Premanand Maharaj
वृंदावन: अनेकांना सकाळी लवकर उठणे कठीण जाते. इच्छा असूनही आळसामुळे किंवा जाग न आल्यामुळे बहुतांश लोकांची सकाळ थेट ८ वाजता उजाडते. मात्र, जीवनात यश मिळवायचे असेल आणि शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर सकाळी 'ब्रह्ममुहूर्ता'वर उठण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असा मोलाचा सल्ला प्रेमानंद महाराज यांनी दिला आहे. एका भक्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराजांनी सकाळी लवकर उठण्याचा आणि मोबाईलचे व्यसन सोडवण्याचा अत्यंत सोपा मार्ग सांगितला.
वृंदावन येथील सत्संगादरम्यान एका भक्ताने प्रेमानंद महाराजांसमोर आपली अडचण मांडली. "मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे, पण माझ्याकडून सकाळी लवकर उठले जात नाही आणि मोबाईलचे व्यसनही सुटत नाही. मी घेतलेले छोटे छोटे संकल्पही मला पूर्ण करता येत नाहीत, मी काय करू?" असा प्रश्न त्याने विचारला.
यावर महाराज म्हणाले, "तू अजून खूप लहान आहेस. संकल्प पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे संपूर्ण आयुष्य बाकी आहे. योग्य मार्ग न मिळाल्यामुळे सध्या तुझे मन विचलित होत आहे. तुझी जिद्द थोडी कमी पडतेय. सकारात्मक विचार ठेवल्यास तू तुझे संपूर्ण जीवन प्रगत करू शकतोस आणि तुला हवे ते बनू शकतोस."
आपली दिनचर्या सांगताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, "मी सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे, ज्यामध्ये शरीर जड होते आणि रात्री ११-१२ वाजेपर्यंत झोप येत नाही. त्यातच माझी दिनचर्या रात्री २ वाजल्यापासून सुरू होते, म्हणजेच मला दीड वाजताच जागे व्हावे लागते. जर मी रात्री उशिरा झोपलो, तर मला वेळेवर उठताना अडचण येईल, म्हणूनच मी अनेकदा संपूर्ण रात्र जागाच राहतो."
ते पुढे म्हणाले, "माझी ही २ वाजता उठण्याची दिनचर्या आजची नाही, तर गेली २० वर्षे मी पाळत आहे. पूर्वी जेव्हा सत्संगाचे काम नसायचे, तेव्हा मी पहाटे स्नान करून २ वाजता वृंदावनची परिक्रमा करायचो आणि सूर्योदयाच्या वेळी मंगला आरती करून गुरुदेवांच्या सेवेत रुजू व्हायचो."
सकाळी लवकर उठण्यासाठी महाराजांनी उपाय सांगितले आहेत. आजकालच्या काळात मोबाईल किंवा घड्याळात अलार्म लावण्याची सोय आहे. सुरुवातीला अलार्मच्या मदतीने उठायला हवे. एकदा शरीराला सवय झाली की, अलार्मशिवायही अगदी योग्य वेळेवर डोळे उघडतात.
"रात्री झोपताना देवाचे स्मरण करून झोपा आणि मनात ठाम संकल्प करा की मला पहाटे ४ वाजता उठायचेच आहे. जर तुमचा संकल्प खरा असेल, तर तुमच्यातील ईश्वर तुम्हाला नक्की जागे करेल. केवळ एक वर्ष सलग हा सराव केल्यास तुमची सवय बदलेल आणि त्यानंतर ४ नंतर तुम्हाला झोपच येणार नाही," असे महाराजांनी सांगितले.
महाराज म्हणाले की, "चुकीच्या सवयींमुळे दुःख मिळते, तर योग्य सवयींमुळे लाभ होतो. एकदा का वाईट सवय जडली की, ती सोडवणे कठीण जाते. लहान मुलाला सहा तासांच्या झोपेची गरज असते. आध्यात्मिक साधकासाठी चार ते पाच तास पुरेसे असतात; तर समर्पित साधकासाठी तीन तासदेखील पुरेसे ठरतात."