नवी दिल्ली :
भारताचा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आता केवळ देशातच नव्हे तर जगभरात आपली ठसा उमठवत आहे. फ्रान्स, भूतान, यूएई, मॉरिशस, नेपाळ आणि सिंगापूरसारख्या देशांनंतर आता त्रिनिदाद आणि टोबैगोने देखील भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीचा स्वीकार केला आहे. यामुळे त्रिनिदाद आणि टोबैगो UPI स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबैगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांच्या आमंत्रणावरून ३ आणि ४ जुलै रोजी देशाचा दौरा केला. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये डिजिटल क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. यामध्ये डिजी लॉकर, ई-साइन, आणि गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या इंडिया स्टॅक सोल्युशन्सचा समावेश आहे.
🇫🇷 फ्रान्स (2024)
फ्रान्स हा UPI स्वीकारणारा पहिला युरोपीय देश ठरला. NPCI International आणि फ्रेंच पेमेंट कंपनी Lyra यांच्या सहकार्याने येथे यूपीआय सुरू करण्यात आले.
🇦🇪 युएई (2021)
NPCI International ने नेटवर्क इंटरनॅशनलच्या सहकार्याने यूएईमध्ये QR आधारित UPI पेमेंट सुरू केले, ज्यामुळे दुबई मॉलसह अनेक ठिकाणी भारतीय पर्यटक UPI वापरू शकतात.
🇳🇵 नेपाळ (2024)
PhonePe Payments आणि NPCI International च्या सहकार्याने भारत-नेपाळ दरम्यान UPI आधारित क्रॉस बॉर्डर पेमेंट सुरू झाले.
🇧🇹 भूतान (2021)
भूतानने भीम UPI QR पेमेंट स्वीकारणारा पहिला शेजारी देश म्हणून मान्यता मिळवली.
🇲🇺 मॉरिशस (2024)
पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या हस्ते UPI सेवा आणि RuPay कार्ड वापर सुरू करण्यात आला.
🇱🇰 श्रीलंका (2024)
UPI सेवेसोबतच श्रीलंकेत भारतीय पर्यटकांना अधिक सुलभ पेमेंटची सुविधा मिळाली असून, यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार आहेत.
🇸🇬 सिंगापूर (2023)
NIPL ने HitPay या सिंगापूरस्थित पेमेंट फर्मसोबत भागीदारी करत सर्व सिंगापूरमध्ये UPI पेमेंटसाठी मान्यता मिळवली.