Mahabharat
पांडव आणि कौरव यांच्यातील युद्ध पांडवांनी जिंकले पाहिजे, आणि हे युद्ध लवकर संपले पाहिजे, असे श्रीकृष्णाला वाटत होते.  
ज्योतिष आणि धार्मिक

श्रीकृष्णाने मोहिनीचे रूप का घेतले? पांडवांसाठी इरावण बळी का गेला?

पुढारी वृत्तसेवा

ही कथा महाभारताच्या युद्धातील ९ व्या दिवशीची आहे. पांडव आणि कौरव यांच्यातील युद्ध पांडवांनी जिंकले पाहिजे आणि हे युद्ध लवकर संपले पाहिजे, याची जाणीव श्रीकृष्णाला झालेली होती. म्हणून युद्धाच्या नवव्या दिवशी श्रीकृष्णाने पांडवांना चर्चेसाठी बोलवले. या चर्चेत युद्धाची देवता काली हिला कौल लावण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार काही ज्योतिषांचाही सल्ला घेण्यात आला. यातून एका धुरंदर योद्ध्याचा बळी कालीला द्यावा असे ठरले.

इरावण कोण होता? त्याचा अर्जुनाशी काय संबंध?

अंगावर ३२ दैवी गुण असलेल्या आदर्श योद्ध्याचा बळी द्यावा, असे या ज्योतिषांनी पांडवाला सुचवले.

३२ सुलक्षणी खुणा असलेले ३ योद्धे पांडवांच्या सैन्यात होते. पहिला म्हणजे अर्जुन, दुसरा स्वतः श्रीकृष्ण आणि तिसरा योद्धा म्हणजे इरावण. अर्जुन किंवा श्रीकृष्ण यांपैकी कोणचाही बळी देणे पांडवांना शक्य नव्हते. अशा प्रसंगी सर्वांच्या लक्ष वेधले गेले तर इरावणावर.

अर्जुनाने विचारले, "तू कोण आहेस." इरावण म्हणाला, "मी तुमचाच पुत्र आहे. माझी आई म्हणजे नागराजकुमारी उलुपी. अनेक वर्षांपूर्वी तिचा तुमच्याशी विवाह झाला होता."

इरावणाने या युद्धात जावे याला उलुपीचा विरोध होता, पण आईचा विरोध डावलून इरावण या युद्धात सहभागी झाला होता.

इरावणाची अखेरची इच्छा श्रीकृष्णाने कशी पूर्ण केली?

अर्जुनाने इरावणाला काली पुढे बळी जाण्यास सांगितले. इरावण पित्याची इच्छा डावलू शकत नव्हता. पण त्याने एक अट घातली. "मला ब्रह्मचारी म्हणून मरायचे नाही. उद्या माझा बळी गेल्यानंतर माझ्यामागे शोक करायला पत्नी मला हवी आहे." बळी जाणाऱ्या इरावणाची अखेरीची इच्छा पूर्ण करणे पांडवांवर बंधनकारक होते. पण उद्या बळी जाणाऱ्या पुरुषाची पत्नी व्हायला कोण स्त्री तयार होणार? इरावणासाठी पत्नीचा शोध घेण्यात पांडवांना अपयश आले.

अशा स्थितीत श्रीकृष्ण पांडवांच्या मदतीला आला. त्याने स्वतः मोहिनी या स्त्रीचे रूप धारण केले आणि इरावणाशी विवाह केला. इरावणाचा बळी दिल्यानंतर मोहिनीने हृदयद्रावक शोक केला. कुठल्याही विधवेने केला नसेल असा आकांत इरावणासाठी मोहिनीने केला होता.

(इरावणाच्या बळीची ही गोष्ट उत्तर तामिळनाडूतील मौखिक परंपरेत आहे.)

संदर्भ | जय - महाभारत, सचित्र रसास्वाद, लेखक - देवदत्त पट्टनायक, मराठी अनुवाद - अभय सदावर्ते, पॉप्युलर प्रकाशन

SCROLL FOR NEXT