कमलेश गिरी
गुंतवणुकीच्या जगात यशस्वी होण्यासाठी केवळ अफाट बुद्धिमत्ता किंवा प्रचंड भांडवलच आवश्यक असते असे नाही, तर संयम आणि शिस्त अधिक महत्त्वाची ठरते. हे सिद्ध करण्यासाठी वॉरन बफे आणि रोनाल्ड रीड या दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे नेहमीच दिली जातात. या दोघांच्या गुंतवणूक शैलीतील फरक सामान्य गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मितीचा एक मोठा वस्तुपाठ आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरन बफे. हे ‘व्हॅल्यू इन्वेस्टिंग’चे पुरस्कर्ते मानले जातात. ज्या कंपन्यांचे व्यवस्थापन उत्तम आहे आणि ज्यांच्या व्यवसायात दीर्घकालीन वाढीची क्षमता आहे, अशा कंपन्यांचे शेअर्स योग्य किमतीत खरेदी करून ते अनेक दशके आपल्याकडे ठेवण्यावर त्यांचा भर असतो. बफे यांची रणनीती ही सखोल अभ्यास, व्यवसायाची समज आणि चक्रवाढ व्याजाच्या (कंपाउंडिंग) ताकदीवर आधारित आहे. मात्र, ही शैली आत्मसात करण्यासाठी बाजाराचे तांत्रिक ज्ञान आणि संयम असणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, रोनाल्ड रीड यांची कथा थक्क करणारी आहे. रीड हे कोणतेही मोठे गुंतवणूक तज्ज्ञ नव्हते; त्यांनी गॅस स्टेशनवर अटेंडंट आणि सफाई कामगार म्हणून काम केले. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे 8 दशलक्ष डॉलर्सची मोठी संपत्ती असल्याचे समोर आले. रीड यांनी केवळ साधी आणि सरळ रणनीती अवलंबली होती. मिळालेल्या उत्पन्नातील काही हिस्सा वाचवणे, तो चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणे आणि त्या गुंतवणुकीला दशकानुदशके हात न लावणे. लाभांशाचा (डिव्हिडंड) पुन्हा गुंतवणुकीसाठी वापर करणे हे त्यांच्या यशाचे गमक होते.
या दोन शैलींची तुलना केल्यास असे दिसून येते की, सामान्य गुंतवणूकदारासाठी रोनाल्ड रीड यांचा मार्ग अधिक सुलभ आणि अनुकरणीय आहे. प्रत्येकालाच वॉरन बफे यांच्यासारखे बाजाराचे विश्लेषण करणे शक्य नसते; परंतु रीड यांच्यासारखी शिस्त आणि बचत कोणीही पाळू शकते. संपत्ती कमवण्यासाठी तुम्ही किती कमावता यापेक्षा तुम्ही किती वाचवता आणि किती काळ गुंतवणूक टिकवून ठेवता, हे अधिक निर्णायक ठरते.
अखेर, गुंतवणूकदाराने आपल्या कौशल्यानुसार मार्ग निवडावा. जर तुम्हाला व्यवसायाची समज असेल तर बफे यांची शैली निवडावी, अन्यथा रोनाल्ड रीड यांच्याप्रमाणे संथ पण खात्रीशीर मार्गाने संपत्ती निर्मितीकडे वाटचाल करावी. बाजारातील चढ-उतारांकडे दुर्लक्ष करून दीर्घकाळ टिकून राहणे, हाच या दोन्ही शैलींमधील समान आणि सर्वात महत्त्वाचा धागा आहे.