Who is Avadhut Sathe
भांडवली बाजार नियामक सेबीने नुकतीच एका मोठ्या फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर विरुद्ध मोठी कारवाई केली. अवधूत साठे (Avadhut Sathe) असे त्यांचे नाव आहे. ते ट्रेड आणि इन्फ्लुएन्सर असून त्यांना ट्रेडिंग गुरु मानले जाते. सेबीने महाराष्ट्रातील कर्जत येथील साठे यांच्या ॲकॅडमीची दोन दिवस झाडाझडती घेत जप्तीची कारवाई केली. सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी २१ ऑगस्ट रोजी FICCI च्या एका कार्यक्रमात याविषयी माहिती दिली. पण त्यांनी ही माहिती देताना साठे यांचे प्रत्यक्ष नाव घेतले नाही. यामुळे अवधूत साठे कोण आहेत? आणि तो सेबीच्या रडारवर का आहेत? हे जाणून घेऊया....
अवधूत साठे त्यांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बाजाराबाबत विश्लेषण, चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक रणनितीविषयी माहिती शेअर करत असतात. त्यांच्या YouTube चॅनेलचे ९ लाख ३७ हजार सबस्क्रायबर्स आहेत. ते अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमी (Avadhut Sathe Trading Academy) नावाने एक ॲकॅडमी चालवतात. ते एक वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने ट्रेडिंगचे धडे देतात. ते कधीकधी व्याख्यान देताना मध्येच ताल धरतात आणि विद्यार्थ्यांनाही स्टेजवर त्यांच्यासोबत ताल धरण्यासाठी बोलवतात.
अवधूत साठे १९९१ पासून ट्रेडिंगमध्ये सक्रिय आहेत. ते मध्य मुंबईतील दादर येथील एका साध्या चाळीत लहानाचे मोठे झाले. त्यानंतर ते त्यांचे कुटुंब मुलुंड येथे स्थलांतरित झाले. त्यांनी अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले. ते सॉफ्टवेअर उद्योगात उतरले. त्यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजमधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्याकडे विदेशातील कामाचाही अनुभव आहे. त्यांनी काही काळ अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियात काम केले. जेव्हा ते गुंतवणूक आणि ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करु लागले तेव्हा त्यांना यश मिळाले. यामुळे त्यांनी २००८ मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्रेडिंग ॲकॅडमी सुरु केली. त्यांच्या ट्रेडिंग ॲकॅडमीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, अवधूत साठे हे एक यशस्वी ट्रेडर म्हणून ओळथले जातात. या क्षेत्रातील ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचा त्यांच्याकडे दीर्घकाळाचा अनुभव आहे.
सेबी यातून एक संकेत द्यायचा आहे की जे कोणी रिटेल ट्रेडर्सची दिशाभूल करतील आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली बाजारावर प्रभाव पाडतील अशांवर कठोर केली जाईल. साठे हे गेल्या काही महिन्यांपासून सेबीच्या रडारवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीचा व्यवहार केवळ प्रशिक्षण देण्यापुरता मर्यादित नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. साठे पेनी स्टॉकबद्दल सल्ले देतात. तसेच त्यांच्याकडून खासगी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून टिप्सदेखील दिल्या जातात. या माध्यमातून साठेंनी ऑपरेटर अथवा प्रमोटर्स यांच्याशी संगनमत करुन असे शेअर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले, जे ते कोणताही विचार न करता खरेदी करत होते. जेणेकरुन त्यांना आशा होती की त्यांचे ५ रुपये ५०० रुपयांपर्यंत जातील.
साठे यांचे अनेक विद्यार्थी असे मानतात की ते भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करणारे व्यक्ती आहेत. शेअर बाजाराबाबत साठे देत असलेल्या प्रशिक्षणाची कोणीही बरोबरी करू शकणार नाही. साठे यांच्या YouTube पेजनुसार, त्यांच्या ट्रेनिंग सत्रांमधील शिक्षणानंतर, एका गृहिणीने ट्रेडिंगच्या माध्यमातून केवळ अडीच वर्षांत १ कोटी रुपये कमावले. हे केवळ एक उदाहरण आहे, त्यांच्या पेजवर असे अनेक अभिप्राय नमूद केले आहेत.
सेबीच्या कारवाईपूर्वी, साठे यांच्यावर फसवणूक आणि घोटाळेबाज म्हणून आरोप करण्यात आला. इतर इन्फ्लुएन्सर आणि मार्केटमध्ये सक्रिय असलेल्यांनी अनेकदा साठे यांच्यावर त्यांच्या ट्रेडिंग ॲकॅडमीद्वारे स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचे आरोप केले आहेत. सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार रितेश गुलराजानी यांनी साठे यांच्याविरुद्ध तक्रारही नोंदवली होती.
अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीची सुरुवात २००८ मध्ये झाली. आज या ॲकॅडमीच्या मुंबई, दिल्ली, बंगळूर, भुवनेश्वर, कोची आणि नागपूर यासारख्या शहरांत १७ शाखा आहेत. UAE आणि अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे ऑनलाइन क्लास चालतात. त्यांनी कोर्सेस इंग्रजी, हिंदी, तमिळ, मराठी आणि तेलुगू अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध केले आहेत. त्यांच्या ॲकॅडमीचे इंस्टाग्रामवर २ लाख ३७ हजार फॉलोअर्स आहेत.