Adhik Maas 2026  Pinterest
ज्योतिष आणि धार्मिक

Adhik Maas 2026 dates: अधिक मास कधी आहे? पंचांगात एक महिना का वाढतो आणि काय आहे याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर

यंदा 'ज्येष्ठ' महिना दोनदा येणार असून, या वाढीव महिन्यालाच आपण 'अधिक मास' किंवा 'पुरुषोत्तम मास' म्हणून ओळखतो.

पुढारी वृत्तसेवा

Adhik Maas 2026 dates

मुंबई: हिंदू पंचांगानुसार २०२६ हे वर्ष (विक्रम संवत २०८३) अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या वर्षात नेहमीप्रमाणे १२ महिने नसून एकूण १३ महिने आहेत. यंदा 'ज्येष्ठ' महिना दोनदा येणार असून, या वाढीव महिन्यालाच आपण 'अधिक मास' किंवा 'पुरुषोत्तम मास' म्हणून ओळखतो. या अतिरिक्त महिन्यामुळे २०२६ मधील सण-उत्सवांच्या तारखांमध्येही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

कधी आहे अधिक मास?

हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिना अधिक मास म्हणून गणला जाईल. याची सुरुवात १७ मे पासून होईल आणि सांगता १५ जून रोजी होईल. यामुळे त्यानंतर येणारे मुख्य सण साधारण १५ ते २० दिवस पुढे ढकलले गेले आहेत. उदाहरणार्थ, रक्षाबंधन २८ ऑगस्टला, तर दीपावली ८ नोव्हेंबरला साजरी केली जाईल.

का येतो अधिक मास?

अधिक मास येण्यामागे खगोलशास्त्रीय आणि गणिती कारण आहे. सूर्य वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौर वर्ष साधारण ३६५ दिवसांचे असते तर चंद्र वर्ष सुमारे ३५४ दिवसांचे असते. या दोन वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जाऊन तीन वर्षांत साधारण ३२ ते ३३ दिवसांचा होतो. हा काळ संतुलित करण्यासाठी दर तीन वर्षांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला 'अधिक मास' म्हणतात.

काय करावे आणि काय टाळावे?

शुभ फलप्राप्तीसाठी हे करा

अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हणतात. भगवान विष्णूची उपासना आणि मंत्रजाप करणे आणि दानधर्माला या महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे; विशेषतः गरजूंना अन्नदान करणे पुण्यदायी मानले जाते. श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन किंवा श्रवण करणे लाभदायक ठरते.

ही कामे टाळावीत

शास्त्रानुसार, अधिक मासात 'काम्य' कर्मे म्हणजेच वैयक्तिक सुखासाठी केली जाणारी मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. विवाह, मुंज, गृहप्रवेश आणि नामकरण यांसारखे मोठे सोहळे या काळात करू नयेत. नवीन व्यवसाय किंवा मोठ्या गुंतवणुकीची सुरुवात करणे टाळावे. तामसी आहार (मांसाहार, मद्यपान) टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करावे. अशी मान्यता आहे की, अधिक मासात केलेली भक्ती आणि साधना इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फळ देते. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT