तुमच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी वाहन असेल आणि तुम्ही आतापर्यंत वाहन विम्यावर कोणताही दावा केला नसेल तर नक्कीच तुम्हाला नो क्लेम बोनस मिळाला असेल. नो क्लेम बोनस काय असतो? जुन्या वाहनांच्या नो क्लेम बोनसचा फायदा नवीन वाहनांच्या खरेदीत घेता येतो का? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात.
स्वाती देसाई
नो क्लेम बोनसशी संबंधित नियम सर्वांनाच ठाऊक असतील असे नाही. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे वाहन असले, तरी त्याचा विमा उतरविलेला असतोच. वास्तविक, थर्ड पार्टी विमा आवश्यक आहे. परंतु, बहुतांश मंडळी वाहनाबरोबरच स्वत:च्या सुरक्षेला प्राधान्य देतात. अशावेळी थर्ड पार्टीऐवजी कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन घेतला जातो. या प्रकारच्या योजनेत थर्ड पार्टीबरोबरच वाहनाला आणि स्वत:च्या जोखमीला कवच लाभते.
तुम्ही वाहनाची चांगली काळजी घेत असाल आणि गाडी चालविण्याची शैलीदेखील चांगली असेल, तर विम्यावर दावा करण्याची गरज भासत नाही. अशावेळी विमा कंपन्या बक्षीस म्हणून नो क्लेम बोनस देतात. ‘नो क्लेम बोनस’ ही एकप्रकारे सवलत मानली जाते. ती दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मिळते. वर्षभरात दावा केला नसेल तर अशा प्रकारचा बोनस विमा कंपन्यांकडून मिळतो. तुम्ही अनेक वर्षे कोणताही दावा केला नसेल तर नो क्लेम बोनसची सवलत दरवर्षी वाढत जाते. याचा फायदा पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी मिळतो आणि विमा कंपनीकडून बर्यापैकी हप्ता कमी केला जातो.
एखादी व्यक्ती मोटार किंवा दुचाकी वाहनावर वर्षभरात कोणताही विमा दावा करत नसेल, तर विमा कंपन्या 10 ते 20 टक्क्यांपर्यंत नो क्लेम बोनस देतात. यानंतर दरवर्षी बोनसच्या टक्क्यांचे प्रमाण वाढविले जाते. एवढेच नाही तर कंपन्या ‘एनसीबी’ कायद्यानुसार 50 टक्क्यांपर्यंत नो क्लेम बोनस देतात. अर्थात, यासंदर्भात जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे वेगवेगळे नियम असतात. पण, बहुतांश प्रकरणात 50 टक्क्यांपर्यंत नो क्लेम बोनस मिळतो.
‘नो क्लेम बोनस’ हा वाहनाशी संबंधित नाही, तर विमा खरेदी करणार्याशी संबंधित असतो. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीने विमा उतरविला असेल आणि तो वाहन बदलत नवीन वाहन घेत असेल, तर तो ‘नो क्लेम बोनस’ला नव्या वाहनांशी जोडू शकतो. याशिवाय विमा कंपनी बदलताना, अन्य कंपनीची विमा पॉलिसी घेताना देखील त्यास ‘नो क्लेम बोनस’ जोडता येतो.
काही जनरल इन्शुरन्स कंपन्या ग्राहकांसाठी विशेष ऑफरदेखील देत असतात. यानुसार ठरलेल्या वर्षांसाठी एक निश्चित रकमेपर्यंत दावा करणार्या लोकांसाठी ‘नो क्लेम बोनस’ कायम ठेवला जातो. यात कोणत्याही प्रकारची कपात केली जात नाही. याचाच अर्थ गरज भासल्यास क्लेमदेखील करता येऊ शकतो आणि नो क्लेम बोनसचा लाभही घेता येतो. यासारख्या ऑफरला विमा कंपन्या ‘एनसीबी प्रोटेक्शन’ असे नाव देतात.
एखादी व्यक्ती जुनी मोटार किंवा दुचाकीची विक्री करून नवीन वाहन खरेदी करत असेल आणि जुन्या वाहनांवरच्या नो क्लेम बोनसचा लाभ नव्या वाहनाला जोडण्याची सुविधा मिळते. यासाठी जुन्या मोटारीचा विमा उतरविणार्या कंपनीकडून एनसीबी ट्रान्सफर सर्टिफिकेट घ्यावे लागेल. यानुसार नवीन मोटार खरेदी करताना विमा कंपनीच्या प्रतिनिधीला संबंधित प्रमाणपत्र सादर केल्यास सवलतीचा लाभ घेता येऊ शकतो. एनसीबी ट्रान्सफर प्रमाणपत्र केवळ तीन वर्षासाठी ग्राह्य धरले जाते. तुम्ही तीन वर्षांच्या आत नवीन वाहन खरेदी करत असाल तर जुन्या मोटारीच्या नो क्लेम बोनसचा फायदा घेऊ शकता आणि थेट नवीन वाहनाच्या विम्याचा हप्ता कमी करू शकता.
तुम्ही जुनी गाडी विकून नवीन मोटार खरेदी करत असाल तर जुनी गाडी खरेदी करणार्या व्यक्तीला किंवा कंपनीला मोटार विमा हा तुमच्याच नावावर असल्याचे सांगावे लागेल. त्यानंतर नवीन मोटारीच्या विम्याला एनसीबी जोडता येईल. जुनी मोटार विकल्याचे प्रमाणपत्र आरटीओ किंवा जुनी मोटार खरेदी करणार्याने सादर केलेल्या घोषणापत्राच्या आधारे मिळवता येते. आरटीओने जारी केलेल्या वाहन मालकीच्या ट्रान्सफरचे पत्रदेखील प्रमाणपत्राच्या रुपाने सादर करता येऊ शकते.
कार विम्यामध्ये नो क्लेम बोनस म्हणजेच ‘एनसीबी’ ही एक महत्त्वाची सवलत असते. ही सवलत विमाधारकाला तेव्हा मिळते जेव्हा त्याने मागील विमा कालावधीत कोणताही दावा केलेला नसतो. नो क्लेम बोनसमुळे पुढील वर्षीच्या विमा हप्त्यावर निश्चित टक्केवारीने सूट मिळते. परंतु, बर्याच वेळा असे घडते की, एखाद्या व्यक्तीने आपली जुनी गाडी विकलेली असते, किंवा नवीन गाडी खरेदी केलेली असते, पण जुन्या पॉलिसीवरील नो क्लेम बोनस वापरलेला नसतो. अशा परिस्थितीत हा बोनस ‘पेंडिंग’ राहतो. योग्य प्रक्रिया वापरून तो नवा बोनस पुढील पॉलिसीमध्ये हस्तांतरित करता येतो.
सर्वप्रथम, एनसीबी पेंडिंग असल्यास त्यासाठी आधीची विमा कंपनी आपल्याला एक प्रमाणपत्र म्हणजेच ‘एनसीबी ट्रान्सफर सर्टिफिकेट’ देते. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही कंपनीला ई-मेलद्वारे किंवा त्यांच्या वेबसाईटवरून विनंती करू शकता. हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही ते पुढील पॉलिसीमध्ये वापरू शकता. लक्षात ठेवा की, हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते दोन वर्षांच्या आतच वापरावे लागते, अन्यथा त्याची वैधता संपते.
नवीन विमा पॉलिसी घेताना त्या पॉलिसीमध्ये जुना एनसीबी समाविष्ट करून घ्यावा लागतो. यासाठी तुम्हाला जुन्या पॉलिसीची प्रत, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि एनसीबी सर्टिफिकेट ही कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर करावी लागतात. नंतर विमा कंपनी त्या माहितीची पडताळणी करून नवीन पॉलिसीवर तुम्हाला योग्य त्या टक्केवारीची सूट देते. या सूटमध्ये वर्षानुसार वाढ होत जाते. उदा. एक वर्ष दावा नसल्यास 20 टक्के, दोन वर्षे सलग दावे नसल्यास 25 टक्के आणि 5 वर्षे सलग दावे नसल्यास 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. हे लक्षात घ्या की, एनसीबी हा फक्त मूळ विमाधारकालाच लागू होतो. जर तुम्ही सेकंड हँड गाडी खरेदी केली असेल तर मागील मालकाचा एनसीबी तुम्हाला लागू होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा एनसीबी वापरावा लागतो. शिवाय, चुकीची माहिती देऊन एनसीबी वापरण्याचा प्रयत्न केल्यास विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते किंवा पॉलिसीच रद्द करू शकते. म्हणूनच खरी माहिती देणे आणि नियमांनुसार सवलत घेणे अत्यावश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीने जुन्या गाडीचा विमा नवा घेतला नसेल किंवा जुनी गाडी विकल्यावर लगेच नवीन गाडी खरेदी केली नसेल, तरीही तो आपला एनसीबी वापरू शकतो, फक्त तो दोन वर्षांच्या आत वापरला गेला पाहिजे. काही वेळा अशा एनसीबी सवलती वापरणे विसरले जाते आणि विमाधारक अधिक हप्ता भरतो. म्हणूनच कोणतीही नवीन पॉलिसी घेण्यापूर्वी आपल्याकडे पूर्वीचा नो क्लेम बोनस आहे का, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
सरतेशेवटी, नो क्लेम बोनस ही विमाधारकासाठी मिळणारी एक फारच फायदेशीर सवलत आहे. योग्यवेळी त्याचा उपयोग करून, विमा हप्त्यात लक्षणीय बचत करता येते. त्यामुळे जुन्या पॉलिसीवरील पेंडिंग एनसीबी वापरण्याची प्रक्रिया लक्षपूर्वक आणि नियमांनुसार पूर्ण करावी, जेणेकरून तुम्हाला पुढील पॉलिसीमध्ये पूर्ण लाभ मिळू शकेल.
नो क्लेम बोनसचा सर्वाधिक फायदा म्हणजे विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना हप्त्यात 10 ते 50 टक्के सवलत मिळते. सवलतीचा टक्का हा दावा न करण्यावर अवलंबून असतो. तुम्ही किती वर्षे दावा करत नाहीत, त्यावर एनसीबीचे प्रमाण वाढत जाते. कमाल सवलत 50 टक्क्यांपर्यंत मिळते. एखादा व्यक्ती सलग दोन वर्षे कोणताही क्लेम करत नसेल तर त्याला 20 ते 25 टक्के एनसीबी मिळू शकतो. तिसर्या वर्षात तुम्ही क्लेम केला तर नो क्लेम बोनस कमी केला जातो.