अर्थभान

विमा लोकपाल : विमाधारकांच्या तक्रारींसाठी!

Arun Patil

विमा कंपन्यांशी निगडित तक्रार करण्यासाठी ग्राहकांना विमा लोकपाल चा पर्याय उपलब्ध आहे. अर्थात, ग्राहकांनी सुरुवातीला आपली तक्रार विमा कंपनीकडे करायला हवी. विमा कंपनीचे तक्रार निवारण अधिकारी हे तक्रारी दाखल करून घेणे आणि त्यावर समाधान शोधण्याचे काम करत असतात.

याखेरीज ग्राहक तक्रार अधिकारी (जीआरओ)ला मेल पाठवूनही तक्रार नोंदवता येते. विमाधारकांना तक्रार करण्यासाठी इर्डाचे ऑनलाईन पोर्टल (आयजीएमएस)चा देखील उपयोग करता येऊ शकतो. नियमानुसार विमा कंपनीला दोन आठवड्याच्या आत ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान करणे बंधनकारक आहे.

पंधरा दिवसानंतरही समस्या सुटत नसेल आणि आपण त्यांच्या निष्कर्षावर समाधानी नसाल, तर त्यावर आपण पुन्हा इर्डाकडे तक्रार करू शकतो. विमा कंपनीच्या तोडग्यावर आणि इर्डाच्या सल्ल्यावरही आपण समाधानी नसाल तर विमा लोकपालहा एक चांगला मार्ग ठरू शकतो आणि त्याकडे तक्रार करता येऊ शकते.

सध्याच्या काळात देशात वेगवेगळ्या ठिकाणी 17 विमा लोकपाल आहेत. ग्राहक स्वत: किंवा कायदेशीर वारसदारांना किंवा नॉमिनी केलेल्या व्यक्‍तीच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील विमा लोकपालला लिखित रूपात तक्रार करू शकता. म्हणजेच ग्राहक ज्या ठिकाणी राहत आहे, त्या परिसरातील विमा लोकपालकडे तक्रार नोंदवता येते. यासंदर्भातील प्रक्रिया जाणून घेऊया.

1) आपल्या क्षेत्रातील विमा लोकपाल कार्यालयाशी संपर्क करू शकता.

2) विमा लोकपालाकडे पत्र किंवा मेल पाठवून तक्रार नोंदवता येते. तक्रार ई-मेलच्या माध्यमातून करत असाल तर त्याची एक हार्ड कॉपीदेखील लोकपाल कार्यालयास पाठवावी लागेल.

3) आपल्या पत्रात पॉलिसी क्रमांक, तक्रारीचे विवरण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संबंधित कागदपत्रे तक्रारीला जोडावी लागतील आणि ती कार्यालयास पाठवावी लागतील.

4) आपण लोकपाल कार्यालयात जात असाल, तर फॉर्म पी-दोन आणि फॉर्म पी-तीन भरावा लागेल. आपण कागदपत्रे पोस्टाने पाठवत असाल तर विमा लोकपाल हे फॉर्म भरण्यास सांगतील.

5) तक्रार, कागदपत्रे जमा झाल्यानंतर विमा लोकपाल सुनावणीसाठी एक तारीख निश्‍चित करतात. त्या तारखेला उपस्थित राहून आपल्या तक्रारीचे निवारण करून घ्यावे.

जीवन विमा, गृह विमा, आरोग्य विमा यांची गरज कितीही असली आणि कंपन्यांकडून कितीही चांगली आश्‍वासने दिली जात असली तरी अनेकदा ग्राहकांना प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळवताना झगडावे लागते. काही वेळा सर्व नियमांचे पालन करूनही विमा कंपन्यांकडून क्लेम नाकारला जातो. अशा वेळी काय करायचे, असा प्रश्‍न पडतो.

अवंती कारखानीस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT