असेल. ते एक संवेदनशील लेखक, पत्रकार आणि विश्लेषक होते.सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील आपल्या स्तंभलेखनात निधनाच्या चार दिवस आधी जो लेख देबरॉय यांनी दिला, त्यामध्ये असे लिहिले होते की, वेळ निघून चालला आहे. दिवस आणि महिने सरकत चालले आहेत. इथून निघून जाणे म्हणजे पृथ्वीवरून जाणे नाही. या परिघाबाहेरही एक विश्व आहे. मी तिथे नसेन तर काय होईल? याला योगायोग म्हणायचा की मृत्यूबाबत मिळालेला संकेत?
सामान्यतः अध्यात्म, संस्कृती, इतिहास, पुराण यांचे अभ्यासक अर्थशास्रासारख्या जटिल, गुंतागुंतीच्या विषयांपासून स्वतःला दूर ठेवतात; तर अर्थशास्राचे अभ्यासक पुराण, अध्यात्माच्या मागे धावण्यापेक्षा आर्थिक संज्ञा, जमिनीवरचे वास्तव यांचा वेध घेण्याला प्राधान्य देतात. याला सन्माननीय अपवाद निश्चितच आहेत. पण देबरॉय यांच्यामध्ये या दोन्हींचा सुरेख मिलाफ होता. पंतप्रधान मोदींचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणार्या देबरॉय यांचा ‘विकसित भारत’ या संकल्पनेला पुढे घेऊन जाण्यातही मोठा वाटा होता. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची बनेल आणि तिसर्या क्रमांकाची जागतिक आर्थिक सत्ता बनेल तेव्हा देबरॉय यांची उणीव निश्चित जाणवेल.