Ganpati Puja Vidhi Explained Gaurav Deshpande
मुंबई : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. यंदा बुधवारी २७ ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या दिवशी घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भक्तिभावाने आणि शुद्ध पद्धतीने पूजाविधी केल्यास गणराय प्रसन्न होतात असा विश्वास आहे. मात्र गणेशाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. मूर्ती कशी असावी, प्रतिष्ठापना कधी करावी, पुजा कशी करायची, नैवेद्य, फुले कोणती अर्पण करावी, उपासना कशी करावी आणि निरोप देताना काय करायच, या सर्व प्रश्नांची उत्तरे धर्मशास्त्राचे अभ्यासक पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिली आहेत. (Ganesh Puja)
'मोरया' भक्ताचे नाव गणपतीसोबत कसे जोडले?
गणपतीच्या उपासकांमध्ये 'मोरया गोसावी' हे अत्यंत महान भक्त होऊन गेलेत. त्यांना गणपतीचा अवतारच त्या काळात म्हटले जायचे. मोरया गोसावी यांच मुळ आडनाव शाळीग्राम असं होतं. मोर जसा आपल्याकडे नाचत नाचत येतो, तसा गणपती मंगलमय वातावरण आपल्याकडे घेऊन येतो, यावरूनच मोरया असं भक्ताच संबोधन प्राप्त झालं आहे, असे धर्मशास्त्राचे अभ्यासक पंचांगकर्ते गौरव देशपांडे सांगतात.
गणपतीला लंबोदर का म्हणतात?
पुराणामध्ये म्हटले आहे की, गणपतीने आपल्या उदरामधून अनंत ब्रम्हांडाची निर्मिती केली आहे. त्याचे द्योतक म्हणजे लंबोदर आहे. संत एकनाथ महाराज यांनीही एकनाथी भागवतामध्ये 'तुज माझी वासू चरा चरा, म्हणूनी पूजीजे लंबोदरा,' असे वर्णन केले आहे. या सृष्टीची उत्पती गणरायाच्या उदरातून झाली, म्हणून तो लंबोदर असे सांकेतिक शब्द आहेत.
भाद्रपदातील गणेश चतुर्थीला एवढे महत्व का?
चैत्र महिन्यापासून फाल्गून पर्यंत शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षात संकष्टी चतुर्थी ही गणपतीची व्रते आहेत. पण भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला महत्व आहे. कारण भाद्रपद हा भद्र कृत्यांचा महिना आहे. भद्र म्हणजे मंगलदायक कृत्यांचा महिना म्हणजेच भाद्रपद. आपला देश कृषीप्रधान आहे आणि या महिन्यात वर्षाऋतू असतो. शेतात पिके असतात, यावर कोणतेही विघ्न येऊ नये, गणेशाच्या कृपेने पाऊस चांगला पडावा, हे एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे, उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन संज्ञा आहेत. १६ जुलैच्या आसपास सूर्य जेव्हा कर्क राशीत जातो, त्यानंतर पुढचे सहा महिने मकर राशीत म्हणजेच १४ जानेवारीपर्यंत सुर्याचं दक्षिणायन असतं. धर्मशास्त्रात दक्षिणायनमध्ये दैत्यांचा दिवस आणि देवांची रात्र असते, असे सांगितलं आहे. तर उत्तरायणामध्ये देवांचा दिवस आणि दैत्यांची रात्र असे सहा-सहा महिन्यांचं चक्र सांगितलं आहे. दक्षिणायनमध्ये दैत्य, आसुरी शक्ती प्रबळ असतात. त्यामुळे देवतांची जी युद्ध झाली ती दक्षिणायनमध्येच झाली. म्हणून या काळात सणवार जास्त असतात. शुद्ध राहून सात्विकतेची जोपासना केली जाते. त्यातच भाद्रपद महिन्यात गणपतीची उपासना केली जाते. देवांच्या तिथी असतात आणि वार हे ग्रहांचे असतात. यामध्ये चतुर्थी तिथीचे स्वामी गणेश असल्याने गणतीची पूजा चतुर्थीला केली जाते.
शास्त्रानुसार गणपतीची मुर्ती कशी असावी?
गणपतीच्या मुर्तीकडे बघताच क्षणी आनंद वाटला पाहिजे, अशी मुर्ती असावी. शास्त्रानुसार, अंगठ्याच्या पेराएवढ्या उंचीपासून ते एक इथीपर्यंत उंचीच्या मुर्तीचे पुजन घरी करावे. त्यापेक्षा जास्त उंचीच्या मुर्तीचे पूजन घरामध्ये करू नये. गणेशोत्सवात आपण ज्या गणेश मुर्तींचे पूजन करतो ते म्हणजे पार्थिवसिद्धी विनायकाची पूजा असते. पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वापासून बनलेली. मुर्ती ही शाडू मातीची आणि पद्मासनामध्ये बसलेली असावी. रक्तवर्णाची मृर्ती असेल तर चांगलं असतं. उजव्या सोंडेचा गणपती हा सिद्धीविनायक असतो. त्याचे पूजन, उपासना शास्त्रात नियम कडक आहेत. त्यामुळे परंपरेनुसार डाव्या सोंडेचा गणपती असावा.
गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा कधी करावी?
चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा सुर्योदयापूसन ते मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजेच दुपारी १ ते २ वाजेपर्यंत करू शकता.
मोबाईलवर किंवा स्पीकरवर पूजा करणे योग्य आहे का?
प्राणप्रतिष्ठा करताना वैदिक पुरोहिताला घरी बोलावून विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी. मोबाईल, सीडी रेकॉर्डर लावल्याने फक्त आवाज येत असतो, पण मंत्रांची शक्ती असते ती उच्चाराच्या श्वासातून प्रकट होत असते.
पूजा कशी करावी?
गणपतीची पूजा गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य, अशा पाच उपचार अर्पण करून भक्तिभावाने करावी.
गणपतीसाठी गंध कोणता वापरावा?
देवतेला अष्टगंध अतिशय प्रिय आहे. प्रत्येक देवतेचा अष्टगंध वेगळा असतो. गणपतीला देखील केशर, गोरचन, रक्तचंदन असे आठ द्रव्य एकत्र असलेला अष्टगंध लावावा. जर अष्टगंध नसेल तर चंदन उगळून लावावे. देवाला गंध लावताना अनामिकेने लावावा. स्वत:ला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना पहिल्या बोटाने लावावा.
धूप कसा दाखवावा?
धूप हा अनेक द्रव्यांचा एकत्र करून बनवला जातो. शुद्ध गुग्गलाचा धूप घ्यावा. देवाला धूप दाखवताना देवाच्या समोरून किंवा देवाच्या डावीकडे उभे राहून धूप दाखवावा. उजवीकडून धूप दाखवू नये.
गणपतीला फुले आणि दुर्वा कशी वाहावी?
गणपतीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. फुलांमध्ये रक्तवर्णाची (उदा. जास्वंद) म्हणजेच लाल रंगाची आणि महत्वाचे म्हणजे सुगंधीत फुले वाहावीत. आयुर्वेदात सांगिल्याप्रमाणे दुर्वा अमृतापासून तयार झाली आहे. दुर्वा वाहताना ती तीन पत्रांची, पाच पत्रांची किंवा सात पत्रांची असावी. तसेच लाल रंगाचे वस्त्र गणपतीला घालावे.
गणपतीला आवडणारा नैवेद्य कोणता?
नैवेद्य हा पाच पदार्थांचा असावा. गुरूचरित्र ग्रंथानुसार, तीळाचे लाडू, ऊस, खोबरे, पंचखाद्य, डाळींब, साखर, लाह्या, भिजवलेले चणे अशाप्रकारचे पदार्थ आवडतात, असे गणपतीने स्वत: विष्णूंना सांगितलं आहे. जर कोणताच पदार्थ नसेल तर फळांचा नैवेद्य दाखवावा.
तिर्थ किंवा पंचामृत प्राशनाची योग्य पद्धत कोणती?
अकाल मृत्यू हारण करणारं आणि सर्व व्याधी दूर करणार भगवंताच तीर्थ अतिशय श्रद्धेने प्राशन करावे. तीर्थ घेतल्यानंतर हात हळूवार फक्त मस्तकाला स्पर्श करावा.
गणपतीला नवस करावा का?
गणपतीला प्रार्थना करावी, शक्यतो नवस करू नये. प्रतिष्ठापणा केल्यानंतर मृर्तीला सतत स्पर्श करू नये. यामुळे मृर्तीतील दैवत्व असतं ते हळूहळू कमी होतं.
गणरायाचे विसर्जन कसे करावे?
अनंत चतुर्दशी दिवशी कधीही विसर्जन करू शकता. विसर्जन शुद्ध पाण्यात किंवा वाहत्या पाण्यात करावे.
गणपतीची उपासना कशी करावी?
कलयुगात गणपतीची आणि दुर्गेची पुजा सिद्धीस जातात. गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपतीच्या उपासनेने सद्बुद्धी प्राप्त होते. विशेषत: विद्यार्थ्यांनी गणेशाची उपासना करावी.