पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा झटका दिला आहे. त्यांनी चीनवर १०४ टक्के अतिरिक्त शुल्क (Trump Tariffs) लागू करण्याची घोषणा केली. हे शुल्क मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाले. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर तीव्र झाले आहे. तसेच यामुळे जगावर आर्थिक संकटाचे सावट घोंघावू लागले आहे.
२ एप्रिल रोजी अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेनंतर चीनने त्याला प्रत्युत्तर म्हणून ३४ टक्के शुल्क लागू केले. या घडामोडीनंतर ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली होती की जर त्यांनी हे शुल्क मागे घेतले नाही तर त्यांच्यावर अतिरिक्त शुल्क लागू केले जाईल. आता ट्रम्प प्रशासनाने दिलेली ही धमकी खरी करुन दाखवली.
मंगळवारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पुष्टी केली होती की ९ एप्रिल रोजी चीनच्या आयात उत्पादनावर अतिरिक्त १०४ टक्के कर लागू होईल. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत, लेविट यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना सांगितले की चीनचा डील करण्याचा विचार आहे.
फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, ट्रम्प जशास तसे म्हणजेच रेसिप्रोकल शुल्क लागू करतील, हे चीनला अपेक्षित होते. चीनने व्हाईट हाऊसशी करार करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त १०४ टक्के शुल्क लागू केल्याचे मानले जात आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकेच्या आयात उत्पादनांवर ३४ टक्के परस्पर शुल्क लागू केले. आमची अखेरपर्यंत लढाई सुरु राहील, अशी शपथ त्यांनी घेतली. हे "ब्लॅकमेल" असल्याचा उल्लेख करत, आम्ही टॅरिफ धमक्यांना घाबरत नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, ट्रम्प (Trump tariffs) यांनी जाहीर केलेल्या भारतीय उत्पादनांवरील २६ टक्के शुल्काचा (टॅरिफ) निर्णय बुधवारी सकाळी ९:३० वाजता अधिकृतपणे लागू झाला. ''भारताचे धोरण खूप, खूप कठोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच येऊन गेले. ते माझे खूप चांगले मित्र आहेत, पण तुम्ही आमच्याबद्दल योग्य असा निर्णय घेत नाही. ते आमच्याकडून ५२ टक्के शुल्क आकारतात आणि आम्ही त्यांना जवळजवळ काहीही आकारत नाही," असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमधील "मेक अमेरिकन वेल्थी अगेन" कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.
२०१८ मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातदेखील अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर झाले होते. चीनवर दबाव आणणे आणि त्यांच्या व्यापार धोरणांत बदल घडवून आणणे हा यामागील उद्देश होता. आता २०२५ मध्ये ट्रम्प यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर हे टॅरिफ वॉर पुन्हा तीव्र झाले आहे. यासोबतच जगभरात व्यापार युद्धाची भीतीही वाढली आहे.