Mutual fund SIP | घसरणीच्या काळात ‘एसआयपी’ का बंद करू नये? 
अर्थभान

Mutual fund SIP | घसरणीच्या काळात ‘एसआयपी’ का बंद करू नये?

पुढारी वृत्तसेवा

संदीप पाटील

सध्याच्या काळात लक्षावधी गुंतवणूकदार भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच ‘एसआयपी’चा आधार घेत आहेत. मात्र, शेअर बाजारातील चढ-उतार किंवा मंदीचे सावट दिसू लागताच अनेक गुंतवणूकदार घाबरून असे काही निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन नफ्याचे गणित पार कोलमडून पडते.

बाजार सध्या एका विशिष्ट मर्यादेत अडकलेला असताना एसआयपी बंद करणे किंवा त्यातून पैसे काढून घेणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बाजारात घसरण सुरू झाली की, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि ते आपली ‘एसआयपी’ थांबवण्याचा विचार करतात. वास्तविक, ‘एसआयपी’चा मुख्य फायदा हा ‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’मध्ये असतो. जेव्हा बाजार खाली येतो, तेव्हा तुम्हाला त्याच रकमेत जास्त युनिटस् खरेदी करता येतात. मंदीच्या काळात गुंतवणूक सुरू ठेवल्यास भविष्यात जेव्हा बाजार पुन्हा उसळी घेतो, तेव्हा अशा गुंतवणूकदारांना अधिक चांगल्या परताव्याचा लाभ मिळतो. त्यामुळे बाजारातील तात्पुरत्या पडझडीला घाबरून गुंतवणूक थांबवणे ही सर्वात मोठी आणि नुकसानकारक चूक ठरते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अनेक गुंतवणूकदार एकदा ‘एसआयपी’ सुरू केली की, वर्षांनुवर्षे त्याच रकमेचा भरणा करत राहतात. तुमचे उत्पन्न वाढल्यावर किंवा दरवर्षी ‘एसआयपी’ची रक्कम वाढवणे आवश्यक असते. उत्पन्नाच्या प्रमाणात गुंतवणुकीत वाढ न केल्यास महागाईच्या तुलनेत तुमचा निधी अपुरा पडू शकतो. त्याचप्रमाणे, केवळ एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील किंवा ‘थीम’मधील तेजी पाहून त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणेही धोक्याचे असते. जर त्या क्षेत्राची गती मंदावली, तर संपूर्ण पोर्टफोलिओच्या कामगिरीवर परिणाम होतो, म्हणूनच गुंतवणुकीत वैविध्य असणे अत्यंत गरजेचे आहे.

गुंतवणूक करताना कराच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे हीदेखील एक गंभीर चूक आहे. इक्विटी फंडांमधून 12 महिन्यांच्या आत पैसे काढल्यास त्यावर अल्पकालीन भांडवली नफा कर (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स) जास्त लागतो. ‘एसआयपी’चा प्रत्येक हप्ता हा एक नवीन गुंतवणूक मानला जात असल्याने, पैसे काढताना त्याच्या कालावधीचा विचार करणे अनिवार्य आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन स्थिती भक्कम असल्याने, गुंतवणूकदारांसाठी बाजारातील चढ-उतार हा खरा धोका नसून, गुंतवणुकीतील अनियमितता हाच मोठा धोका आहे. शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक हेच ‘एसआयपी’द्वारे संपत्ती निर्मितीचे खरे सूत्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT