वसंत माधव कुळकर्णी
नोव्हेंबर 2025 च्या अखेरीस निफ्टी 50 निर्देशांकाने सर्वकालीन उच्चांक नोंदविला. त्यानंतर निर्देशांकात घसरण झाली. डिसेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्याने कपात केली. याची प्रतिक्रिया निफ्टी 50 निर्देशांक सर्वकालीन उच्चांकावर पोहोचण्यात झाली. दुसर्या तिमाहीत जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा 8.2% जास्त असूनही, कमकुवत रुपयामुळे तसेच भारत अमेरिका व्यापार करारावर अद्याप एकमत न झाल्याने या कराराच्या अनिश्चिततेमुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार होऊ शकले नाही. ग्राहकांच्या क्रयशक्तीतील पुनर्प्राप्ती, मर्यादित राजकोषीय तूट, कमी महागाई यामुळे मध्यम काळात जीडीपीत वाढ संभवते. साहजिकच 2026 हे वर्ष भारतीय बाजारांसाठी एक सर्वसाधारण वर्ष असेल.
बाजारात तेजी असूनही, विविध मार्केट कॅप विभागांमधील मूल्यांकन 2024 मधील त्यांच्या सर्वोच्च मूल्यांकनापेक्षा कमी आहे. बहुतेक मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या अद्याप सरासरी मूल्यांकनाच्या खाली व्यवहार करीत आहेत. बाजाराची पुनर्प्राप्ती 2026 मध्ये अपेक्षित असल्याने विस्तृत बाजार निर्देशांकापेक्षा (निफ्टी 500 टीआरआय) चांगला परतावा मिळविण्यात यशस्वी झालेल्या यूटीआय फोकस फंडात गुंतवणूक करण्याची ही शिफारस आहे. यूटीआय फोकस फंड अशा गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देऊ शकतो, ज्यांना दीर्घकाळासाठी एसआयपी करण्याची इच्छा असते; परंतु परतावा वाढविण्यासाठी थोडी गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅपमध्ये हवी असते. बाजार नियामक सेबीच्या आदेशानुसार फोकस्ड फंडस्ना जास्तीत जास्त 30 कंपन्या पोर्टफोलिओत समाविष्ट करता येतात. ही मर्यादा राखूनही विविध उद्योगांतील चांगल्या कंपन्यांचा समावेश फोकस फंडात असतो. यूटीआय फोकस फंड हा फोकस फंड गटात चांगली कामगिरी करणार्यांपैकी एक आहे, विशेषतः कोव्हिडनंतरच्या काळात. या फंडाने त्याच्या मानदंड (बेंचमार्क) सापेक्ष सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. गुंतवणूकदार पाच ते सात वर्षांसाठी यात एसआयपी करण्याचा विचार करू शकतात.
निरोगी कामगिरी
फोकस फंड - फंड गट 2017 -18 मध्ये सुरू करण्यास सेबीने मान्यता दिली. यूटीआय फोकस फंडाची सुरुवात 25 ऑगस्ट 2021 रोजी झाली. ऑगस्ट 2026 मध्ये हा फंड 5 वर्षे पूर्ण करेल. गेल्या एक, आणि तीन कालावधीतील पॉईंट-टू-पॉईंट परतावांचा विचार केला, तर यूटीआय फोकस फंडाने त्याच्या मानदंड सापेक्ष (निफ्टी 500 टीआरआयला) 3 ते 5 टक्के अधिक परतावा कमविला आहे. ऑगस्ट 21 ते डिसेंबर 25 कालावधीतील तीन वर्षांच्या रोलिंग रिटर्नचा विचार केला, तर फंडाने त्याच्या बेंचमार्कपेक्षा 98 टक्के वेळा जास्त परतावा मिळविला आहे. एचडीएफसी फोकस्डने 48.67 टक्के15 ते 20 आणि 2.56 टक्के 20 टक्क्यांहून अधिक परतावा मिळविला आहे. 26 ऑगस्ट 2021 ते 26 डिसेंबर 2025 दरम्यानच्या एसआयपी वर 12.87 टक्के XIRR मिळवला आहे.
* सर्व डेटा पॉईंटस् फंडाच्या रेग्युलर ग्रोथ ‘एनएव्ही’शी संबंधित.