Stock Market Crash: दिवसभर स्थिर वाटणाऱ्या भारतीय शेअर बाजारात व्यवहाराच्या शेवटच्या टप्प्यात अचानक मोठी पडझड पाहायला मिळाली. काही वेळातच बाजाराचा रंग पूर्ण बदलला आणि गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्स तब्बल 1,100 अंकांनी घसरला, तर निफ्टीही जवळपास 400 अंकांनी घसरुन 23,500 च्या पातळीवर आला.
मोठ्या कंपन्यांपासून मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सपर्यंत सर्वत्र विक्रीचा जोर दिसून आला. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये मोठा दबाव पाहायला मिळाला. अचानक झालेल्या या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
BSE च्या टॉप 30 शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. दिवसअखेरीस फक्त चार शेअर्स किरकोळ वाढीसह व्यवहार करत होते, तर उर्वरित 26 शेअर्स लाल रंगात होते.
सर्वाधिक फटका InterGlobe Aviation (IndiGo), Tata Steel आणि Power Grid यांसारख्या शेअर्सना बसला. मेटल, ऊर्जा आणि विमानवाहतूक क्षेत्रात विक्रीचा जोर अधिक दिसून आला.
शेअर बाजारातील घसरणीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाबाबतची अनिश्चितता मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम (Ceasefire) होण्याच्या चर्चांनी बाजाराला दिलासा मिळाला होता. मात्र, आता त्याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने गुंतवणूकदार पुन्हा सावध झाले आहेत.
माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम वाढवण्याबाबत चर्चा सुरू असली तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप अंतिम मंजुरी दिलेली नाही. दुसरीकडे, इराणी सरकारी माध्यमांनीही करार अद्याप अंतिम नसल्याचे म्हटले आहे. यामुळे जागतिक बाजारात पुन्हा अस्थिरतेची भीती निर्माण झाली आहे.
बाजारातील भीती मोजणारा निर्देशांक म्हणून ओळखला जाणारा India VIX आज तब्बल 6 टक्क्यांनी वाढून 15.91 वर पोहोचला. साधारणपणे VIX मध्ये वाढ म्हणजे बाजारात अस्थिरता आणि घसरणीचा धोका वाढल्याचे संकेत मानले जातात. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा सुरक्षित करण्यासाठी विक्रीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
भारतीय बाजारावरचा आणखी एक मोठा दबाव म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री. 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 2.20 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतीय बाजारातून काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. फक्त बुधवारीच FIIs ने 1,040 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. त्यामुळे बाजारातील घसरण अधिक वाढली.
तज्ज्ञांच्या मते, अशा घसरणीमध्ये घाबरून निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीकडे शांतपणे पाहणे महत्त्वाचे असते. सध्या बाजारावर जागतिक घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका आणि भू-राजकीय तणाव यांचा प्रभाव आहे.
मात्र, पुढील काही दिवसांत अमेरिका-इराण चर्चांबाबत स्पष्टता आली आणि FII विक्री कमी झाली, तर बाजार पुन्हा सावरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
अशावेळी गुंतवणूकदारांनी घाबरून विक्री करू नये. बाजारातील घसरणीत SIP सुरू ठेवावी आणि मजबूत कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवावं. एकदम मोठी गुंतवणूक टाळून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं सध्याच्या अस्थिर बाजारात अधिक सुरक्षित ठरू शकतं.