Union Budget 2026 | रेल्वेसाठी 2.93 लाख कोटी 
अर्थभान

Union Budget 2026 | रेल्वेसाठी 2.93 लाख कोटी

ऐतिहासिक तरतूद; एकूण खर्च 2.78 लाख कोटी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेल्वे मंत्रालयासाठी 2,93,030 कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली असून, मंत्रालयासाठी एकूण 2,78,030 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. ही रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे.

या ऐतिहासिक तरतुदीव्यतिरिक्त या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी घोषणा करण्यात आल्या आहेत. देशातील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 7 नवीन हायस्पीड रेल कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, जे ग्रोथ कनेक्टर्स म्हणून विकसित केले जाणार आहेत. यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली आणि वाराणसी यांसारख्या प्रमुख शहरांमधील प्रवासाचे अंतर तासाभराच्या प्रवासात पूर्ण होणार आहे. देशातील आर्थिक आणि तांत्रिक केंद्रांना जोडण्यासाठी निश्चित केलेल्या सात हाय स्पीड रेल्वे मार्गावर 250 ते 320 किमी प्रतितास वेगाने गाड्या धावतील.

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, या प्रस्तावांचा थेट लाभ देशातील तरुण, महिला, शेतकरी तसेच सार्वजनिक आणि खासगी गुंतवणुकीला होईल. उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवून, तसेच जागतिक अस्थिरतेपासून संरक्षण निर्माण करून आर्थिक वाढ वेगाने आणि टिकाऊ ठेवणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह देशातील दळणवळण व्यवस्था नव्या वेगात पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट झाले आहे.

देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावण्यासाठी सज्ज होत असून, या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सादर अर्थसंकल्पात देशभरात एकूण 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली. यामुळे शहरांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, तसेच प्रमुख शहरांसह टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या विकासाला गती मिळून पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार होईल.

‘कवच’ प्रणालीचा 44,000 किमीपर्यंत विस्तार

रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी स्वदेशी बनावटीची अँटी-कोलिजन सिस्टिम कवच आता 44,000 किलोमीटरवरील मार्गावर कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे रेल्वे अपघातांवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे.

वंदे भारत स्लीपर आणि राजधानीला पर्याय

2026 च्या अखेरीस 24 कोच असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या गाड्या प्रामुख्याने राजधानी एक्सप्रेसची जागा घेतील, ज्यामुळे रात्रीचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होईल.

कॉरिडॉरचा मुंबई महानगर क्षेत्र, पुणे विभागासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा लाभ

मुंबई आणि पुणे दरम्यानचा

सध्याचा 3 ते 4 तासांचा प्रवास एका तासापेक्षा कमी होणार

दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान आणि आधुनिक होणार

मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट!

महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हे 2 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर केले असून, त्यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान आणि आधुनिक होणार आहे. हा हायस्पीड मार्ग राज्यातील प्रमुख शहरे जोडणार आहे. या कॉरिडॉरमुळे पुणे, सोलापूर, लातूर यांसारख्या शहरांना थेट लाभ होणार असून, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई आणि पुणे दरम्यानचा सध्याचा 3 ते 4 तासांचा प्रवास एका तासापेक्षा कमी होऊ शकतो. या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुण्यातील आयटी आणि ऑटो सेक्टरला मुंबईच्या वित्तीय केंद्रांना जोडून विकासाला गती देता येणार आहे.

हे कॉरिडोअर्स सेमी-हायस्पीड ते फुल हायस्पीड श्रेणीच्या स्वरुपाने उभारण्यात येतील. प्रमुख शहरांमधील प्रवासी वाहतूक वेगवान करण्यासाठी अधिक पर्यावरणस्नेही आणि कार्यक्षम पर्याय म्हणून ही सेवा विकसित करण्याचा मानस आहे. यामुळे इंटर-सिटी प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीला भरपूर फायदा होईल.

सात कॉरिडॉर आणि त्याचे फायदे

मुंबई ते पुणे : महाराष्ट्रातील या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.

पुणे ते हैदराबाद : पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा ठरेल.

हैदराबाद ते बंगळूर : दक्षिण भारतातील दोन मोठ्या आयटी हबमधील संपर्क वाढेल.

हैदराबाद ते चेन्नई : व्यापार आणि उद्योगाच्या द़ृष्टीने हे शहर जोडले जाईल.

चेन्नई ते बंगळूर : या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या असल्याने दिलासा मिळेल.

दिल्ली ते वाराणसी : उत्तर भारतातील धार्मिक आणि व्यावसायिक पर्यटनाला चालना मिळेल.

वाराणसी ते सिलीगुडी : ईशान्य भारताकडे जाणार्‍या मार्गावर वेगाची नवी क्रांती होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT