डिजिटल पेमेंट आणखी सोयीस्कर होणार आहे. NPCI (National Payments Corporation of India) ने UPI व्यवहारांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, काही निवडक कॅटेगरींसाठी ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्यात आली आहे. हे बदल 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. आत्तापर्यंत सामान्य UPI व्यवहाराची मर्यादा १ लाख रुपये होती. पण काही विशेष कॅटेगरीमध्ये ही मर्यादा खूप कमी असल्यामुळे ग्राहकांना अडचण येत होती. NPCI ने याचा विचार करून आता 12 पेक्षा जास्त कॅटेगरींमध्ये व्यवहाराची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली आहे.
या बदलांचा थेट फायदा इन्शुरन्स प्रीमियम, शेअर बाजारातील गुंतवणूक, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, सरकारी ई-मार्केटप्लेस खरेदी, ट्रॅव्हल बुकिंग आणि बिझनेस व्यवहार करणाऱ्यांना मिळणार आहे.
व्यक्ती-टू-व्यक्ती (P2P) म्हणजे मित्र किंवा नातेवाईकांना पैसे पाठवण्याची मर्यादा मात्र बदललेली नाही. ती अद्याप १ लाख रुपये प्रति व्यवहार इतकीच राहील.
NPCI चं म्हणणं आहे की, लोक मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. त्यात मोठ्या रकमेचे व्यवहार करण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोयीस्कर सुविधा आणि बिझनेसला प्रोत्साहन देण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे.