व्होल्वोने आपली बहुप्रतिक्षित आणि नवीन इलेक्ट्रिक SUV EX30 लक्झरी कार अखेर भारतीय बाजारात दाखल केली आहे. ही कार म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि टिकाऊपणा यांचा अप्रतिम संगम आहे. या कारच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना पहिल्यांदाच स्कँडिनेव्हियन डिझाइन आणि प्रीमियम कॅबिनचा अनुभव मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीनी यंदा दसरा-दिवाळी सणाच्या हंगामात भारतीय ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे. ज्या ग्राहकांनी 19 ऑक्टोबर 2025 पूर्वी आपली SUV EX30 प्री-बुकिंग केली आहे, त्यांना ही कार 39.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध असेल. यानंतर, या कारची किंमत 41 लाख रुपयांपर्यंत वाढेल असे कंपनीने म्हटले आहे.
EX30 चे कॉम्पॅक्ट पण आकर्षक डिझाइन शहरी ड्रायव्हिंग आणि विकेंडच्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात व्होल्वोचे खास डिझाइन घटक जसे की, बंद ग्रिल, 'थॉर'स हॅमर' एलईडी डीआरएल, पिक्सेल-शैलीतील टेल लॅम्प्स आणि एरोडायनॅमिक अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे.
यात 318 लीटरची डिक्की आणि 7 लीटरचा अतिरिक्त 'फ्रंक' (समोरचा छोटा स्टोरेज स्पेस) आहे. ही एसयूव्ही पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकाला आपल्या आवडीनुसार रंग निवडता येतो. या डिझाइनमध्ये सौंदर्य, एरोडायनॅमिक्स आणि रोजच्या वापराची सोय यांचा मिलाफ साधलेला आहे, ज्यामुळे ही गाडी व्यावहारिक आणि दिसायलाही उत्कृष्ट वाटते, असे कंपनीने सांगितले आहे.
EX30 च्या कॅबिनच्या मध्यभागी 12.3 इंचाची व्हर्टिकल टचस्क्रीन आहे. ही गुगल इन्फोटेनमेंट, अँड्रॉइड ऑटो, वायरलेस ॲपल कारप्ले आणि 1040 वॅटच्या हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टीमने सुसज्ज आहे. सुरक्षिततेसाठी यात 7 एअरबॅग्स, एडीएएस (ADAS) ज्यात इंटरसेक्शन ब्रेकिंग, ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि 360-डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे. युरो एनकॅप (Euro NCAP) कडून 5-स्टार रेटिंग मिळाल्यामुळे EX30 ही कार आणि सुरक्षितता दोन्हीची खात्री देते. यामुळे ही एक आधुनिक, आरामदायक आणि तंत्रज्ञान-समृद्ध एसयूव्ही ठरते.
EX30 मध्ये 69 किलोवॅटची बॅटरी आणि रिअर-व्हील ड्राइव्ह सेटअप आहे, जे गाडीला 0-100 किमी/तास वेग 5.3 सेकंदात गाठण्यास मदत करते. याचा कमाल वेग 180 किमी/तास आहे. व्होल्वोच्या दाव्यानुसार, डब्ल्यूएलटीपी (WLTP) नुसार ही कार 480 किमीची रेंज देते, जी रोजच्या प्रवासासाठी आणि विकेंडच्या सहलींसाठी पुरेशी आहे.
या गाडीच्या खरेदीसोबत 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी, 3 वर्षांची मोफत सर्व्हिस, रोडसाइड असिस्टन्स आणि एक 11 किलोवॅटचा वॉल चार्जर मिळतो. या सुविधांमुळे ग्राहकाला देखभाल किंवा चार्जिंगच्या पायाभूत सुविधांची काळजी न करता लक्झरी ड्रायव्हिंगचा आनंद घेता येईल.
EX30 कारची तुलना भारतातील इतर लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांशी खालीलप्रमाणे करता येईल : किंमत (लाखांत, एक्स-शोरूम)
व्होल्वो EX30 : 39.99 (प्री-रिझर्व्ह)
ह्युंदाई आयोनिक 5 : 46.3
बीएमडब्ल्यू आयएक्स 1 : 49
बीवायडी सीलियन 7 : 48.9–54.9
कंट्रीमन इलेक्ट्रिक : 54.9
मर्सिडीज ईक्यूए : 67.2