Ahilyadevi Holkar | द्रष्ट्या राज्यकर्त्या अहिल्याबाई 
बहार

Ahilyadevi Holkar | द्रष्ट्या राज्यकर्त्या अहिल्याबाई

पुढारी वृत्तसेवा

विशाखा जितकर

पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती 31 मे रोजी देशभर साजरी केली जात आहे. लोककल्याणासाठी समर्पित, तत्त्वज्ञानी राणी, दूरदर्शी प्रजाहितदक्ष, धर्मनिष्ठ, कुशल संघटक , धर्माभ्यासक, धर्मरक्षिका, कुशल योद्धा व रणरागिणी अशा गौरवशाली उपाधींनी सन्मानित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या इंदूर संस्थानच्या अत्यंत कुशल, दानशूर व न्यायप्रिय राज्यकर्त्या होत्या. मध्य भारतातील माळवा राज्याची राणी राजमाता अहिल्यादेवी या भारतातील सर्वात दूरदर्शी महिला शासकांपैकी एक मानल्या जातात. कर्तुत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून त्यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.

बीड जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी अहिल्यादेवी या कन्यारत्नाचा जन्म 31 मे 1725 रोजी धनगर समाजात झाला. तत्कालीन काळात स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नव्हते, तरीही त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच लिहिण्यास, वाचण्यास प्रोत्साहन दिले. लहानपणापासूनच त्या अत्यंत धाडसी आणि कर्तुत्ववान होत्या. आपल्या आईसोबत सीना नदीच्या काठी असणार्‍या एका देवालयात अहिल्या गेली असताना तिथे त्यांनी वाळूत खेळताना एक शिवलिंग बनवले. जवळच बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. तेथील घोडा उधळला आणि तो मंदिराच्या दिशेने येऊ लागला, हे पाहताच त्यांच्या मैत्रिणींनी तेथून पळ काढला; मात्र छोटी अहिल्या शिवलिंगावर पालथे पडली आणि शिवलिंगाचे रक्षण केले. मागून आलेल्या पेशव्यांनी त्यांना विचारले, ‘पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर?’ त्यावर अहिल्याने दिलेले बाणेदार उत्तर ऐकून पेशवे आश्चर्यचकित झाले. त्या म्हणाल्या, ‘हे शिवलिंग मी घडवले आहे. त्याचे प्राणपणाने रक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे.’ हे शब्द ऐकताक्षणीच पेशव्यांनी त्यांचे सरदार मल्हारराव होळकर यांना त्यांच्या मुलाशी म्हणजेच खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्येचा विवाह संपन्न व्हावा, हे अधिकारवाणीने सांगितले. अहिल्याबाईंनी मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरवला व होळकर घराण्याची कीर्ती संपूर्ण भारत खंडात पोहोचवली.

मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार सांभाळणे, न्यायनिवाडा करणे इत्यादीचे प्रशिक्षण दिले आणि त्यातून त्यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रगल्भता वाढण्यास मदत झाली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. इ.स. 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत खंडेराव यांना वीरमरण आले. अवघ्या 29 व्या वर्षी अहिल्यादेवींना वैधव्य आले. जुन्या रुढी, परंपरेनुसार सती जाण्याच्या त्यांच्या विचारांना सासरे मल्हारराव होळकर यांनी परावृत्त केले. त्यांनी सती जाण्याचा विचार नाकारून पुरोगामीत्वाची कास धरली आणि पुढील संपूर्ण आयुष्य प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्धार केला आणि रयतेला कल्याणकारी राज्य दिले. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर 29 वर्षे अत्यंत यशस्वीपणे धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वांची सांगड घालून एकसंध समृद्ध, सुसंवादी आणि शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न साकारला.

अहिल्यादेवी होळकरांनी जनतेला केंद्रस्थानी मानून आपला राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची व्याप्ती माळवा प्रदेशापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण भारतभर त्यांनी जी मंदिरे, घाट, धर्मशाळा, तलाव, पूल, रस्ते, वसाहती उभारले, त्या वास्तू आजही त्यांच्या दूरद़ृष्टीचे आणि जनसेवेच्या व्रताचे साक्षीदार आहेत.

23/5, 5:17 PM Vishakha : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापना व लोक कल्याणकारी कार्याचा वारसा अहिल्यादेवी होळकरांनी संवर्धित करून प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य केले. मुघल आक्रमणांनी उद्ध्वस्त केलेली काशी, विश्वनाथ, सोमनाथ, रामेश्वरम, केदारनाथ यासारख्या मंदिरांची पुनर्बांधणी केली. भारतभर विविध भागांतील धर्मस्थळांचे पुनरुत्थान करून अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदू धर्म रक्षणार्थ पावले उचलली. पानिपत युद्धावेळी पाण्यावाचून व्याकुळ झालेल्या सैनिकांसाठी ठिकठिकाणी विहिरी बांधल्या. युद्धजन्य व आपत्कालीन परिस्थितीत धर्मशाळांसारखी आश्रयस्थाने निर्माण केली. राजकीय प्रशासनाबरोबर सामाजिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्याची मुहूर्तमेढ रोवून हाती घेतलेले कार्य सिद्धीस नेले. अहिल्यादेवी यांनी मंदिरे व घाट हे फक्त पूजाअर्चा आणि यज्ञ, हवन या धार्मिक संस्कारांचे केंद्रस्थान नव्हते, तर जनसामान्यांची, श्रमजीवी वर्गाची व यात्रेकरूंप्रति सेवाभावाचे प्रतीक होते. मंदिराच्या सभोवताली असणार्‍या धर्मशाळा, अन्नछत्रे, कुंडे, विश्रांतीगृहे या सार्वजनिक सुविधा जनसामान्यांसाठी होत्या. त्यामुळे तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. विणकर, शिल्पकार, गवंडी, कामगार, कुंभार, कातकरी समाजाच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी आणि स्थैर्य देण्याचे अतुलनीय कार्य त्यांनी पार पाडले. धर्मसंवर्धनातून जनसेवा आणि राष्ट्र बांधणीच्या प्रेरणादायी रचनात्मक आदर्श कार्याची उभारणी त्यांच्या हातून झाली. म्हणून त्यांना दूरद़ृष्टी असलेल्या प्रशासक, समर्पित समाजसेविका, राष्ट्रभाव जोपासणार्‍या लोकमाता अशा उपाधी देण्यात आल्या आहेत.

अहिल्याबाई या समाजसुधारक, मानवतावादी द़ृष्टिकोनाच्या उपासक होत्या. त्यांनी धर्मातील रुढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीच स्वीकार केला नाही. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणार्‍या यशवंत फणसे या गुणी, शूर तरुणासोबत स्वतःच्या एकुलत्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातिभेदाला तडा दिला. पुरोगामी विचारांना कार्यकर्तृत्वाची जोड देऊन नवविचारांचा वारसा भारताला दिला. पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा लोभ सुटला आणि त्याने होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदूरवर चढाई केली. ही बातमी समजताच अहिल्यादेवींनी खचून न जाता रघुनाथरावांना खलिता पाठवला. त्यात त्या म्हणतात, ‘आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट करत आहात. दुःखात उडालेल्या अधिक बुडवावे, हा तुमचा दुष्ट हेतू आहे. आता आपली गाठ रणांगणात पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणार्‍या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईल; पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीत न पडाल तर बरे. मी अबला आहे, असे समजू नका. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले, तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही.’ अशा मुत्सद्दी अहिल्यादेवी म्हणजे तळपती समशेर आणि लखलखत्या विजेप्रमाणे अलौकिक बुद्धिमत्ता असणारे असामान्य व्यक्तिमत्त्व. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. कर पद्धती सौम्य केली; मात्र शेतकर्‍यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील, कुलकर्ण्यांच्या वतनांचे हक्क कायम ठेवून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर भागातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव करत असत व त्यांच्याकडून भिलकवडी नावाचा कर वसूल करत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला आणि विशिष्ट हद्दी नेमून देऊन त्यांच्याकडून पडीक जमिनीची लागवड करून घेतली. जमीन करार पट्ट्याने देण्याची पद्धत त्यावेळी त्यांनी सुरू केली.

अष्टावधानी राजमाता अहिल्यादेवींनी आपली राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलवली. तिथे अनेक वस्तूंचे बांधकाम करून घेतले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वर हे विणकारांचे मध्यवर्ती केंद्र होते. तिथल्या हातमागावरील वस्त्रोद्योगाला अवकळा आली होती. ही परिस्थिती ओळखून स्वदेशी चळवळीला प्रोत्साहन देत त्यांनी वस्त्रोद्योगास प्रोत्साहन दिले. राणी अहिल्याबाईंनी राजघराण्यातील महिलांना आणि खास पाहुण्यांना भेट देण्यासाठी एक विशेष वस्त्र तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सुरत-माळवा आणि महाराष्ट्रातून कुशल विणकर यांना महेश्वर येथे बोलावले. महेश्वर किल्ल्याच्या भिंती आणि नर्मदा नदीच्या लाटांवरून प्रेरणा घेऊन साड्यांचे नक्षीकाम तयार करून गर्भ रेशमी महेश्वरी साड्या बनवण्यास सुरुवात केली. खुद्द राजमाता अहिल्यादेवींनी स्वतः डिझाईन सांगून या विणकारांकडून पहिली नऊवार साडी बनवून घेतली. भारतीय इतिहासात प्रथमच एखाद्या राणीने आपल्या प्रशासकीय कामकाजातून स्वदेशी मालाला पुरस्कृत करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले.

धर्माभ्यासक अहिल्यादेवी यांचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मीळ होता. ज्ञानेश्वरी, निर्णयसिंधू, द्रोणपर्व, पद्मपुराण, वाल्मीकी रामायण, श्रावण मास माहात्म्य या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. त्यांच्या राज्यकारभारात विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जात असे. त्यांच्या धर्मपरायणतेला कोणतीही सीमा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. विधवा स्त्रियांना संपत्तीमध्ये कायद्याने हक्क दिले, दत्तक घेण्याचा अधिकार प्रदान केला, सती प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणवादी द़ृष्टिकोनातून जे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले ते म्हणजे वड, पिंपळ, चिंच, आंबा या वृक्षांची लागवड करून ती संवर्धित करण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी जनतेला मार्गदर्शन केले. यातून भूजल पातळी स्थिर राहते, असे सांगून पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक निर्णय घेतले. पिण्याच्या पाण्याचे व वापरण्याच्या पाण्याचे वेगळे पाट करून पाण्याच्या शुद्धतेची हमी जनतेला दिली. पशुपक्षी, गायीगुरे यांना अभय देऊन त्यांच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच सर्पदंशावर ताबडतोब उपचार करण्यासाठी वैद्य, हकीम यांच्या नेमणुका केल्या. महिलांच्या आंघोळीसाठी बंदिस्त व सुरक्षित ओवर्‍या बांधून घेतल्या. सढळ हाताने आपल्या गोरगरीब जनतेला दानधर्म करणार्‍या लोकमाता अहिल्यादेवी होळकर या जाज्वल्य राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या, लोकसेवेसाठी समर्पित अशा लोककल्याणकारी, पुण्यश्लोक, संत पदास पोहोचलेल्या महाराणी म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक व न्यायिक सुराज्य स्थापन करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार्‍या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT