When should the Diwali 'Abhyanga Snan' ritual bath be performed? Find out the auspicious timing
पुढारी ऑनलाईन : दिवाळीपूर्वी चतुर्दशी तिथीला म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अभ्यंगस्नान अत्यंत शुभ मानले जाते. २०२६ मध्ये अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि अभ्यंगस्नानाची योग्य पद्धत काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
दीपोत्सवाच्या पाच दिवसीय सणामध्ये अभ्यंगस्नानालाही विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला अभ्यंगस्नान केले जाते. याच दिवशी नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि रूप चौदस साजरी करण्याची परंपरा आहे. अभ्यंगस्नान आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. २०२६ मध्ये अभ्यंगस्नान कधी केले जाणार, स्नानाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कोणत्या पद्धतीने स्नान करावे, हे सविस्तर जाणून घेऊया.
अभ्यंगस्नान कधी केले जाणार?
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला सूर्योदयाच्या वेळी अभ्यंगस्नान केले जाते. २०२६ मध्ये चतुर्दशी तिथी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून ४७ मिनिटांनी सुरू होईल आणि ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांपर्यंत असेल. उदयतिथीनुसार चतुर्दशी ८ नोव्हेंबर रोजी असल्याने अभ्यंगस्नानही ८ नोव्हेंबर रोजीच केले जाईल. याच दिवशी दिवाळीचा सणही साजरा केला जाणार आहे.
अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त : सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत.
अभ्यंगस्नानाची विधी
अभ्यंगस्नानासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. स्नान करण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने मालिश करावी. तेलाने मालिश केल्यामुळे वातदोष दूर होतो आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो, असे मानले जाते.
तेल लावल्यानंतर बेसन, हळद, चंदन आणि पारंपरिक उटणे शरीराला लावू शकता. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यात आघाड्याची पाने किंवा तुळशीची पाने टाकून स्नान करावे. तुम्ही घरी स्नान करू शकता किंवा एखाद्या पवित्र नदीत स्नानही करू शकता. स्नान झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि हनुमानजींची पूजा करावी.
अभ्यंगस्नानाचे धार्मिक महत्त्व आणि फायदे
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर आपल्या शरीरावरील रक्त आणि मळ दूर करण्यासाठी नरक चतुर्दशीच्या दिवशी तेल आणि उटण्याने स्नान केले होते. तेव्हापासून नरक चतुर्दशीच्या सकाळी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते.
धार्मिक श्रद्धेनुसार, अभ्यंगस्नान केल्याने शरीर आणि मनाची शुद्धी होते. तसेच व्यक्तीला नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते. सौंदर्य आणि उत्तम आरोग्यासाठीही अभ्यंगस्नान केले जाते. यामुळे वातदोष दूर होतो आणि त्वचेलाही चमक येते, अशी आयुर्वेदिक मान्यता आहे.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकमान्यतांवर आधारित आहे. याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.