मकर File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Annual Horoscope 2025 | मकर | संपन्नता लाभेल

Annual Horoscope 2025 | कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिक बाबतीत विशेष जागरूक हे आपले वैशिष्ट्य आहे.

पुढारी वृत्तसेवा

कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिक बाबतीत विशेष जागरूक हे आपले वैशिष्ट्य आहे. शनीकडे संयम आहे, शिस्त आहे, सहनशीलता आहे. विवेक आहे, विचार आहे. व्यवहारचातुर्य आहे. समाजापासून दूर राहण्याची आपली प्रवृत्ती आहे. एकांतवासाकडे आपला अधिक कल आहे. आत्मसंयमन ही आपली शक्ती आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारे आत्मसंयमन व स्वयंशासन हे आपल्याकडे विशेषत्वाने असते. प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणे, विचारपूर्वक टाकणे, प्रत्येक विषयाचा साधकबाधक विचार करणे हे आपले वैशिष्ट्य असते.

आरोग्य

मकर राशीची साडेसाती दि. 29/03/2025 रोजी संपत आहे. तेव्हा पहिले तीन महिनेच आता साडेसाती उरलेली आहे. मात्र, या शनी भ्रमणाचा फारसा प्रतिकूल परिणाम होणार नाही. कारण शनी हा मकर राशीच्या व्यक्तींचा पहिल्या व दुसर्‍या स्थानाचा स्वामी आहे. तो कुंभ राशीत स्वगृहीचा आहे.

पहिले पाच महिने राहू तिसर्‍या पराक्रम या स्थानात असणार आहे व संपूर्ण वर्षभर गुरूची स्थिती आर्थिक लाभाला चांगली आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने हे वर्ष चांगले आहे. दि. 15/05/2025 ते दि. 18/10/2025 या कालखंडात प्रकृती सामान्य राहील. उर्वरित संपूर्ण कालखंडात आरोग्य चांगले असणार आहे. साडेसातीच्या अडचणी, मनस्ताप, आर्थिक, कौटुंबिक अडचणी, मानसिक त्रास हे आता इतिहास जमा झाले आहे.

आरोग्याच्या द़ृष्टीने चांगले कालखंड

दि. 28/01/2025 दि. 25/07/2025

दि. 21/08/2025 दि. 06/12/2025

व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती

गुरू व शनी या ग्रहांची अनुकूलता मकर राशीला यशदायक, लाभदायक व फायदेशीर ठरणार आहे. यावर्षी बाजारपेठेचा अभ्यास करून शेअर्समध्ये व व्यवसायात व विशेषत: प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयास हरकत नाही. हे वर्ष जागा, जमिनी, विकासक, प्रॉपर्टी, वाहने, बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉन्ट्रॅक्टर्स, कला, संगीत, नाट्य, अभिनय, प्रसारमाध्यमे, ट्रान्स्पोर्ट, टूरिस्ट, रेस्टॉरंट, हॉटेल, फूडप्रॉडक्टस्, ज्वेलर्स, कापड, साडी सेंटर या सर्वांना अभूतपूर्व यशाचे ठरणार आहे.

आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड

दि. 01/02/2025 दि. 25/07/2025

दि. 21/08/2025 दि. 14/09/2025

दि. 27/10/2025 दि. 20/12/2025

नोकरी

नोकरीतील मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष प्रगतीचे आहे, यशाचे आहे, पगारवाढीचे आहे, बढतीचे आहे. गेल्या काही वर्षांत झालेली कुचंबणा, झालेली कुतरओढ व आपल्या कर्तबगारीला, कर्तृत्वाला योग्य तो न्याय न मिळणे, मानसिक त्रास या गोष्टी संपणार आहेत. या वर्षात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुम्हाला बढती लाभेल. या वर्षात तुम्ही पूर्ण कार्यक्षमतेने काम कराल. तुमचा अनुभव, तुमची काम करण्याची पद्धत, तुमची गुणवत्ता याचे चीज होणार आहे. वरिष्ठांबरोबरचे संबंध चांगले राहतील. ज्यांना बदली हवी आहे त्याप्रमाणे आपणाला बदली मिळेल.

नोकरीत अधिक चांगला कालखंड

दि. 01/02/2025 दि. 25/07/2025

दि. 21/08/2025 दि. 14/09/2025

दि. 02/11/2025 दि. 26/12/2025

प्रॉपर्टी

प्रॉपर्टी, जागा, जमिनी, वाहन खरेदी, गुंतवणूक या संदर्भात मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अनुकूल आहे. वर्षभर आर्थिक लाभ चांगले असणार आहेत. त्यामुळे ज्यांचे फ्लॅट, जागा, जमिनी, बंगला, वाहन खरेदी करण्याचे जे स्वप्न आहे ते या वर्षी फलद्रूप होणार आहे. अनेकांचे प्रॉपर्टीचे स्वप्न साकार होणार आहे.

संततिसौख्य

स्थूलमानाने संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, शैक्षणिक क्षेत्रातील प्रवेश व परीक्षेतील यश या द़ृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष मोठ्या प्रमाणावर यशदायक व लाभदायक आहे. मुलामुलींचे शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्न, नोकरी, व्यवसायातील प्रश्न मार्गी लागतील. या वर्षात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही उत्तम असणार आहे. अनेक एमपीएससी, यूपीएससी, मेडिकल, सीए इ. परीक्षांमध्ये मकर राशीच्या व्यक्तींना अपेक्षित यश मिळाले नसेल; परंतु या वर्षी अनेकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील परीक्षेत सुयश लाभणार आहे.

संततिसौख्यासाठी चांगला कालखंड

दि. 28/01/2025 दि. 25/07/2025

दि. 20/08/2025 दि. 14/09/2025

दि. 09/10/2025 दि. 19/12/2025

वैवाहिक सौख्य

वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. गेली काही वर्षे मकर राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने ग्रहमान अनुकूल नव्हते. आता वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने कालखंड अनुकूल आहे. विवाहेच्छुंचे विवाह होण्याच्या द़ृष्टीने संपूर्ण वर्ष अनुकूल आहे. त्यातही खालील कालखंड विवाहेच्छुंचे विवाह होण्याच्या द़ृष्टीने विशेष अनुकूल आहेत.

दि. 01/01/2025 दि. 14/05/2025

दि. 19/10/2025 दि. 04/12/2025

वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल कालखंड

दि. 28/01/2025 दि. 22/07/2025

दि. 22/08/2025 दि. 13/09/2025

दि. 15/10/2025 दि. 06/12/2025

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या द़ृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे. यावर्षी काहींना अनपेक्षितपणे तीर्थयात्रेचे व परदेश प्रवासाचे योग येतील. वर्षातील बराचसा कालखंड हा प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास यासाठी अनुकूल आहे.

प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड

दि. 28/01/2025 दि. 05/06/2025

दि. 21/08/2025 दि. 14/09/2025

दि. 02/11/2025 दि. 06/12/2025

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या द़ृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष अनुकूल आहे. गेली काही वर्षे आपणापैकी अनेकांना यशाने हुलकावणी दाखवली असेल; परंतु या वर्षी लेखन, प्रकाशन, साहित्य, कला, संगीत, नाट्य, अभिनय, प्रसारमाध्यमे, कायदा, चित्रकारिता, फोटोग्राफी या सर्व क्षेत्रांमध्ये मकर राशीच्या व्यक्तींना आपले नैपुण्य कलेच्या क्षेत्रातील आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुमची स्वप्ने साकार होणार आहेत. मनोरथ पूर्ण होणार आहेत.

सुसंधी, प्र्रसिद्धीसाठी अनुकूल कालखंड

दि. 28/01/2025 दि. 29/08/2025

दि. 16/09/2025 दि. 19/12/2025

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

प्रतिष्ठा, मानसन्मान, नावलौकिक, कीर्ती, अधिकार या द़ृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष अनुकूल आहे, यशदायक आहे व लाभदायक आहे. गेली अनेक वर्षे मकर राशीच्या व्यक्तींची कुचंबणा झाली असेल. मकर राशीच्या व्यक्तींकडे एक शिस्त असते, आत्मसंयमन असते. अर्थात, परिश्रम करण्याची तयारी असते, चिकाटी असते. या सर्वांचा एकत्रित फायदा यावर्षी मिळणार आहे.

मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड

दि. 01/01/2025 दि. 26/07/2025

दि. 21/08/2025 दि. 27/10/2025

दि. 03/11/2025 दि. 19/12/2025

सारांश :

मकर राशीच्या व्यक्तींना हे वर्ष आरोग्याच्या द़ृष्टीने चांगले आहे. दि. 29/03/2025 रोजी शनीची साडेसाती संपत आहे. त्यामुळे अनेकांची गेली सात वर्षे कुचंबणा झाली असेल. कामे न झाल्यामुळे निराशा झाली असेल. व्यवसायात तोटा आला असेल. विवाहाचे, प्रॉपर्टीचे प्रश्न अडकले असतील. विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशाने हुलकावणी दिली असेल; परंतु मकर राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष अनेक द़ृष्टीने चांगले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT