शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची वाढती संख्या हा एक सकारात्मक संकेत आहे. अर्थव्यवस्थेचा वेग आणि डीमॅट खात्यांची वाढती संख्या ही गुंतवणूकदारांचा उत्साह सांगणारी आहे. तुम्हाला तुमच्या लहान मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर मायनर डीमॅट खाते हा एक चांगला पर्याय राहू शकतो.
सेबीच्या नियमानुसार 18 पेक्षा कमी वयोगटातील अल्पवयीन मुलांसाठी डीमॅट खाते सुरू करण्याची परवानगी आहे. ते एकप्रकारे मायनर डीमॅट खाते असेल आणि ते अल्पवयीन पाल्यांच्या नावावर सुरू करण्यात येते; परंतु हे खाते पाल्याच्या पालकांकडून हाताळले जाते. मुलांचे वय 18 झाल्यानतंर तो स्वत:च खाते हाताळू शकतो. आपण कोणत्याही बँकेतून किंवा ब्रोकरेज फर्मच्या माध्यमातून मायनर डीमॅट खाते सुरू करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन खाते सुरू करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मुलांसाठी जन्माचा दाखला, बाल आधार कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रांची गरज भासते.
पालकासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन पुरवाना, मतदान ओळख पत्र किंवा सरकारने जारी केलेले कोणतेही ओळखपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात.
आपण कोणत्याही बँकेकडून किंवा ब्रोकरेज फर्मच्या माध्यमातून मायनर डीमॅट खाते सुरू करू शकता. खाते सुरू करण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल.
अल्पवयीन डीमॅटधारक शेअर खरेदी करू शकत नाहीत; मात्र त्यांचे पालक त्यांच्याकडे असलेले रोखे या डीमॅट खात्यात स्थानांतरित करू शकतात किंवा रोखे खरेदी करून अल्पवयीन मुलांच्या खात्यात स्थानांतरित करू शकतात. अल्पवयीन मुलांना स्वत:हून डीमॅट खाते सुरू करण्याची परवानगी नसल्याने केवळ मुलांचे पालकच त्यांच्यासाठी खाते सुरू करू शकतात. मायनर डीमॅट खात्याला ओव्हरड्राफ्टची सुविधा नसावी. या खात्यातून शेअर खरेदी केवळ वयाच्या अठराव्या वर्षानंतर करता येते. पालकाकडून अल्पवयीन पाल्याला शेअर गिफ्ट करता येते. मायनर डीमॅट खात्यात जमा असलेल्या पैशावर व्याज मिळत नाही.
मायनर डीमॅट खात्याची वेळोवेळी केवायसी करणे गरजेचे असते. मायनरच्या फोटोबरोबरच आई-वडिलांना देखील केवायसी फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागते. मायनर खात्यातून इंट्रा डे ट्रेडिंग करता येत नाही. नियमानुसार कोणताही अल्पवयीन पाल्य आर्थिक व्यवहार करू शकत नाहीत. या खात्यातून थेटपणे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येत नाही. उलट गिफ्ट म्हणून मिळालेले शेअर या पाल्यांच्या खात्यात ठेवता येतात.
मुलांच्या भविष्यासाठी बचतीचा हा एक चांगला मार्ग आहे.
मुलांचे शिक्षण, विवाह अणि अन्य खर्चांसाठी पैशाची बचत करण्यासाठी मदत करते.
डीमॅट खातेधारक अल्पवयीन पाल्य हा सज्ञान झाल्यानंतर ते खाते आपोआप नियमित खात्यात रूपांतरित होते. यासाठी कागदपत्रे जमा करावी लागतात. नव्याने अर्ज भरून मायनर खाते नियमित खाते करता येते. तसेच अल्पवयीन डीमॅटधारकाच्या खात्यात उत्पन्न जमा होत असेल आणि भांडवली नफा मिळत असेल, तर ते उत्पन्न पालकाच्या उत्पन्नाला जोडले जाईल.कलम 64 (1 ए) नुसार उत्पन्न गृहित धरले जाईल आणि जुन्या कर व्यवस्थेनुसार या खात्यावर मिळवलेल्या उत्पन्नावर दीड हजारापर्यंत पालकांना करसवलत मिळवता येते.