Tulsi Vivah 2025 
ज्योतिष आणि धार्मिक

Tulsi Vivah 2025: यंदा तुळशी विवाहाला सर्वार्थसिद्धी योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी अन् सोपी पूजा विधी

Tulsi Vivah Puja Vidhi: हिंदू संस्कृतीत 'या' दिवसापासून सर्व प्रकारच्या शुभ अन् मांगलिक कार्यांना पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे

पुढारी वृत्तसेवा

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असलेला तुळशी विवाह (Tulsi Vivah 2025) सण. दरवर्षी देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा हा प्रतीकात्मक विवाह सोहळा यावर्षी रविवारी दि.२ नोव्हेंबर २०२५ संपन्न होणार आहे. भगवान विष्णू आणि माता तुळशी (वृंदा) यांचा विवाह लावून, या दिवसापासून सर्व प्रकारच्या शुभ आणि मांगलिक कार्यांना पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.

कधी आहे तुळशी विवाह?

पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होत आहे. ही तिथी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २ वाजून ७ मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार, यावर्षी तुळशी विवाह २ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा केला जाईल.

तुळशी विवाहाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मानुसार, या दिवशी भगवान विष्णू चातुर्मास (चार महिन्यांची योगनिद्रा) संपवून जागे होतात आणि तुळशी देवीशी (वृंदा) विवाह करतात. याच कारणामुळे, तुळशी विवाहानंतर विवाह, गृहप्रवेश यांसारख्या सर्व शुभ आणि मांगलिक कार्यांचे मुहूर्त सुरू होतात. हा विवाह सोहळा वैवाहिक जीवनात आनंद, संतुलन आणि शांतता आणणारा मानला जातो.

विवाह सोहळ्यासाठी शुभ मुहूर्त

या दिवशी विवाह विधी पूर्ण करण्यासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत:

  • गोधूलि मुहूर्त: सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ६ वाजून ०१ मिनिटांपर्यंत

  • शुभ मुहूर्त (सायंकाळ): सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून प्रारंभ होईल.

  • ब्रह्म मुहूर्त: पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते ५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत

  • अभिजीत मुहूर्त: सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत

या दिवशी सायंकाळी ५ वाजून ०३ मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग देखील सुरू होत आहे, ज्यामुळे पूजेची विशेष फळप्राप्ती होणार आहे.

अशी आहे तुळशी विवाहाची सोपी विधी

  • तुळशी विवाह हा पारंपरिक विवाह सोहळ्याप्रमाणेच उत्साहात साजरा केला जातो. कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी यासाठी ही पूजा विधी-विधानाने करावी.

  • सर्वप्रथम घराची साफसफाई करून मुख्य दारावर आकर्षक रांगोळी काढावी. पूजा करणाऱ्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.

  • लाल रंगाच्या स्वच्छ कापडाने विवाह मंडप तयार करावा. फुलांनी, केळीच्या खांबांनी आणि आंब्याच्या पानांनी तो सजवावा.

  • मंडपात तुळशीच्या रोपाची आणि त्यांच्याजवळ भगवान शालिग्राम यांची स्थापना करावी. शालिग्रामजींना नवीन वस्त्र आणि तुळशी मातेला लाल चुनरी अर्पण करावी.

  • दोघांनाही फुलांचे हार घालून, पारंपरिक पद्धतीने सात फेरे पूर्ण करावेत.

  • फेरे झाल्यावर कुटुंबातील सदस्यांनी फुलांची वर्षा करावी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

  • शेवटी, तुळशी आणि शालिग्रामजींची आरती करून त्यांना मिठाई व फळांचा नैवेद्य अर्पण करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT