ईपीएफओ प्रोफाईल  
अर्थभान

कागदपत्रांशिवाय करा ईपीएफओ प्रोफाईल अपडेट

पुढारी वृत्तसेवा
जगदीश काळे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या करोडो सदस्यांसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता सदस्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांचे वैयक्तिक तपशील सहजपणे दुरुस्त करू शकतात.

ईपीएफओ अपडेटमध्ये जन्मतारीख, नागरिकत्व, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव, लिंग, कंपनी जॉईन करण्याची आणि सोडण्याची तारीख यासारख्या माहितीचा समावेश आहे. ईपीएफओ अपडेटसाठीच्या विनंत्या प्रलंबित असलेल्या 3.9 लाख सदस्यांना या बदलामुळे फायदा होईल. आता ते त्यांची प्रलंबित विनंती रद्द करू शकतात व नवीन आणि सोप्या प्रक्रियेंतर्गत ती पुन्हा सबमिट करू शकतात.

ईपीएफओने आपल्या सिस्टीममध्ये अनेक अपडेटस् केले आहेत, जेणेकरून आता सदस्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांचे वैयक्तिक तपशील सहजपणे दुरुस्त करू शकतील. यामध्ये नावाचे स्पेलिंग, जन्मतारीख, पालकांची नावे, लिंग, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव आणि कंपनीतून प्रवेश आणि बाहेर पडण्याची तारीख यासारख्या माहितीचा समावेश आहे. या नवीन अपडेटमुळे सदस्यांना त्यांची माहिती संपादित करणे सोपे होणार आहे. ईपीएफओने माहिती दिली की, ही सुविधा फक्त त्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यांचे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधारशी लिंक आणि सत्यापित आहे. तक्रारी कमी करणे आणि प्रलंबित विनंत्यांचे त्वरीत निराकरण करणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. पूर्वी बदलासाठी नियोक्त्याकडून पडताळणी आवश्यक होती, ज्यासाठी अंदाजे 28 दिवस लागत. आता या नवीन सुविधेमुळे सदस्यांना त्यांची माहिती सहज अपडेट करता येणार असून, ही प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी झाली आहे.

यासाठी सर्व प्रथम सदस्यांना त्यांचे आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही हे सुनिश्चित करावे लागेल. लिंक नसेल तर आधी दोन्ही लिंक करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही 50 टक्के माहिती अपडेट करण्यासाठी ईपीएफओची मंजुरी आवश्यक असेल. उर्वरित माहिती सदस्य स्वत: अपडेट करू शकतात. वाढत्या तक्रारी कमी व्हाव्यात आणि त्यांचे निराकरण लवकर व्हावे यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

कसे अपडेट करावे?

अपडेट करण्यासाठी, प्रथम ईपीएफओच्या वेबसाईटवर जा आणि तुमचा युएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर वरील ‘मॅनेज’ टॅबवर क्लिक करा. तुम्हाला नाव, जन्मतारीख किंवा लिंग यासारखी माहिती अपडेट करायची असल्यास, ‘मूलभूत तपशील सुधारित करा’ पर्याय निवडा. आधार कार्डानुसार योग्य माहिती भरा आणि लक्षात घ्या की, ईपीएफ आणि आधारचा तपशील सारखाच असावा. आवश्यक असल्यास आधार, पॅन किंवा जन्म प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अपलोड करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT