आज पितृ पक्षाची प्रतिपदा तिथी असून, पक्षपंधरवड्याला सुरुवात झाली आहे. पितरांच्या आशीर्वादासाठी श्राद्धाचा काळ सुरू झाला आहे. पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी असतो. या काळात अनेक प्रकारचे श्राद्ध केले जातात, त्यापैकीच एक महत्वाचा प्रकार म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध.
त्रिपिंडी म्हणजे तीन पिंडांचे दान. यात पाठीमागील तीन पिढ्यांतील मृत व्यक्तींच्या आत्म्यांना मोक्ष मिळावा म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान केलं जातं.
विशेषतः कमावयाच्या वयात मरण पावलेले, अचानक मृत्यू झालेल्या, अकाल मृत्यू, वृद्धापकाळात एकटेपणाने गेलेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी हे श्राद्ध केलं जातं.
या श्राद्धाचे वर्णन भविष्य पुराणात सापडते. त्यानुसार तामस, राजस आणि सात्विक अशा तीन प्रेतयोनींमधील अशांत आत्म्यांचे समाधान करण्यासाठी हे श्राद्ध महत्वाचे मानले गेले आहे.
अशा आत्म्यांमुळे वंशजांना त्रास होतो, अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पिढीजात दोष, व्याधी, मानसिक तणाव आणि अडथळे यांचा सामना करावा लागतो. त्रिपिंडी श्राद्ध केल्यास या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि घरात शांतता, समृद्धी येते.
पितृ पक्षात पंचमी, अष्टमी, एकादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथींमध्ये कोणत्याही दिवशी त्रिपिंडी श्राद्ध करता येते.
हे श्राद्ध त्र्यंबकेश्वर (नाशिक जिल्हा) येथे विशेषतः केलं जातं. हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश (रुद्र) यांची पूजा केली जाते. म्हणूनच येथे केलेले श्राद्ध अधिक फलदायी मानले जाते.
अविवाहित पुरुष
पती-पत्नी एकत्र
विधवा महिला
महिलांना वैयक्तिकरित्या त्रिपिंडी श्राद्ध करण्याची परवानगी नसते, परंतु त्या पती किंवा इतर पात्र पुरुषासोबत सहभागी होऊ शकतात.
हे श्राद्ध केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, घरातील दोष दूर होतात आणि पिढीचे कल्याण होते.