* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 443.25 अंक आणि 1497.20 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 24426.85 आणि 79809.65 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.78 टक्के तर सेन्सेक्समध्ये 1.84 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये मारुती सुझुकी इंडिया (3.1 टक्के), आयशर मोटर्स (3.0 टक्के), आयटीसी (2.9 टक्के), हिरो मोटोकॉर्प (1.8 टक्के) आणि हिंदुस्थान युनिलिव्हर (1.1 टक्के) या समभागांचा समावेश झाला. तर सर्वाधिक घसरण झालेल्या समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (-6.0 टक्के), अपोलो हॉस्पिटल्स (-3.9 टक्के), रिलायन्स इंडस्ट्रीज (-3.7 टक्के), अदानी एंटरप्रायझेस (-3.5 टक्के) आणि एचडीएफसी बँक (-3.1 टक्के) या समभागांचा समावेश झाला.
* ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला अमेरिकन न्यायालयाचा धक्का. ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे प्रतिपादन. अमेरिकेच्या फेडरल अपिलीय न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले अनेक जागतिक टॅरिफ बेकायदेशीर ठरवले आहेत. ट्रम्प यांनी 1977 च्या IEEPA कायद्याचा आधार घेत एकतर्फी पद्धतीने परकीय वस्तूंवर टॅरिफ लावले होते. मात्र, हा कायदा शुल्क लावण्याचा अधिकार देत नाही, असा न्यायालयाचा निर्णय आहे. विशेषतः, ‘रेसिप्रोकल’ टॅरिफसंदर्भातील आदेश रद्द करण्यात आले आहेत. असे असले तरी ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ 14 ऑक्टोबर 2025 पासून लागू राहणार आहेत. ट्रम्प प्रशासन हा खटला सर्वोच्च न्यायालयात नेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे व्यापार धोरणावर आणि कार्यकारी अधिकारांवर परिणाम होणार आहे.
* चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था वृद्धिदर 7.8 टक्क्यांवर. ही वाढ मागील पाच तिमाहीतील सर्वोच्च ठरली आहे. सेवा क्षेत्रातील मजबुती, सरकारी भांडवली खर्चाचे वेळीच झालेले वितरण आणि कमी महागाई दर हे प्रमुख कारणीभूत ठरले. क्षेत्रनिहाय वृद्धिदर सार्वजनिक प्रशासन व संरक्षण (9.8%), वित्त व व्यावसायिक सेवा (9.5%), आणि उत्पादन क्षेत्रात (7.7%) यामध्ये प्रामुख्याने वाढ दिसून आली. मात्र, खनिज व उत्खनन क्षेत्रात 3.1 टक्क्यांची घट नोंदवली गेली.
* जिओचा भागविक्रीचे (आयपीओ) संकेत; रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या भागविक्रीची तयारी सुरू केली असून, ही भागविक्री 2026 च्या जूनपूर्वी होण्याची शक्यता आहे. कंपनीचे मूल्यांकन 10 ते 12 लाख कोटी रुपये इतके असू शकते. आर्थिक वर्ष 2025 मध्ये जिओचे उत्पन्न 1.28 लाख कोटी रुपये आणि नफा (ईबीआयटीडीए) 64,170 कोटी रुपये इतका नोंदवण्यात आला. याअंतर्गत 50,000 ते 60,000 कोटी रुपयांचे भांडवली संकलन अपेक्षित आहे. तसेच, रिलायन्सने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रवेश करत रिलायन्स इंटेलिजन्स ही नवीन कंपनी स्थापन केली असून, गुगल व मेटा यांच्याशी भागीदारी केली आहे.
* भारत आणि जपान यांच्यात पार पडलेल्या आर्थिक सहकार्य आणि करारविषयी बैठकीत जपानने पुढील दशकात भारतात 10 ट्रिलियन येन (सुमारे 5.5 लाख कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली. या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान, डिजिटल भागीदारी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या मोबिलिटी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांनी आर्थिक सहकार्य वाढवण्याचे आणि तंत्रज्ञान सहकार्याच्या द़ृष्टीने 50 लाख लोकांची देवाण-घेवाण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
* डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर; 88.20 रुपये प्रति डॉलर स्तरावर बंद. दिवसभरात 0.65 टक्के घट नोंदवली गेली असून, हा महिन्यातला सर्वात मोठा घसरणीचा दिवस ठरला. अमेरिकेच्या कर धोरणांचा दबाव, शेअर बाजारातून भांडवल बाहेर पडणे, तेलाच्या मागणीत वाढ आणि रुपया-युआन घसरणीचा परिणाम यामुळे ही स्थिती निर्माण झाली. रिझर्व्ह बँकेने रुपयाला पडू देण्याच्या भूमिकेमुळेही कमजोरी अधिक तीव्र झाली, असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
* इंडिगोचे प्रवर्तक राकेश गंगवाल यांच्या चिंकरपु फॅमिली ट्रस्टने इंडिगो एअरलाईन्समधील 1.3 टक्के हिस्सा 2,933 कोटींना विकला, त्यामुळे वर्षभरातील एकूण विक्री 14,497 कोटींवर पोहोचली आहे. ही विक्री दोन टप्प्यांत झाली असून, 5.04 दशलक्ष शेअर्सची देवाण-घेवाण झाली. विक्रीनंतर ट्रस्टचा हिस्सा 3.08% वरून 1.78% झाला असून, गंगवाल कुटुंबाचा एकूण हिस्सा आता 7.81% वरून 6.51% झाला आहे. गंगवाल यांनी 2022 मध्ये सहसंस्थापक राहुल भाटिया यांच्याशी मतभेद झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हिस्सा विकण्याची घोषणा केली होती.
* जपानची वाहन निर्माता कंपनी सुजुकी मोटर कॉर्पोरेशन येत्या पाच ते सहा वर्षांत भारतात 70,000 कोटी गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक गुजरातमधील हंसलपूर येथील प्रकल्पात केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इव्ही-व्हिटारा (eVitara) या कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. ही suv 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी 10 लाख वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता असून, भविष्यात भारताची लिथियम-आयन बॅटरी निर्मितीही येथेच केली जाणार आहे. हे पाऊल मेक इन इंडिया मोहिमेतील एक मोठे यश मानले जात आहे.
* सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना ‘दिवाळी गिफ्ट’ म्हणून केंद्र सरकार जीएसटी दरात मोठी कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दैनंदिन वस्तू, कार आणि दुचाकी वाहने स्वस्त होतील, अशी अपेक्षा आहे. जीएसटी परिषदेची 3-4 सप्टेंबर रोजी होणारी बैठक या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करेल. ही कपात सप्टेंबरच्या मध्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे 5% आणि 18% अशा दोनच जीएसटी स्लॅबची नवी रचना अस्तित्वात येईल, ज्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होऊन सणासुदीच्या काळात ग्राहकांची खरेदी वाढेल.
* ‘बायजू’ या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कंपनीमधील गुंतवणूकदार कतार गुंतवणूक प्राधिकरणने (QIA) बायजूजकडून त्यांची 235 दशलक्ष डॉलर्सची थकबाकी वसूल करण्यासाठी आता कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सिंगापूरमधील लवादाने (मध्यस्थी करणारी संस्था) ‘कतार गुंतवणूक प्राधिकरण’ च्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही बायजूजने ही रक्कम परत केली नव्हती, त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात बायजूजचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी वैयक्तिक हमी दिली होती, त्यामुळे ही थकबाकी भरण्याची जबाबदारी त्यांची वैयक्तिकरीत्या आहे. हे कायदेशीर पाऊल बायजूजच्या सध्याच्या आर्थिक संघर्षात आणखी भर टाकत आहे.
* 22 ऑगस्ट 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यात 4.38 अब्जची घट झाली असून, एकूण साठा 690.72 अब्जवर पोहोचला आहे. या घसरणीमागे मुख्यतः फॉरेन करन्सी अॅसेटस् आणि सोन्याच्या साठ्यातील घट कारणीभूत ठरली आहे.