जयदीप नार्वेकर
आपल्या जीवलगांना, नातेवाईकांना सोनं, जमीन, दागदागिने किंवा रोकड भेट दिल्याचे आपण ऐकतो; परंतु म्युच्युअल फंड (एमएफ) युनिटस् भेट देण्याची पद्धत तुलनेने नवी आहे. या माध्यमातून प्रियजनांच्या आर्थिक भविष्याचा शिस्तबद्ध पद्धतीने विचार केला जातो. मात्र, या प्रक्रियेसाठी ठरावीक नियम, कार्यपद्धती व करसंबंधी बाबी लागू होतात.
डिमॅट स्वरूपात युनिटस् ठेवणे आवश्यक ः गिफ्ट करण्यासाठी म्युच्युअल फंड युनिटस् डिमॅट स्वरूपात असणे अत्यावश्यक आहे. फिजिकल फॉर्म किंवा स्टेटमेंट-ऑफ-अकाऊंट पद्धतीने असतील, तर ते गिफ्ट करता येत नाहीत. त्यासाठी प्रथम डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे कन्व्हर्जन रिक्वेस्ट फॉर्म सादर करून युनिटस् डिमॅट स्वरूपात रूपांतरित करावे लागतात.
युनिटस् डिमॅट झाल्यानंतर भेट स्वरूपात हस्तांतर दोन मार्गांनी करता येते.
ऑफलाईन पद्धत : डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप भरून, प्राप्तकर्त्याचा डिमॅट तपशील देऊन ती स्लिप डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे सादर करावी.
ऑनलाईन पद्धत : आपल्या डिमॅट खात्यात लॉग-इन करून, ट्रान्स्फर करावयाच्या युनिटस् निवडाव्यात, प्राप्तकर्त्याचे तपशील भरून विनंतीची पुष्टी करावी.
या प्रक्रियेत काही शुल्क आकारले जाते. व्यवहार शुल्क हे ट्रान्स्फर मूल्याच्या 0.03% किंवा किमान रु.25 (यापैकी जे अधिक असेल) इतके आकारले जाते, शिवाय जीएसटी लागू होतो. तसेच 0.015% दराने स्टॅम्प ड्युटीही भरावी लागते.
सीडीएसएल किंवा एनएसडीएल या दोन्ही डिपॉझिटरीमार्फत ट्रान्स्फर वैध मानले जाते.
गुंतवणूकदार जिवंत असताना नॉन-डिमॅट किंवा एसओए स्वरूपातील युनिट भेट स्वरूपात देता येत नाहीत. मात्र, गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर हे युनिटस् ‘ट्रान्समिशन’ पद्धतीने पुढे हस्तांतरित होतात. सह-धारक असल्यास त्याच्याकडे युनिटस् आपोआप जातात; अन्यथा नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारसाला आवश्यक कागदपत्रे (जसे मृत्यू प्रमाणपत्र, केवायसी, बँक तपशील) सादर करून हस्तांतरण केले जाते.
म्युच्युअल फंड युनिटस् थेट अल्पवयीन मुलांच्या नावानेही विकत घेता येतात. पालक किंवा पालकनियुक्तसंरक्षक त्या खात्याचे व्यवस्थापन करतात आणि मुलगा/मुलगी 18 वर्षांचा झाल्यावर खात्याचा ताबा त्यांच्याकडे जातो. शिक्षण किंवा दीर्घकालीन गरजांसाठी कुटुंब आर्थिक कोष निर्माण करण्याचा हा लोकप्रिय मार्ग मानला जातो.
जोडीदाराला किंवा अल्पवयीन मुलांना दिलेल्या युनिटस्वरून होणारे उत्पन्न किंवा नफा दात्याच्या नावाने करपात्र ठरतो; पण प्रौढ मुलं, पालक किंवा भावंडांना दिल्यास नफा त्यांनाच करपात्र ठरतो.
सुरुवातीला नियम गुंतागुंतीचे वाटले तरी प्रत्यक्षात म्युच्युअल फंड युनिट भेट देणे ही संपत्ती हस्तांतरणाची पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धत आहे. डिमॅट स्वरूपामुळे प्रक्रिया सहज पार पडते आणि कायदेशीर खात्री मिळते.
आयकर कायद्यात ‘या’ भेटींची तरतूद आहे :
*करमुक्तभेटी : पती-पत्नी, मुले, पालक, भाऊ-बहिणी यांसारख्या नातलगांना दिलेले ट्रान्स्फर कोणत्याही रकमेपर्यंत करमुक्तअसते.
*करपात्र भेटी : नातलग नसलेल्या व्यक्तींना जर रु. 50,000 पेक्षा अधिक किमतीचे युनिटस् दिल्यास ती रक्कम प्राप्तकर्त्याच्या करपात्र उत्पन्नात धरली जाते.
*कॅपिटल गेन : प्राप्तकर्त्याने युनिटस् विकल्यावर भांडवली नफा कर भरावा लागतो. येथे दात्याचा मूळ खरेदी खर्च व होल्डिंग पिरियड पुढे नेला जातो. त्यामुळे नफा अल्पकालीन की दीर्घकालीन याचा निर्णय या आधारे घेतला जातो.