ज्योतिष गणनेनुसार, या ग्रहण काळात सूर्य कुंभ राशीत विराजमान असेल आणि राहूशी युती करेल, ज्यामुळे 'ग्रहण योग' निर्माण होत आहे.
Surya Grahan 2026
नवी दिल्ली : खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे वर्षातील पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. २०२६ सालातील हे पहिले ग्रहण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहे. हे ग्रहण 'वलयाकार' स्वरूपाचे असेल, ज्याला वैज्ञानिक भाषेत 'रिंग ऑफ फायर' असेही म्हटले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या साधारण १२ तास आधी सूतक काळ सुरू होतो. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि धार्मिक कार्यांवर मर्यादा येतात. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे, भारतात सूतक काळ मान्य नसेल. त्यामुळे दैनंदिन धार्मिक विधी आणि शुभ कार्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
ज्योतिष गणनेनुसार, या ग्रहण काळात सूर्य कुंभ राशीत विराजमान असेल आणि राहूशी युती करेल, ज्यामुळे 'ग्रहण योग' निर्माण होत आहे.
खगोलप्रेमींसाठी महत्त्वाची बाब म्हणजे, वर्षाचे हे पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचे काही भाग, अटलांटिक महासागर, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, झांबिया, मोझांबिक, मॉरिशस, अंटार्कटिका आणि टांझानिया यांसारख्या देशांमध्ये दृश्यमान असेल.
सूर्यग्रहणानंतर अवघ्या काही दिवसांतच वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील होणार आहे. ३ मार्च २०२६ रोजी हे चंद्रग्रहण लागेल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ०६:२२ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. विशेष म्हणजे, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून याचा कालावधी सुमारे १ तास ३१ मिनिटे इतका असेल.