Kharmas 2026
ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याच्या मध्यावर ग्रहांच्या स्थितीत महत्त्वाचा बदल होत आहे. सूर्य आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश करणार असून, यामुळे 'खरमास' सुरू होत आहे. हिंदू पंचांगानुसार हा काळ मंगल कार्यांसाठी शुभ मानला जात नसल्याने, पुढील एक महिना विवाह, गृहप्रवेश आणि इतर महत्त्वाची शुभ कार्ये थांबणार आहेत.
सूर्य आज (दि. १४) मध्यरात्री मीन राशीत प्रवेश करेल. सूर्याने मीन राशीत प्रवेश करताच, साधारणपणे एक महिना 'खरमास' हा कालावधी सुरू होईल. ज्योतिषशास्त्रातील नियमांनुसार, जेव्हा सूर्य, 'देवगुरू' बृहस्पतीचे (गुरूचे) स्वामित्व असलेल्या 'धनु' किंवा 'मीन' या राशींमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्या कालावधीला 'खरमास' म्हटले जाते. या काळात विवाहसारखे शुभ कार्ये पार पाडली जात नाहीत.
या वर्षातील खरमासचा हा दुसरा टप्पा १४ मार्चच्या मध्यरात्री १ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल. यासोबतच, विवाह आणि इतर शुभ कार्यांवर तात्पुरते बंद राहतील. हा कालावधी साधारणपणे एक महिना चालेल. त्यानंतर, विवाहासाठीचे शुभ मुहूर्त २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होतील आणि ७ जुलैपर्यंत कायम राहतील.
धार्मिक मान्यतेनुसार, खरमास काळात सूर्याची गती मंदावते. जेव्हा सूर्य गुरूच्या राशीत (धनु किंवा मीन) असतो, तेव्हा त्याची ऊर्जा स्थिर मानली जाते. कोणत्याही शुभ कार्यासाठी सूर्याची स्थिती प्रबळ असणे आवश्यक असते. त्यामुळेच या काळात विवाह सोहळे, गृहप्रवेश, मुंज, जावळ, नामकरण विधी (बारसे) यांसारखे संस्कार किंवा विधी केले जात नाहीत. ग्रहस्थितीची जुळणी हेच मुख्य कारण मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, या कालावधीत ग्रहांचा शुभ दृष्टी कमी प्रभावी मानली जातो. असा समज आहे की, ग्रहांची ऊर्जा क्षीण झाल्यामुळे नवीन उपक्रम किंवा कार्यांतून अपेक्षित व अनुकूल परिणाम प्राप्त होत नाहीत. याच कारणामुळे, खरमास कालावधीत सर्व शुभ समारंभ आणि विधी पुढे ढकलावेत, अशी परंपरा आहे.