संसदेचे अधिवेशन गेल्या आठवड्यापासून सुरू झाले. अधिवेशनात शेतकर्यांना जाचक असणारे तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले. पुढील अधिवेशन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी असेल.
काही दिवसांपासून आभासी चलनाबाबत बरीच चर्चा होती. पुढारलेल्या देशांनी त्याला कधीच केराची टोपली दाखवली आहे. या आभासी चलनाबाबत केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबी या तिघांनीही नागरिकांना सावध केले आहे. कारण हे चलन गुंतवणूकदारांना खड्ड्यात पाडू शकते.
वस्तू व सेवाकरांचे संकलन नोव्हेंबर 2021 अखेर 1.31 लाख कोटी रुपये झाले आहे. जुलै 2017 मध्ये हा कर सुरू झाला. हा कर सुरू झाल्यापासून तो अर्थमंत्र्यांच्या पथ्यावरच पडला आहे. दर महिन्याला हा कर 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळत आहे. नागरिकांनी त्यासाठी सुरुवातीला बरीच हाकाटी केली होती. पण आता तो त्यांच्याही अंगवळणी पडला आहे.
एलआयसीचा आयपीओ पुढील काही महिन्यात येणार असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने सरकारने नुकतेच त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पावले उचलली आहेत. हा एक महाकाय 'आयपीओ' ठरणार असून त्याबाबत जगभरात उत्सुकता आहे. कारण परकीय गुंतवणूकदारांनाही त्यात काही हिस्सा ठेवला जाणार आहे. एलआयसीच्या प्राथमिक भागविक्रीत पॉलिसीधारकांना काही हिस्सा ठेवला जाणार आहे म्हणून पॉलिसीधारकांनी त्यांचे पॅन क्रमांक अद्ययावत करून, ते विमापॉलिसींशी संलग्न करण्याबाबत आवाहन केले आहे. पॉलिसीधारकांसाठी समभागांच्या 10 टक्के समभाग राखीव ठेवले जाणार आहेत. या एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी त्यांचे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे.
भारतीय नागरिकांकडे खूप मोठा सोन्याचा साठा आहे. किंबहुना भारत एके काळी 'सुवर्णभूमी' म्हणूनच समजला जायचा. श्रीकृष्णानेही आपल्या द्वारकेला सोन्याची केली होती. सुवर्णाच्या साठ्यावर काही प्रमाणात रिझर्व्ह बँकेला आपल्या चलनातील रक्कम वाढवता येते. जगभरातील अन्य चलनांनाही सोन्याचे पाठबळ असते. म्हणूनच नागरिकांनी आपले सोने सरकार/रिझर्व्ह बँकेला देऊन त्याबदली सुवर्ण रोखे घेतले तर देशाचे मुद्राधोरण सक्षम होईल, आणि नागरिकांना रोक्यांवर काही व्याजही मिळेल. देशातील नागरिकांकडे 23 हजार ते 24 हजार टन सोने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भारतातील अनेक नामांकित देवस्थानांकडे खूप मोठे सोने जमा आहे. सुवर्णाचा योग्य उपयोग व्हावा त्यासाठी एक 'सुवर्ण बँक' आवश्यक आहे, असे काही तज्ज्ञांना वाटते.
गुरुवारी 2 डिसेंबरला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 58,461 होता तर निफ्टी 17,401 वर होता.
गेल्या आठवड्यात भांडवल बाजार वाढल्यामुळे गुंतवणूकदार 5.35 लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. जगातील भांडवली बाजार डगमगत असताना भारतीय भांडवली बाजार मात्र पाय घट्ट रोवून उभा आहे. याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे स्टार्टअपच्या जगात आज भारताने आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी स्टार्टअपचे बीज भारतात रोवले होते. त्याचा आता मोठा वृक्ष झाला आहे. स्टार्टअपचे मूल्य आता 72 अब्ज रुपये (1 अब्ज डॉलर) वाढले आहे. दरवर्षी स्टार्टअपमध्ये विक्रमी प्रमाणात गुंतवणूक होत आहे व ही रक्कम गुंतवणूकदारांच्या खिशात जात आहे.
चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्या तिमाहीत कारखानदारी क्षेत्रात 5.5 टक्के वाढ झाली तर कृषी क्षेत्रातील वाढ 4.5 टक्के दिसते. मात्र तिसर्या तिमाहीत अवकाळी पावसामुळे कृषिक्षेत्राला थोडा फटका बसण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील वाढ या काळात 7.5 टक्के दिसते. वीज, गॅस, पाणीपुरवठा व अन्य उपयुक्त सेवा या क्षेत्रांची वाढ 8.9 टक्के याच काळात झाली आहे. व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, दळणवळण व प्रसारण सेवा इथेही अशीच वाढ दिसते.
– डॉ. वसंत पटवर्धन