अर्थभान

अर्थभान

दिनेश चोरगे
  •  प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)
  • गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 42.05 अंक व 131.56 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 18307.65 अंक व 61663.48 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.23 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 0.21 टक्क्यांची घट नोंदवली गेली. सप्ताहादरम्यान सर्वाधिक घसरण ही कोल इंडिया (-9.36 टक्के), झी एन्टरटेन्मेंट (-5.64 टक्के), इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स (-4.87 टक्के), यांच्या समभागांमध्ये झाली तसेच सर्वाधिक वाढ कोटक महिंद्रा बँक (3.18 टक्के), हिरोमोटो कॉर्प (2.05 टक्के), हिंडाल्को (2.04 टक्के) यांच्या समभागांमध्ये झाली. गत सप्ताहादरम्यान बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर म्हणजेच 61,980.72 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. तसेच सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने 62,052.57 अंकांच्या वर्षभरातील सर्वोच्च पातळीला देखील स्पर्श केला. या वाढीमध्ये सर्वाधिक वाढ खास करून बँकिंग सेक्टरमधील समभागात झाली. कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक या बँकांबरोबरच हिंदुस्थान युनिलिव्हर, डॉ. रेड्डी, भारती एअरटेल, टीसीएस यांसारख्या समभागांनीदेखील वाढीत सहभाग घेतला.
  • चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारताचा अर्थव्यवस्था वृद्धीदर (जीडीपी ग्रोथ) सुमारे 6.1 टक्के ते 6.3 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला. या महिन्याच्या अखेरीस जीडीपी वृद्धीदराचे आकडे प्रकाशित करण्यात येतील.
  • रुपया चलन शुक्रवारच्या सत्रात 81.65 रुपये प्रतिडॉलरच्या पातळीवरून घसरून 81.6850 रुपये प्रतिडॉलरपर्यंत कमकुवत झाले. एकूण संपूर्ण सप्ताहाचा विचार करता, रुपया डॉलरच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी कमजोर झाला. अमेरिकेतील महागाईदर आटोक्यात येत असल्याचे आकडे जाहीर झाल्याने त्यापूर्वीच्या आठवड्यात खरे तर रुपया डॉलरच्या तुलनेत 2 टक्के मजबूत झाला होता; परंतु अजूनदेखील अमेरिकेतील महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढवण्यात येणार असल्याचे फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून संकेत मिळताच सर्व आशियाई चलने डॉलरच्या तुलनेत 0.5 टक्के ते 2 टक्क्यांपर्यंत कमजोर झाली.
  • आदित्य बिर्ला उद्योग समूहाची प्रमुख कंपनी ग्रासीम इंडस्ट्रीजचा दुसर्‍या तिमाहीचा नफा 1.5 टक्के घटून 964.30 कोटी झाला. मागील वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा महसूल 37 टक्के वधारून 4933 कोटींवरून 6745 कोटी झाला.
  •  ऑक्टोबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर (रिटेल इन्फलेशन) 7.41 टक्क्यांवरून 6.77 टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच घाऊक महागाई दर (डब्लूपीआय इन्फलेशन) मागील 19 महिन्यांच्या न्यूनतम स्तरावर म्हणजे 8.39 टक्क्यांपर्यंत खाली आला. देशातील किरकोळ महागाई दर 2% ते 6% दरम्यान ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य आहे. परंतु, सलग दहाव्या महिन्यात किरकोळ महागाई दर नियंत्रण पातळीपेक्षा अधिक वाढला. सर्वाधिक परिणामकारक असा अन्नधान्याचा महागाई दर ऑक्टोबरमध्ये 8.6 टक्क्यांवरून 7.01 टक्क्यांपर्यंत खाली आला.
  • 'एनडी टीव्ही'मधील 26 टक्के हिस्सा खरेदीस अदानी समूहास बाजार नियामक संस्था 'सेबी'ने मान्यता दिली. तसेच 'एनडी टीव्ही'मधील स्वतंत्र संचालक मंडळाच्या समितीने (इंडिपेंडन्ट डिरेक्टर्स कमिटी) देखील अदानी समूहाने दिलेला प्रस्ताव योग्य किमतीचा असल्याने मान्य केले. अदानी समूहाचा खरेदीसाठीचा खुला प्रस्ताव (ओपन ऑफर) 22 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान खुला राहील.
  • आंतरराष्ट्रीय गुंतवूणकदार कंपनी 'सॉफ्ट बँक'ने पेटीएम कंपनीमधील आपला 4.5 टक्के हिस्सा 200 दशलक्ष डॉलर्सना विकला. पेटीएम, झोमॅटो, डिलिव्हरी, पॉलिसी बझार, नायका यासारख्या स्टार्टअपचे आयपीओ आल्यापासून बाजार भांडवलमूल्य एकूण 2.08 लाख कोटींनी कमी झाले आहे. सर्वाधिक घट ही पेटीएमची प्रवर्तक कंपनी 'वन 97' कम्युनिकेशनमध्ये झाली. हा समभाग आयपीओ आल्यापासून सुमारे 65 टक्के कोसळून, याचे भांडवल बाजारमूल्य 66169 कोटींनी घटले. तसेच पॉलिसी बाझारसारख्या कंपनीच्या समभागाचे बाजारमूल्य आयपीओपासून सुमारे 69 टक्के घटून 37277 कोटींनी कमी झाले. त्यामुळे 'आयपीओ' आल्यावर केवळ सुपरिचित नाव असल्याचा केवळ मापदंड न ठेवता; सामान्य गुंतवणूकदारांनी अशा स्टार्ट अप्सचा ताळेबंद आधी तपासावा, असे आवाहन गुंतवणूक तज्ज्ञांकडून करण्यात येते.
  • 'एलआयसी'तर्फे 'रिलायन्स कॅपीटल'मधील कोटींचे रोखे गुंतवणूक विक्रीची योजना प्रगतिपथावर. 'रिलायन्स कॅपीटल' सध्या दिवाळखोर घोषित केल्यावर यासंबंधीचा निर्णय हा प्राधान्यक्रमाने 'रिलायन्स कॅपीटल'ला कर्जे पुरवलेल्या कर्जदात्यांचा तसेच 'रिलायन्स कॅपीटल' खरेदी करण्यासाठी बोली लावलेल्या सभासदांचा असल्याचे प्रतिपादन एका गटाने केले. एकीकडे 'अनिल अंबानी'च्या 'रिलायन्स कॅपीटल'वर दिवाळखोरीची कारवाई सुरू असताना, एलआयसी रोखे विक्रीची समांतर प्रक्रिया करत असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला. 'रिलायन्स कॅपीटल' खेरदीसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
  • आंतरराष्ट्रीय व्यापारास मान्यता देणारी 'डीजीएफटी'ने भारतातून युरोपियन युनियनला 5841 टन, तर अमेरिकेला 8606 टन साखर निर्यातीची परवानगी दिली. यावर्षी एकूण 6 लाख टन साखर निर्यातीस केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली.
  • ऑक्टोबर महिन्यात भारताची निर्यात मागील महिन्याच्या तुलनेत 16.7 टक्के घटून 29.8 अब्ज डॉलर्स झाली. मागील 20 महिन्यांच्या वाढीनंतर प्रथमच निर्यातीत घट नोंदवण्यात आली. तसेच आयातीत 5.7 टक्क्यांची वाढ होऊन आयात 56.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे मागील महिन्यात असणारी 25.7 अब्ज डॉलर्सची व्यापारतूट ऑक्टोबर महिन्यात 26.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
  • देशातील महत्त्वाची खनिज तेज नैसर्गिक वायू उत्पादक कंपनी 'ओएनजीसी'चा दुसर्‍या तिमाहीचा नफा 30 टक्के घटून 18347.73 कोटींवरून 12825.99 कोटींवर खाली आला. केंद्र सरकारने खनिज तेल उत्पादक कंपन्यांवर नव्याने आकारल्या जाणार्‍या 'विंडफॉल टॅक्स'मुळे नफ्यात घट झाली.
  • फोर्टीस हेल्थकेअर खरेदीसाठी मलेशियाची 'आयएचएच हेल्थकेअर' कंपनी प्रयत्नशील. बाजार नियामक 'सेबी'कडे परवानगी मागितली; परंतु जपानच्या 'दाईची सान्क्यो' कंपनीने याला विरोध दर्शवला. सध्या फोर्टीस आणि दाईची कंपनीचे आधीचे प्रकरण दिल्ली हायकोर्टात प्रलंबित असून या व्यवहाराचे सखोल परीक्षण करण्यात यावे, यासंबंधीची नवीन याचिका 'दाईची सान्क्यो' करणार.
  •  11 नोव्हेंबरअखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश गंगाजळी तब्बल 14.7 अब्ज डॉलर्सनी वधारून 544.7 अब्ज डॉलर्स झाली. ऑगस्ट 2021 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT